fbpx

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक

गणेश चतुर्थीला हमखास बनणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक (Ukadiche Modak). करायला सोपे आणि खायला चविष्ट असे हे पक्वान्न. मोदक म्हणजे मोद देणारा, आनंद देणारा. बाहेरून मऊ लुसलुशीत आणि आत रसाळ गोडवा असलेला मोदक बाप्पा इतकाच तुम्हालाही प्रिय असेल ह्यात शंका नाही.

कसे करायचे उकडीचे मोदक? चला जाणून घेऊ या.

साहित्य :

मोदक पीठ – एक वाटी (तांदूळ स्वच्छ धुऊन, सावलीत वाळवून, दळून घ्यावेत. ते पीठ बारीक चाळणीतून चालून घ्यावे).
एक वाटी गूळ किंवा साखर.
एक नारळ
तूप: दोन चमचे
वेलची पूड, तेल
अर्धी वाटी खसखस पूड (आवडत असल्यास) भाजून कुटलेली.

कृती:

सारण:

खोवलेल्या नारळाच्या चवात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधून मधून हालवावे व भांड्याच्या तळाला चिकटू देऊ नये. शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. वेलची पूड घालून हालवून सारण सारखे करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.

उकड :

जितकी तांदळाची पिठी असेल, तितकेच पाणी घेऊन कढईत उकळावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेऊन त्यात पिठी घालून हालवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरून खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे. मऊसर करण्यासाठी पीठ मळताना तुम्ही दोन चमचे कोमट दूधही घालू शकता.

मोदक :

या उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. हे तयार केलेले मोदक थोड्या पाण्यात बुडवून एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे. जवळपास १० ते १२ मिनिटे मंद आचेवर उकडून आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे.