Shabdasugandh : पोलीस खात्यातील नारायण गाडेकर यांचा ‘शब्दसुगंध’ हा काव्यसंग्रह प्रकाशित
Shabdasugandh | शब्दसुगंध : पोलीस खात्यातील कवी नारायण गाडेकर यांच्या ‘शब्दसुगंध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुलुंड येथे झाले. सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे, कवी नारायण गाडेकर, प्रकाशक डॉ. संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कवी अरुण म्हात्रे यांचे मनोगत
“सतत दुसऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या पोलिसांमध्ये प्रचंड प्रतिभाशक्ती आहे. चोवीस तास कार्यमग्न असल्यामुळे अनेक पोलीस व्यक्त होत नाहीत. पोलीस खात्यातील कवी नारायण गाडेकर यांच्यासारखे काहीजण मात्र कवितेतून व्यक्त होतात. अश्यावेळी त्यांच्या प्रतिभाशक्तीला समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.”असे आवाहन कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले. ‘शारदा प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या कवी नारायण निवृत्ती गाडेकर यांच्या ‘शब्दसुगंध’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहोळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे, कवी नारायण गाडेकर, प्रकाशक डॉ. संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गाडेकर यांची कविता पोलीस खात्याची मान उंचावणारी
‘शब्दसुगंध’ काव्यसंग्रहातील कवितांचे विशेष कौतुक करून कवी अरुण म्हात्रे पुढे म्हणाले,” शेतात रमणारी ,सामाजिक बांधिलकी मानणारी, कर्तव्यनिष्ठ असणारी, आईवडिलांचे ऋण व्यक्त करणारी नारायण गाडेकर यांची कविता पोलीस खात्याची मान उंचावणारी आहे. २६ जुलैचा हल्ला आणि कोरोना या काळात पोलिसांनी स्वतःच्या जीवाजी बाजी लावून आपल्या सगळ्यांची काळजी घेतली. उन्हातान्हात ,पावसात कश्याचीही पर्वा न करता पोलीस आपली सर्वांची काळजी घेत होते. अनेक पोलीस संवेदनशील असून ते मनातल्या मनात व्यक्त होत असतात.अश्या प्रतिभावंत पोलिसांची प्रतिभाशक्ती समजून घ्यायला हवी. पोलीस खात्यात अनेक अधिका ऱ्यांनी कथा,कविता, कादंबरी ,आत्मचरित्र असे विविध साहित्यप्रकार लिहून स्वतःला व्यक्त केले आहे. कवी नारायण गाडेकर यांना कविता समजलेली असून अतिशय नेमक्या शब्दात त्यांनी स्वतःला व्यक्त केले आहे.या कवितासंग्रहामुळे पोलीस खात्यात चैतन्य निर्माण होईल. पोलीस खात्यातील लेखक – कवीना बळ मिळेल ,असा मला विश्वास वाटतो.”
हे ही वाचा : रे मना… डॉ. सुचित्रा नाईक यांचे ‘मनाला’ भिडणारे पुस्तक!
पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांचे भाषण
पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड म्हणाले की,” पोलीस खात्यातील नारायण गाडेकर यांचा काव्यसंग्रह प्रकाशित होणे ही पोलीस खात्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या ड्युटीमध्ये काही सूचणं आणि ते कागदावर लिहून काढणे ही तारेवरची कसरत नारायण गाडेकर यांनी अतिशय प्रगल्भपणे केली आहे. असे सहकारी पोलीस खात्याची मान नेहमीच उंचावतात”.
“आपल्या सोबत काम करणारा सहकारी लिहित असतो ,जमेल तसे वाचत असतो. पण जेव्हा शब्दसुगंध सारखा दर्जेदार, वाचनीय कवितसंग्रह प्रकाशित होतो. तो खरोखरच आनंदाचा क्षण असल्याचे गौरोदगार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे यांनी काढले.
कवी नारायण गाडेकर यांचे मनोगत
मनोगत व्यक्त करताना कवी नारायण गाडेकर म्हणाले,” मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.त्यामुळे मातीचे दुःख मला शेतात राबताना कळले. पाऊस आला नाही म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रूंचा पाऊस मी पाहिला. त्याचवेळी माझ्या कवितेने जन्म घेतला. पोलीस खात्यात असल्यामुळे समाजाच्या वेदना ,दुःख अधिक संवेदनशिलपणे कागदावर उतरवू शकलो. माझे कौतुक करणारे वरिष्ठ, सत्याच्या वाटेवर चालायला शिकविणारे आईवडील, आणि माझ्यातील कवीला जपणारी पत्नी यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो.”
यावेळी स्वर्गीय निवृत्ती गाडेकर यांच्या स्मरणार्थ डॉ. प्रकाश जंगले यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” तर लेखक अमोल मोहन निरगुडे यांना “साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ.संतोष राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रकाशन सोहळ्यास पोलीस खात्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.