fbpx

Hamza Saleem Dar: हमजा सलीम दारने रचले अनेक विक्रम एका षटकात सहा षटकार, 24 चेंडूत शतक आणि 43 चेंडूत 193 नाबाद धावा

Hamja Salim Dar

Hamza Saleem Dar | हमजा सलीम दार: स्पेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या युरोपियन क्रिकेट सीरीजमध्ये हमजा सलीम दारने झंझावाती खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले आणि क्रिकेटच्या रेकॉर्ड बुक मध्ये मानाचे स्थान प्राप्त केले. युरोपियन क्रिकेट मालिकेत मंगळवारी (५ डिसेंबर २०२३) कॅटालुनिया जग्वार आणि सोहल हॉस्पिटल यांच्यात सामना झाला. या सामन्यात कॅटालोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा फलंदाज हमजाच्या या धुव्वाधार खेळीमुळे त्यांनी अवघ्या 10 षटकांत 257 धावा केल्या. येथे विशेष गोष्ट म्हणजे हमजाने संपूर्ण संघाच्या एकूण स्कोअरपैकी 75% धावा केल्या.

T10 लीगमध्ये रचला इतिहास

कॅटालोनिया जग्वारचा सलामीचा फलंदाज हमजा सलीम दार याने T10 लीगमध्ये इतिहास रचला आहे. त्याने अवघ्या 43 चेंडूत 193 धावांची खेळी केली आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी तो मैदानात उतरला आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. युरोपियन क्रिकेट मालिकेतील 45 व्या सामन्यात सोहल हॉस्पिलेटच्या संघाला एकही बळी घेता आला नाही. त्याचवेळी कॅटालोनियाने एकही विकेट गमावली नाही. 10 षटकात 25.70 च्या धावगतीने 257 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सलीमच्या 193 धावाशिवाय यासिल अलीने 58 धावांचे योगदान दिले. यासिरने 19 चेंडूत नाबाद 58 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि सात षटकार आले. त्याचा स्ट्राइक रेट 305.26 होता.

14 चौकार आणि 22 षटकार, 448.83 चा स्ट्राइक रेट

सलीमने आपल्या ऐतिहासिक खेळीत 14 चौकार आणि 22 षटकार मारले. त्याने 448.83 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि अवघ्या 24 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला. कॅटालोनियाच्या डावातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या महंमद वारिसच्या षटकात एकूण 43 धावा झाल्या. सलीमने या षटकात सलग सहा षटकार ठोकले. नऊ चेंडूंच्या या षटकात दोन वाइड आणि एका नो बॉलचाही समावेश होता. सलीमने या षटकात चौकार मारला आणि त्यानंतर त्याने सलग सहा षटकार ठोकले.

हे ही वाचा : IPL 2024 लिलाव: तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे जाहीर, पहिल्यांदाच भारताबाहेर होणार लिलाव

कॅटालोनियाने 10 षटकात केल्या 257 धावा

वंदे महाराष्ट्र ला मिळालेल्या माहिती नुसार, प्रथम फलंदाजी करताना कॅटालोनिया संघाने निर्धारित 10 षटकात एकही विकेट न गमावता 257 धावा केल्या. सलीमने 193 धावांची नाबाद खेळी तर यासिरने 58 धावांची नाबाद खेळी खेळली. दोन षटकांत ४४ धावा देणारा शहजाद खान सोहल हा संघाचा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. संघाच्या एकाही खेळाडूला विकेट मिळाली नाही. 258 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सोहल हॉस्पिटलचा संघ आठ गडी गमावून केवळ 104 धावा करू शकला आणि 153 धावांनी सामना गमावला. रझा शहजादने सर्वाधिक 25 धावा केल्या. कमर शहजाद 22 धावा करून बाद झाला तर आमिर सिद्दीकी 16 धावा करून बाद झाला. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही.

हमजा सलीम दारची गोलंदाजीतही चांगली कामगिरी

कॅटालोनियासाठी हमजा सलीम दारने गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत तीन बळी घेतले. त्यांच्याशिवाय फैजल सरफराज, फारुख सोहेल, अमीर हमजा आणि कर्णधार उमर वकास यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. सलीमने दोन षटकांत १५ धावा देत तीन बळी घेतले.