fbpx

बैल पोळा: सर्जा राजाचा सण

Bail Pola

शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले तरी शेतीतील कामासाठी बैलाचे महत्व आजही कमी झालेले नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्या सचोटी इतकाच त्याच्या बैलांच्या कष्टाचा मोलाचा वाटा असतो. बैलांच्या या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात “बैलपोळा” (Bail Pola) सण साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला येतो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात.

बैल पोळ्याचे महत्त्व

बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. शेतकरी या दिवसाची खुप आतुरतेने वाट पाहत असतात. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करुन त्यांचे कौतुक करतात. या दिवशी बैलाची पूजा केली जाते. त्याची मिरवणूक काढली जाते. शहरी भागात महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य दाखवलं जातं.

देशभरात कसा साजरा होतो बैलपोळा?

श्रावणात दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात पोळा हा सणमोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश, तेलंगण आणि छत्तीसगडमध्येही हा सण साजरा होतो. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला पुलाला अमावस्या म्हटले जाते. तर काही ठिकाणी बेंदूर असे देखील म्हणतात. तर उत्तर व पश्चिम भारतात गोधन असे म्हटले जाते. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रीतसर आमंत्रण (आवतण) देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकले जातात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले जातात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो.

बैलांचा साजशृंगार

पोळा सणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. बैल सजवितात व मिरवणुकीत भाग घेतात. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. एवढेच नाही तर बैलांचा गोठाही फुलांच्या माळांनी, दिव्यांनी आणि वेगवेगळी चित्रे काढून सजवला जातो. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.

हे ही वाचा: आंतरराष्ट्रीय श्वान दिन

पोळा फुटणे

गावातील वेसही पानाफुलांनी सजवली जाते; वेशीत आंब्याची पाने व फुलांचे तोरण बांधतात. गावातील सर्व बैल गोळा होईपर्यंत; सनई, ढोल, ताशे व नगारे वाजवले जातात. फटाके फोडले जातात, लोक आनंदाने लेझीम खेळले जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणजेच पोळा सणाची गीते म्हणायची पद्धत आहे.

गावोगावच्या परंपरेनुसार उत्सव साजरा केला जातो, काही गावांमध्ये पोळा फुटल्यानंतरही त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतात व नंतर कार्यक्रम संपन्न होतो. त्यानंतर शेतकरी आपले बैल घरी आनतात, गोठया बाहेर बैलांना उभे करुन घरातील स्त्रिया बैल व मालक यांना ओवाळतात व दोघांचीही पूजा करतात.

गावाच्या वेशीवर नारळ फोडून बांधलेले तोरण सोडले जाते; त्याला पोळा फुटणे असे म्हटले जाते. त्यानंतर शेतकरी वेशीतून आपले बैल मंदीरासमोर उभे करुन; बैलांना खांदा द्यायला लावतात. खांदा देणे म्हणजे बैलाचा खांदा हाताने दाबला की; बैल आपले पुढच्या पायाचे गुढगे जमीनीवर टेकवून देवासमोर नतमस्तक होतात, देवाचे दर्शन घेतात असे मानले जाते.

बैलांना खांदा दयायला लावण्याचे दृष्य पाहण्यासारखे असते; काही बैल खांदा दाबल्याबरोबर खांदा देतात, तर काहींच्या खांदयावर लटकले; तरी ते खांदा देत नाहीत. काही बैल तर खांदयाला लटकलेल्या मालकासह पळ काढतात; अर्थात बैलाला खांदा दयायला लावणे; हे मालकाची कला व बैलाची ताकद यावर अवलंबून असते.

पोळा सणाचा नैवेद्य

पोळा दिवशी बैलांची पूजा करून त्यांना नैवेद्य दिला जातो. बैलांसाठी खास ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
नैवेद्यामध्ये विशेतः पुरण पोळीचा समावेश असतो. ग्रामीण भागात आजही आमंत्रणावरून बैलजोडी घरोघरी नेली जाते. ज्यांच्या घरी बैलजोडी जाते ते कुटुंब मोठ्या आदराने बैलांचे पाय धुवून हळद-कुंकू लावून बैलांची आरती ओवाळतात. त्यानंतर बैलांना पुरण पोळीचा नैवेद्य दिला जातो.

बैल पोळा पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार कृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो.

या सणाबद्दल एक आख्यायिका अशीही आहे की, कैलास पर्वतावर भगवान शंकर व देवी पार्वती सारीपाट खेळत होते; खेळताना देवी पार्वतीने डाव जिंकला; परंतू भगवान शंकर ते मानन्यास तयार नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला; या वादाचा न्यायनिवाडा करण्यासाठी; त्यांच्या वादाला साक्षी होता तो म्हणजे फक्त नंदी.

जेव्हा देवी पार्वतीने नंदीला विचारले की, डाव कोणी जिंकला; त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली. तेंव्हा देवी पार्वतीला नंदीचा खूप राग आला आणि देवी पार्वतीने नंदीला ‘मृत्यु लोकी तुझ्या मानेवर जू बसेल आणि तुला जन्मभर कष्ट करावे लागतील’ असा शाप दिला.

नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने देवी पार्वतीचीी माफी मागितली; तेव्हा देवी पार्वतीने त्याला सांगितले की, शेतकरी वर्षातून एक दिवस तुझी पूजा करतील; त्या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत. तो दिवस म्हणजेच बैल पोळा. तेव्हा पासून ‘बैल पोळा’ हा सण साजरा काण्याची प्रथा सुरु झाली; असे मानले जाते.