fbpx

Neeraj Chopra Javelin Throw : नीरज चोप्रा भालाफेक: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक

Neeraj Chopra Wins Gold In World Athletics Championships

Neeraj Chopra Javelin Throw | नीरज चोप्रा भालाफेक: भारतीयाच्या नीरज चोप्राने प्रथमच जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन बनलेला हा खेळाडू आता वर्ल्ड चॅम्पियनही बनला आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अ‍ॅथलेटिक्स सेंटरमध्ये झालेल्या भालाफेक स्पर्धेत नीरजने 88.17 मीटर फेक करून सुवर्णपदक प्राप्त केले. अंतिम फेरीत एकूण सहा प्रयत्न झाले आणि नीरजने दुसऱ्या फेरीतच ८८.१७ मीटर दूर भालाफेक केली आणि गुणतालिकेत आघाडी मिळविली. पुढे त्याने ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली.

जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील पहिले सुवर्णपदक

ऑलिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि डायमंड लीगमध्ये चॅम्पियन असलेल्या या खेळाडूने या स्पर्धेपूर्वी केवळ जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले नव्हते पण आता त्याचं हे स्वप्नही पूर्ण झालं आहे. ही कामगिरी करताना नीरजच्या पहिल्या प्रयत्नात फाऊल झाला. पण त्यानंतर त्याने पुढच्या पाच प्रयत्नांमध्ये 88.17m, 86.32m, 84.64m, 87.73m आणि 83.98m अशी कामगिरी केली आणि आघाडी कायम ठेवत सुवर्णपदाला गवसणी घातली.

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी, झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरची सर्वोत्तम थ्रो करून कांस्यपदकावर निशाणा साधला. अंतिम फेरीत नीरजसोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू होते. किशोरने 84.77 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या स्थानावर तर डीपी मनूने 84.14 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हे ही वाचा : अहमदाबादमध्ये 4 ऑक्टोबर रोजी होणार आयसीसी विश्वचषक स्पर्धा २०२३ ची रंगतदार सुरुवात

नीरज, किशोर आणि मनूचे सहा प्रयत्न

पहिली फेरी :

पहिल्या फेरीत नीरजला फार काही करता आले नाही. त्याच्या प्रयत्नाला फाऊल म्हटले गेले. डीपी मनूने 78.44 मीटर अंतरावर भालाफेक केली आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 74.80 मीटर फेक केली.

दुसरी फेरी :

नीरजने दुस-या फेरीत पुनरागमन केले आणि 88.17 मीटर थ्रो करून पहिले स्थान पटकावले. दुसऱ्या फेरीअखेर तो अव्वल स्थानावर आला. यावेळी किशोर जेना 82.82 मीटर अंतरावर भालाफेक करत पाचव्या स्थानावर होता. डीपी मनू 78.44 मीटर गुणांसह 10 व्या क्रमांकावर होता. पाकिस्तानचा अर्शद नदीम चौथ्या क्रमांकावर होता. त्याने दुसऱ्या फेरीत 82.81 मीटर फेक केली.

तिसरी फेरी:

तिसऱ्या फेरीत नीरजने 86.32 मीटर अंतरावर भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तिसऱ्या फेरीत ८७.८२ मीटर अंतर कापले. भारताच्या डीपी मनूने 83.72 मीटरवर भालाफेक केली जी त्याची तीन फेऱ्यांमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. किशोर जेना तिसऱ्या फेरीत अपयशी ठरला. त्याच्या थ्रोला फाऊल म्हटले गेले.

चौथी फेरी:

नीरजने चौथ्या फेरीत 84.64 मीटर फेक केली. यावेळी डीपी मनूच्या थ्रोला फाऊल म्हटले गेले. किशोर जेनाने 80.19 मीटर फेक केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.१५ मीटर अंतरावर भालाफेक केली. चार फेऱ्यांनंतर नीरज पहिला, अर्शद दुसरा आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर तिसरा होता आणि आणखी दोन फेऱ्या बाकी होत्या.

पाचवी फेरी:

पाचव्या फेरीत नीरजने ८७.७३ मीटर अंतरावर भालाफेक केली. पाचव्या फेरीत किशोर जेनाच्या थ्रोला फाऊल म्हटले गेले. त्याचवेळी डीपी मनूने पाचव्या प्रयत्नात 83.48 मीटर फेक केली.

सहावी फेरी:

सहाव्या फेरीत नीरजने ८३.९८ मीटर फेक केला. त्याचवेळी किशोरचा सहावा प्रयत्न फाऊल झाला. डीपी मनूने 84.14 मीटरची थ्रो केली. अंतिम फेरीतील हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो ठरला. 6 व्या प्रयत्नानंतर,नीरज खूप आनंदी दिसला. त्याने डीपी मनू आणि किशोर जेना यांना मिठी मारली.

पात्रता फेरीत 88.77 मीटर अंतरावर भाला फेकला

पात्रता फेरीतील पहिल्याच प्रयत्नात नीरजने शुक्रवारी 88.77 मीटर फेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या कामगिरीच्या जोरावर तो पुढील वर्षी पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. ही त्याची मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आणि एकूण चौथी कामगिरी ठरली.

गेल्या वेळी जिंकले रौप्य पदक

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या वेळी नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले होते. 25 वर्षीय भारतीय स्टार अ‍ॅथलीटने टोकियो ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले. 2018 मधील आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही तो सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरला होता आणि गेल्या वर्षी त्याने डायमंड लीगही जिंकली होती.

अर्शद नदीमने पटकावले रौप्यपदक

अर्शद नदीमने 87.82 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले. त्याचवेळी झेक प्रजासत्ताकच्या जेकब वेडलेचने 86.67 मीटरची सर्वोत्तम थ्रो करून कांस्यपदकावर लक्ष्य ठेवले. अंतिम फेरीत नीरजसोबत डीपी मनू आणि किशोर जेना हे दोन भारतीय खेळाडू होते. किशोरने 84.77 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह पाचव्या स्थानावर तर डीपी मनूने 84.14 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

नीरजने जिंकले मन

सामन्यानंतर नीरजने पुन्हा एकदा आपल्या खास स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली. सामन्यातील कटुता विसरून त्याने अर्शदला फोटोसाठी बोलावले. त्याच्याशी हस्तांदोलन करून मिठी मारली. त्यानंतर व्यासपीठावर एकत्र उभे राहिले. यावेळी झेक प्रजासत्ताकचा खेळाडू जाकुब वेडलेचही तेथे उपस्थित होता.

नीरजच्या घरी जल्लोष

नीराजच्या या सुवर्ण कामगिरी नंतर त्याच्या गावात आनंदाचे वातावरण होते. त्याच्या जगज्जेता होण्याचा आनंद गावात लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. नीरजने सामना जिंकताच घरोघरी लाइव्ह पाहणाऱ्या लोकांनी टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. नीरजचे काका भीम चोप्रा आणि वडील सतीश चोप्रा यांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावणारा नीरज हा भारतातील पहिला अ‍ॅथलीट ठरला आहे.