fbpx

Pathaan Avtaar: ‘पठाण’ अवतार

पठाण अवतार

Pathaan Avtaar: जवळपास चार वर्षांच्या दीर्घ विश्रांती नंतर शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ रुपात अवतरला आणि त्याने तिकीट खिडकीचा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर लीलया उचलला. दर शुक्रवारी नवीन चीत्रपटांच्या नावाखाली रिमेक आणि सिक्वेलचे रतीब घालणाऱ्या बॉलीवूडकर गोप गोपीकांनी त्या छत्रछायेखाली धाव घेतली आणि शाहरुख खानच्या पठाण अवताराची ते भरभरून स्तुती करू लागले. त्याच्या मायेने मंत्रमुग्ध झालेले प्रेक्षक ‘बॉयकॉट बॉलिवूड’ चे शस्त्र खाली ठेवून ‘पठाण’ ला शरण आले आणि सिनेमागृहात ‘बेशरम’ रंगाची रंगपंचमी खेळू लागले. अगदी आठवडाभर आधीपर्यंत आपल्याला याच रंगाची ॲलर्जी होती हे ही ते विसरले. OTT युगात चांगले कंटेंट देण्याच्या शापातून शाहरुख खानने बॉलिवूडला मुक्त केले होते. काहीतरी नवीन लिहावे लागेल, अभिनय वैगरे करावा लागेल, घराणेशाही सोडून चांगला अभिनय येणाऱ्या कलाकारांना संधी द्यावी लागेल अश्या अनेक प्रकारच्या भयानक नरक यातनातून बॉलिवूडची सुटका झाली.

पठाण दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कुणाचा ‘भाई’ कुणाची ‘जान’ असलेल्या नंदी (बैला) चे न मागता मिळालेले दर्शनही सुखावणारे होते. वर्षानुवर्षे दाखवीत असलेल्या आपल्या त्याच लीला भाई महाराजांनी दोन मिनिटांच्या टिजर अध्यायात पुन्हा दाखविल्या आणि सिनेमागृह भक्तिभावाने टाळ्या शिट्ट्यांचा गजर करू लागले.

Pathaan Avtaar: पठाण अध्याय

त्यानंतर पठाण अध्यायाची सुरुवात झाली. २ तास २४ मिनिटे चाललेल्या अध्यायात पठाणाने गोळ्या न संपणाऱ्या बंदुका घेऊन अनेक असुरांचा वध केला, हवं तेव्हा हेलिकॉप्टर, गाड्या, शस्त्रे प्रकट करून पाठलाग केला, हाणामारी केली. त्याने केलेल्या विध्वंसामुळे जगात कुणालाही कसलाही त्रास झाला नाही. दीपिका नावाच्या अप्सरेने आपल्या सुबक देहाचं दर्शन घडवून तिकीट आणि पॉपकॉर्न वर खर्च झालेल्या हजारोंची क्षणात भरपाई करून दिली. पठाणाच्या मदतीला धावून आलेल्या टायगर अवतारातील भाई महाराजांना पाहून प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. काहींनी स्क्रीनवर चिल्लरांजली वाहून महाराजांच्या नावाचा जयघोष केला, काहींनी टाळ्यांचा कडकडाट आणि ‘शिट्टी नाद’ केला आणि पुन्हा वातावरण भक्तिमय झाले. रशियन आर्मीच्या प्रशिक्षित सोल्जर्सना दोन्ही देवांनी पापड कुस्करावा इतकं लीलया कुस्करुन टाकलं. पेनकिलर्सच्या गोळ्या तोंडांत टाकत भाई महाराज अंतर्धान पावले आणि आपण ‘पठाण’ अवतार पहाण्यासाठी आलो आहोत याची प्रेक्षकांना पुन्हा जाणीव झाली.

पुढे पाठलाग, हाणामारी, डायलॉगबाजी, देशभक्ती, उपदेश या पंचामृतांचे मनसोक्त प्राशन करून पुन्हा एकदा पठाण आणि भाई महाराजांचे दर्शन घेऊन प्रेक्षक आनंदाने बाहेर पडले. आपण जे पाहिले, अनुभवले त्यात कथा, पटकथा, लॉजिक यांचा अभाव होता याची त्यांना जाणीवही झाली नाही.

हे ही वाचा: वेड लावणारा ‘वाळवी

Pathaan Avtaar: भारतीय हेर दुष्ट, गद्दार आणि पाकिस्तानी हेर चांगले

चित्रपटात भारतीय हेर दुष्ट, गद्दार आणि पाकिस्तानचे हेर मात्र आतंकवाद्यांशी दोन हात करणारे, त्यासाठी भारतीय हेरांची मदत करणारे आहेत असे दाखवून सॉफ्ट कॉर्नर तयार करायचा प्रयत्न केला गेला. या आधीही ‘टायगर’ पुराणात पाकिस्तानी हेर चांगले दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्यामुळे हे मुद्दाम दाखविले आहे यात शंका नाही.

Pathaan Avtaar: ५६०० स्क्रीनवर प्रकाशित

आता ५६०० स्क्रीनवर प्रकाशित होऊनही समाधान न झालेला हा ‘बकासुर’ जास्तीत जास्त खेळ आपल्या घशात घालेल. वाळवी, सरला एक कोटी, वारीसू, थीनुवू या सगळ्या चित्रपटांचे खेळ आपल्या ताटात खेचून घ्यायची लीलाही पठाण महाराज करतील. सोशल मीडयावर आगपाखड किंवा फार फार तर एखादं आंदोलन याशिवाय फारसा विरोध होणार नाही. प्रेक्षक, नेतेमंडळी कुणीही विरोधकांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. आणि प्रेक्षकांना हेच आवडतं असा गोड गैरसमज करून ही खान मंडळी पुढचा अवतार घेण्याची तयारी करतील.