Vande Bharat Sleeper Coach :सध्या देशात शताब्दी एक्स्प्रेसच्या मार्गावर वंदे भारत गाड्या धावत असून यामध्ये चेअर कार सुविधा म्हणजे फक्त बसण्याचीच सोय आहे. आता मात्र त्यात स्लीपर कोचचीही भर पडणार आहे. स्लीपर कोच सुविधेसहित नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे ज्यात एसी नसलेल्या डब्यांचाही समावेश असणार आहे. जनरल डब्यांमुळे सर्वसामान्य प्रवासी आरक्षणाशिवायही या ट्रेनने प्रवास करू शकेल.
Vande Bharat Sleeper Coach : ‘वंदे भारत’मध्ये आता स्लीपर कोच
भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी लोकप्रिय ‘वंदे भारत’मध्ये आता स्लीपर कोच आणण्याच्या तयारीत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या ‘एसी चेअर कार’ला मिळालेला प्रतिसाद पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनमुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना आरामही करता येईल. सध्या ज्या वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत, त्या एसी चेअर कार स्वरूपाच्या असून त्यांच्या वेळा दिवसाच्याच आहेत. पण वंदे भारत स्लीपर ट्रेन आल्यास दूरच्या मार्गांवर रात्रीच्या वेळीही त्या चालवल्या जाऊ शकतात. वंदे भारत स्लीपर ट्रेन राजधानी ट्रेनसारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यांची जागा घेऊ शकतात. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहितीनुसार, पुढील 24 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत येईल असा रेल्वेचा अंदाज आहे.
चेन्नईतील फॅक्टरीत स्लीपर वंदे भारत ट्रेनचं काम सुरू
रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (RVNL) जीएम मेकॅनिकल आलोक कुमार मिश्रा यांनी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (ICF) प्रोटोटाइप स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवण्याचं काम सुरू आहे. पुढील 24 महिन्यात या ट्रेन पूर्ण होतील अशी आशा आहे. याशिवाय 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट बनवण्याचा महत्त्वाचा उपक्रम सुरू आहे.
हे ही वाचा: फ्रान्स, दुबई, यूकेसह 17 देशांमध्ये भारतीय UPI
लातूरच्या रेल्वेच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन
रेल्वे विकास निगम लिमिटेड रशियन कंपनी TMH सोबत लातूर येथील रेल्वेच्या कोच फॅक्टरीमध्ये 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहे. याशिवाय टिटागड वॅगन्स आणि BHEL संयुक्तपणे उर्वरित 80 गाड्यांचे उत्पादन करत आहेत. अशाप्रकारे एकूण 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. RVNL-TMH ला ट्रेन तयार करण्याचं कंत्राट मिळालं आहे. 120 कोटींच्या किंमतीवर त्यांनी ही करार मिळवला आहे. 35 हजार कोटींच्या या प्रकल्पात 120 वंदे भारत स्लीपर गाड्यांची निर्मिती आणि पुढील 35 वर्षांसाठी त्यांची देखभाल करण याचा समावेश आहे.
RVNL में जीएम मॅकेनिकल आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन वर्षांत या ट्रेन तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी सांगितलं आहे की, प्रवाशांना रात्रीच्या वेळा आरामदायक आणि वेगाने प्रवास करण्यासाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन्स सुरु करण्यात येणार आहेत. नव्या स्लीपर वंदे भारत राजधानी एक्स्प्रेससारख्या ट्रेनची जागा घेतील अशी आशा आहे.
मुंबई-गोवा वंदे भारतमध्येही स्लीपर कोच
वंदे भारतमध्ये प्रवाशांच्या सर्व सोयी सुविधांचा विचार करण्यात आला असून, त्याप्रमाणे सर्व नियोजन करण्यात आलं आहे. आसन व्यवस्था ते जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वंदे भारतचं कौतुक केलं जात आहे. पण मुंबई ते गोवा हे 10 तासांचं अंतर पार करताना प्रवाशांना सलग बसून प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना कंटाळा येत असून, त्यांना व्यवस्थित आराम करण्याची संधी मिळत नाही. यामुळे आता रेल्वे मुंबई-गोवा वंदे भारतमध्ये स्लीपर कोच जोडण्याचं नियोजन आखत आहे. यामुळे प्रवासी आता निसर्गाचा आनंद घेण्यासह आरामही करु शकतात.
मुंबई ते गोवा अंतर 586 किमी असून वंदे भारतने प्रवास करण्यासाठी 8 तासांचा वेळ लागतो. पण पावसाळ्यात ही वेळ दोन तासांनी वाढते. त्यामुळे मुंबईहून गोव्याला पोहोचण्यासाठी 10 तास लागतात. मात्र इतर ट्रेनच्या तुलनेत प्रवाशांचे 2 ते 3 तास वाचत आहेत.
नव्या वंदे भारताची वैशिष्ट्ये
नव्या वंदे भारतमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरेच बदल करण्यात येणार आहेत. उदाहरणार्थ वंदे भारत ट्रेनमध्ये इंजिन बसविलेले नसून कोचमध्येच इंजिन बसवण्यात आले आहे. मात्र या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये दोन इंजिन बसवण्यात येईल, जे एक समोर आणि मागील बाजूस एक इंजिन असेल.
याशिवाय यामध्ये पुश-पुल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, ज्यामुळे ट्रेनला लगेच वेग मिळेल. यामध्ये एक इंजिन ट्रेनला पुढे खेचले तर दुसरे इंजिन मागून ट्रेनला धक्का देईल. जेणेकरून स्थानकावर ट्रेन वळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. हे दोन्ही बाजूंनी ऑपरेट केले जाऊ शकते.