Ram Mandir Innogration : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी साजरी होणार दिवाळी
Ram Mandir | राम मंदिर : अयोध्येत सुरू असलेले राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले आहे. या राम मंदिराच्या (Ram Mandir) भव्य उद्घाटनाची तारीख आता निश्चित झाली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे आंतरराष्ट्रीय कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी यांनी या संदर्भात दिलेल्या माहिती नुसार जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख २१ ते २३ जानेवारी दरम्यान निवडली जाईल. मुहूर्ताच्या तारखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आल्या आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख पंतप्रधान निवडतील, जेणेकरून उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांची उपस्थिती सुनिश्चित करता येईल. यासोबतच सर्व संप्रदायातील संत-मुनींनी उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
मुख्य कार्यक्रम संक्षिप्त स्वरूपाचा
उद्घाटनाच्या दिवशी मुख्य कार्यक्रम संक्षिप्त स्वरूपाचा असेल आणि या मुख्य कार्यक्रमाला फक्त संत महात्माच उपस्थित राहतील असे ठरविण्यात आले आहे. राम मंदिरात (Ram Mandir) अभिषेक झाल्यानंतर राष्ट्र आणि जगासाठी एक औपचारिक कार्यक्रम आयोजित केला जाईल. संतांच्या दर्शनानंतर मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.
सर्व राज्यांमधून अयोध्येसाठी विशेष ट्रेन
वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सर्व राज्यांमधून अयोध्येपर्यंत विशेष ट्रेन चालविली जाणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी देशभरात रामलीला, रामकथेसह अनेक प्रकारचे उत्सव आयोजित केले जावेत अशी योजना आहे.
देशभरात साजरी होणार दिवाळी
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. उद्घाटनावेळी अयोध्येतील राम मंदिरासोबतच देशातील सर्व मंदिरांमध्ये पूजा केली जाणार आहे. सायंकाळी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाचे आयोजन करून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. यासोबतच देशातील प्रत्येक समाजातील लोकांना त्यांच्या घरासमोर किमान पाच दिवे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. याकडे रामाचे अयोध्येतील पुनरागमन म्हणून पाहिले जाईल.
विश्व हिंदू परिषद (VHP) सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग म्हणून राम मंदिराच्या उभारणीला प्रोत्साहन देत आहे. म्हणूनच राम मंदिराच्या उभारणीच्या दिवशी दिवाळी साजरी करणे हा सांस्कृतिक स्वातंत्र्याचा प्रारंभ दिवस म्हणून साजरा केला जाईल. विहिंप प्रत्येक धार्मिक समुदायाच्या लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करत आहे.
हे ही वाचा : वंदे भारतमध्ये लवकरच येणार ‘स्लीपर कोच’
उद्घाटनाचा कार्यक्रम चालणार आठवडाभर
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्याने सांगितले की उद्घाटन एक भव्य सांस्कृतिक-ऐतिहासिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याची योजना आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम आठवडाभर चालणार असून यादरम्यान अयोध्येत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वसामान्यांसह विशेष लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. तो अविस्मरणीय करण्यासाठी या दिवशी दिवाळी साजरी करून सर्वांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.
पारंपारिक दिवाळी नियोजन
आता दिवाळीच्या दिवशी मंदिरे आणि घरे इलेक्ट्रॉनिक सजावटीच्या दिव्यांनी सजवण्याचा ट्रेंड वाढला आहे. मात्र मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी लोकांना दिवाळी शक्यतो पारंपारिक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यामध्ये दिवे लावून घरे सजवणे आणि गाईच्या पदार्थांपासून बनवलेल्या वस्तूंनी पूजा करणे यांचा समावेश असेल.