fbpx

Kudos to Doctor Shashank Singh: डॉक्टरांच्या रूपात देव आला धावून

Kudos to Doctor Shashank Singh

Kudos to Doctor Shashank Singh: डॉक्टरांना पृथ्वीवरचा देव म्हटले जाते ते उगाच नाही.  अनेक वेळा डॉक्टर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्यांच्या ‘मर्यादेबाहेर’ असे काही करतात ज्यामुळे ते समाजासाठी आदर्श बनतात.  असाच काहीसा प्रकार देहरादून इथे पाहिला मिळाला.

देहरादून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे ज्येष्ठ निवासी डॉक्टर शशांक सिंग (Doctor Shashank Singh) यांनीही असे काही केले, ज्यामुळे त्यांच्या पेशंटचा जीव त्यांना वाचवता आला. त्यांच्या या कृतीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे. 

हे ही वाचा: बेंगळुरूच्या डॉक्टरांनी 3 किमी धावत जाऊन केली महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया

रुग्णाला मिळत नव्हता ब्लड डोनर

देहरादून मधल्या पीजी मेडिकल कॉलेजमध्ये एक रुग्ण दाखल झाला होता ज्याच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता होती पण त्या रुग्णाला ऐनवेळी कुणीच ब्लड डोनर मिळत नव्हता. हा रुग्ण एका मोठ्या खड्ड्यात पडल्यानं गंभीर जखमी झाला होता. त्याच्या बरगड्या, उजवा हात आणि मांडीची हाडं फ्रॅक्चर झाली. उपचारासाठी त्याला पीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं गेलं होतं.

मांडीची शस्त्रक्रिया

तीन दिवसांपासून रुग्ण आयसीयूमध्ये होता. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या मांडीची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. पण रक्ताच्या कमतरतेमुळे शस्त्रक्रिया करता येत नव्हती. रुग्णाची मुलगी रक्तदान करण्यासाठी पुढे आली. पण प्रकृती अस्वास्थामुळे मुलीलाही रक्तदान करता येईना.

Doctor Shashank Singh : माणुसकीचं दर्शन

ऑर्थोपेडिक डॉ. शशांक सिंह (Doctor Shashank Singh) त्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणार होते.  पण जेव्हा त्यांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून रक्त न मिळवता आल्याची बातमी कळली तेव्हा त्यांनी स्वतः त्या रुग्णाला रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.  त्यांनी आधी त्या रुग्णाला रक्तदान केले आणि नंतर त्याच्या मांडीवर शस्त्रक्रिया करून त्याला जीवदानही दिलं. डॉक्टर शशांक यांच्या या कृतीचं खूप कौतुक केलं जात आहे. 

दून मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आशुतोष सायना यांनी डॉ. शशांक सिंग आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. प्रत्येक डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मनात रुग्णाप्रती अशी भावना असायला हवी, असे ते म्हणाले.

सरकारी रुग्णालय प्रशासनाला अनेकदा अपुऱ्या सुविधांमुळे किंवा गैरवर्तणुकीमुळे टीकेला सामोरं जावं लागतं.  पण त्यातही डॉक्टर शशांक सारखे डॉक्टर रुग्णांची सर्वतोपरी सेवा करण्याचा प्रयत्न करतात. रक्तासाठी वणवण भटकणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांचा प्रश्न त्यांनी स्वतःचा बनवला.  सरकारी डॉक्टरनं माणुसकीचं दर्शन घडवत सर्वांचं मन जिंकलं आहे. रुग्णाच्या शस्त्रक्रियेआधी त्याच्यासाठी रक्तदान करणाऱ्या या ऑर्थोपेडिक डॉक्टरचं सोशल मीडियात खूप कौतुक केलं जात आहे.