fbpx

Chandrayaan 3 launch : चंद्र आहे साक्षीला… चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण

Chandrayaan 3 Launch

Chandrayaan 3 launch : अंतराळ हा विषय कायमच जनसामान्यांचा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अवकाशातील तारे ग्रह चंद्र आणि संपूर्ण आकाश विश्व याबद्दल अनामिक कुतूहल प्रत्येकाच्या मनात असतेच असते. त्यात चंद्र म्हणजे तर जिव्हाळ्याचा! चंद्राला कोणी भाऊ म्हणतं, कोणी देव म्हणतं, कोणी सखा म्हणतं, तर घराघरात चंद्राला लहान मुलांचा अगदी मामाही बनवले आहे.

Chandrayaan 3 launch : चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण

तर ‘कोसो दूर’ असलेल्या या चंद्राला भेट देण्यासाठी आपल्या देशाचे यान 14 जुलै 2023 ला प्रक्षेपित झाले आणि म्हणूनच हा दिवस भारतासाठी अतिशय महत्वाचा दिवस ठरला. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा क्षण 14 जुलै दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रत्येकाने अनुभवला. संपूर्ण जगाचे लक्ष यावेळी फक्त आणि फक्त भारतावर होते.

यावेळी चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 (LVM3) रॉकेटद्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी प्रक्षेपित केले गेले.

हे ही वाचा: नेव्हिगेशन उपग्रह NVS-1 श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण

५० दिवसांचा प्रवास

615 कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे मिशन सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, आता हे चांद्रयान काही वेळ पृथ्वीभोवती फिरेल. त्यानंतर पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. 5 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. तसंच त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायला सुरूवात करणार आहे. त्यामुळे 23 ऑगस्ट हा आता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

चंद्रावर यान उतरविण्याचे उद्दिष्ट

भारतातील वैज्ञानिकानी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे आतापर्यंत अनेक वैज्ञानिक मोहिम हाती घेतल्या. जसे की, मंगल यान ,चंद्रयान 1,चंद्रयान 2 इत्यादी… या मोहीम भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) पार पाडल्या आहेत. परंतु चंद्रयान 2 मात्र चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर ही मोहीम अपूर्ण राहिली होती. म्हणूनच त्यानंतर भारताने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली. ही मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी आशा ठरणार आहे.चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे चांद्रयान 3 चे उद्दिष्ट आहे.

चांद्रयान-३’चे विक्रम लँडर (चांद्र स्थानक), प्रग्यान रोव्हर (स्वयंचलित वाहन) आणि प्रोपल्जन मॉड्यूल (वाहक यंत्रणा) असे तीन प्रमुख भाग आहेत.

चांद्रयान- ३’चे प्रक्षेपण लाँच वेहिकल मार्क ३ या भारताच्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या साहाय्याने करण्यात आले.

प्रथमच दक्षिण ध्रुवावर उतरणार

प्रत्येकाला आवर्जून माहित असावी अशी या मोहिमे बाबतची एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे चंद्रावर जात असलेले हे भारतीय अंतराळ संशोधन यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे जिथे आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही. त्यामुळे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांकरिता ‘चंद्रयान 3’ मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे . आपल्या देशातील तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे. चांद्रयान-३ ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे.

चांद्रयान 3 मोहिमेला यशस्वी उद्दिष्टपूर्ती साठी मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा!