Luna-25 Crash: लुना २५ क्रॅश, रशियाची चंद्र मोहीम अयशस्वी
Luna-25 Crash: रशियाचे चंद्रयान लुना-25 क्रॅश झाले असून त्यासोबत त्यांचे चंद्रावर उतरण्याचे प्रत्येक स्वप्नही भंगले आहे. या घटनेने लोकांना 2019 चा तो क्षण आठवला जेव्हा भारताचे चांद्रयान-2 क्रॅश झाले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे किती कठीण आहे हेही या मोहिमेतील अपयशावरून दिसून येते. रशिया आणि भारत या दोन्ही देशांना त्यांच्या चंद्र मोहिमेकडून खूप आशा आहेत. लुना-25 सोमवारी चंद्रावर उतरणार होते पण आता ते इतिहासजमा झाले आहे. लुना-25 चा अपघात हा रशियाबरोबरच चीनसाठीही मोठा धक्का आहे. रशियन मोहिमेबाबत चीनही उत्साही होता. सोव्हिएत युनियनच्या समाप्तीनंतर चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणारे लुना-25 हे पहिले रशियन अंतराळयान होते. आता चीनी मीडिया Luna-25 च्या बातम्या चालवण्यास टाळाटाळ करतांना दिसत आहेत.
Luna-25 Crash: चुकीच्या कक्षेत गेल्याने यान नियंत्रणाबाहेर गेले
रशियाचे’ चंद्रयां लुना-25 हे भारताच्या चांद्रयान-3 च्या दोन दिवस आधी सोमवारी चंद्रावर उतरणार होते. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार होते. पण लुना-25 अंतराळ यान नियंत्रणाबाहेर गेले आणि चंद्रावर कोसळले. चुकीच्या कक्षेत गेल्याने यानावरचा ताबा सुटला आणि ते चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाले असे रशियन अंतराळ एजन्सी रोसकॉसमॉसने सांगितले. या क्रॅशची माहिती देताना रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने म्हंटले आहे की Luna-25 एका ‘असामान्य स्थितीत’ अडकल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले. या अंतराळ संस्थेने नोंदवले होते की अवकाशयान लँडिंगपूर्वी चंद्राच्या कक्षेत गेल्याने त्याचा संपर्क तुटला होता.
हे ही वाचा : महिंद्रा आणणार स्कॉर्पियो आणि बोलेरोचे इलेकट्रीक व्हर्जन
दोन्ही देशांनी 2021 मध्ये लुना-25 साठी घोषणा केली होती
वंदे महाराष्ट्र ला मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची रशियासोबत चंद्रावर तळ बनवण्याची इच्छा होती. प्रस्तावित तळाच्या बांधकामामुळे चीनला अमेरिकेसह इतर अवकाश महासत्तांना आव्हान द्यायचे होते. Luna-25 च्या संदर्भात, रशियन आणि चिनी अंतराळ संस्थांनी 2021 मध्ये घोषित केले की ते एकत्रितपणे तयार करण्यास सहमत आहेत. चीनी मीडियानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला रशियन आणि चिनी शिष्टमंडळांची रशियाच्या वास्तोचन कॉस्मोड्रोम येथे भेट झाली, ज्याचे नेतृत्व चीनच्या अंतराळ संशोधन प्रकल्पाचे मुख्य डिझायनर वू यानहुआ यांच्या नेतृत्वात झाले. मिशन अयशस्वी झाल्यानंतर चिनी माध्यमे त्यावर चर्चा करण्यास टाळाटाळ करत आहेत. मुख्य चीनी वृत्तसंस्थेने फक्त पाच ओळींचा संदेश जारी केला.
रशियाला पुन्हा एकदा सर्वकाही शिकावे लागेल
कम्युनिस्ट नेते हू झिजिन यांनी एका वृत्तपत्रात लिहिले आहे की, “या अपयशामुळे रशियाच्या महत्त्वाकांक्षेला ठेच लागली आहे. असे असले तरीही केवळ एका चंद्र मोहिमेच्या अपयशामुळे पाश्चात्य देशांनी रशियाला कमी लेखू नये.” अंतराळ इतिहासकार अलेक्झांडर झेलेझ्नायाकोव्ह यांनी एका रशियन मीडियाला सांगितले की, आता आपल्याला सर्वकाही पुन्हा शिकावे लागेल. आत्मविश्वासाने चंद्रावर कसे उडायचे आणि कसे उतरायचे हे आपल्याला शिकले पाहिजे. पुन्हा एकदा सर्वकाही शिकूनच चीनसह इतर देशांसोबत प्रकल्प सुरू केले पाहिजेत.
लुना -25 प्रकल्प काय होता
भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले. सुमारे एक महिन्यानंतर, 11 ऑगस्ट रोजी रशियाने लुना -25 लाँच केले. प्रक्षेपणानंतर अवघ्या सहा दिवसांत लुना-25 चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. हा एक रोबोट होता जो बलाढ्य सोयुझ रॉकेटमधून चंद्राच्या दिशेने निघाला होता. चांद्रयान-३ च्या आधी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. असे झाल्यास रशिया हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला असता. Luna-25 एक वर्षाच्या मोहिमेसाठी चंद्रावर जाणार होते आणि त्याचे वजन सुमारे 1,750 किलो होते. त्यात रोव्हर नव्हता, पण त्यात आठ पेलोड होते. त्यांचा उद्देश मातीची रचना, ध्रुवीय बाह्यमंडलातील धूलिकणांचा अभ्यास करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेले पाणी शोधणे हा होता.
जगाला मोठा संदेश
चंद्रावर सॉफ्ट-लँडिंग किती कठीण आहे हे लुना-25 च्या अपयशाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 1976 पासून, चीन हा एकमेव देश आहे जो चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाला आहे. ते चंगे 3 आणि चंगे 4 सह दोनदा यशस्वी झाले आहे आहेत. गेल्या दहा वर्षांत भारत, इस्रायल, जपान आणि आता रशियाचे प्रयत्न केले आहेत पण त्यांचे सारेच प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. चांद्रयान-३ यशस्वीरित्या उतरल्यास अमेरिका, माजी सोव्हिएत युनियन आणि चीननंतर चंद्रावर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. तसेच, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा पहिला देश असेल.
आता Luna-26 लाँच होणार आहे
रशियासाठी युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या मध्यावर चंद्रावर मोहीम पाठवणे हा केवळ संशोधनाचाच नाही तर त्याच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न होता. चंद्र मोहिमेच्या लुना मालिकेचा भाग म्हणून लुना-25 हे नाव देण्यात आले. 1960 आणि 1970 च्या दशकात सोव्हिएत युनियनने लुना मालिकेचे अनेक प्रयोग केले. 1976 मध्ये प्रक्षेपित केलेले लुना-24 हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे शेवटचे अंतराळयान होते. आता लुना 25 च्या अपयशानंतर रशिया पुढील तीन वर्षांत लुना-26 लाँच करण्याच्या तयारीत आहे.