Khamang Alu Wadi: खमंग अळूवडी
पारंपारिक महाराष्ट्रीय आणि गुजराथी थाळीत आवर्जून असणारी, जेवणाची लज्जत वाढवणारी चटकदार खमंग अळूवडी (Khamang Alu Wadi) बनवायची आहे? मग लागा तयारीला.
Khamang Alu Wadi: साहित्य
- १५-१६ वडीसाठीची अळूची पानं२ वाट्या डाळीचं पीठ
- २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ
- २ टेबलस्पून गूळ
- २-३ टीस्पून तिखट
- २ टीस्पून धणे-जिरे पूड
- अर्धा टीस्पून हळद
- मीठ चवीनुसार
- आळूवड्या तळण्यासाठी तेल
Khamang Alu Wadi: कृती
- काळ्या देठाची अळूची पाने घ्या. ही पाने घशाला खाजत नाहीत.
- अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करा. पानं कोरडी झाल्यावर पुसून घ्या. उलटी करून हलक्या हातानं त्यावर लाटणं फिरवा म्हणजे त्यांच्या शिरा जरा दबतील, पानं मऊ होतील आणि ती रोल करताना शिरांचा अडसर होणार नाही.
- डाळीच्या पिठात सगळं साहित्य घाला आणि पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवा.
- आता अळूची पानं उलट्या बाजूंनी आकारानुसार घ्या. सगळ्यात मोठं पान घेऊन त्यावर तयार मिश्रण हातानं लावा. हे मिश्रण पानावर एकसारखं पसरवा.
- त्यावर दुसरं पान ठेवा. परत मिश्रण पसरवा. अशी ७-८ पानं एकावर एक ठेवत जा. नंतर या पानांचा घट्ट उंडे (रोल) तयार करा. असे जितके होतील तितके उंडे करून घ्या.
- कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे उंडे ठेवा. शिटी न लावता २०-२५ मिनिटं उकडून घ्या.
- थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या जाडीच्या वड्या कापा.
- या अळू वड्या (Khamang Alu Wadi) तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायही करून उत्तम लागतात.