Zatpat Karodpati Kase Vhave : ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाचे शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रकाशन
Zatpat Karodpati Kase Vhave : ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वास्तूत ‘झटपट करोडपती कसे व्हावे?’ या अमोल निरगुडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते, वक्ते आणि लेखक माननीय श्री. शरद पोंक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
काय म्हणाले शरद पोंक्षे?
जे मनात असते ते कागदावर उतरवले जाते. त्यातूनच एखादी कथा,कविता आकारास येते. ती वाचकांच्या मनात रुंजी घालते.लेखक अमोल निरगुडे यांनी त्यांच्या अनुभवातील अनेक किश्यांना कथेचे रूप दिलेले आहे.कोणताही आविर्भाव त्यांच्या लेखनात नाही. म्हणूनच त्यांचे लेखन जवळचे वाटते. त्यांच्यातील सामाजिक संवेदना अतिशय महत्वाची असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाच्या प्रकाशन
शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अमोल निरगुडे यांच्या ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहोळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लेखक अमोल मोहन निरगुडे,अश्विनी अमोल निरगुडे, शारदा रघुनाथ घरत, रघुनाथ नारायण घरत, सुनील रमाकांत केदारे, अनघा सुनील केदारे, अवनी घरत, प्रणव घरत, प्रा.रुपेश महाडिक, विद्याधर ठाणेकर,अमित भावे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा : प्रा. प्रज्ञा पंडित यांच्या ५ पुस्तकांचे शिरीष काणेकर यांच्या हस्ते प्रकाशन
पैसा आणि आनंद यांचा संबंध जोडणे चुकीचे
यावेळी बोलताना पोंक्षे म्हणाले की,” समाधान आणि आनंद यांचा संबंध पैश्याशी जोडणे चुकीचे आहे. आनंदी आणि समाधानी कसे रहावे याची माहिती कुठल्याही पुस्तकात मिळत नाही.पण अमोल निरगुडे यांनी मात्र आनंदी जगण्यासाठी जी दृष्टी असावी लागते हे अनेक कथांमधून मांडलेले आहे.
सावकारी करणारा तुकाराम बोल्होबा आंबिले नावाचा सामान्य माणूस, आपला सगळा पैसे अडका, जमीन जुमला आणि धान्य दुष्काळात ज्याचं त्याला देऊन टाकतो आणि कफल्लक होतो. पण तिथूनच त्याचा खरा ‘करोडपती’ होण्याचा प्रवास सुरू होतो. त्यांच्या विचारांची श्रीमंती त्याला जगण्याचा नवा मार्ग देऊन जाते आणि सामान्य माणसाचा जगद्गुरु संत तुकाराम तयार होतो. त्याच पद्धतीने केवळ पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचारांनी आणि छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाने ‘करोडपती’ होण्याचा अतिशय सरळ साधा सोपा मार्ग लेखक श्री अमोल निरगुडे यांनी त्यांच्या ‘झटपट करोडपती कसे व्हावे?’ या पुस्तकातून दाखवला आहे. त्यांच्यातील सामाजिक संवेदना अतिशय महत्त्वाची आहे . सावकार तुकाराम ते संत तुकाराम महाराज हा प्रवास ज्यादिवशी आपल्याला समजेल त्यादिवशी सर्वच विवंचना संपतील.” असेही त्यांनी सांगितले.
लेखक आणि पाहुण्यांनी व्यक्त केल्या भावना
यावेळी लेखक अमोल मोहन निरगुडे यांनी मनोगत व्यक्त करून लेखनाचा प्रवास सांगितला. मैत्रीवर त्यांची कविता उपस्थितांची दाद मिळवून गेली. प्रा.रुपेश महाडिक म्हणाले,”लहानपणी आपण मोठ्या मोठ्या जाड्या पुस्तकांमध्ये पिंपळाचे पान ठेवून द्यायचो आणि खूप वर्षांनी जेव्हा आपण ते पुस्तक उघडून बघतो तेव्हा त्या पानाची मस्त जाळीदार नक्षी तयार झालेली असते. त्या सुंदर नक्षी कडे बघता बघता आपला जुनाज रम्य भुतकाळ आपल्याला पुन्हा पुन्हा खुणावतो. अशीच स्मरणीय नक्षी लेखक अमोल निरगुडे (अ नि र) यांनी त्यांच्या झटपट करोडपती कसे व्हावे या पुस्तकातून चितारली आहे.” हे सांगून त्यांनी पुस्तकाच्या समीक्षेचे अंग कथन केले.तसेच प्रत्येकाने पुस्तक वाचावे असे आवाहन केले. यावेळी विद्याधर ठाणेकर, अमित भावे यांचीही भाषणे झाली.
स्तोत्र पठण स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण
यावेळी प्रज्ञा स्रोत्र अध्ययन वर्गातर्फे घेण्यात आलेल्या स्तोत्र पठण स्पर्धेतील विजेत्यांना लेखिका पूनम कर्णिक, अर्चिस जोशी, मनिष पंडित यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी बोरकर, जोश्ना धुरी, प्रार्थना केंगार, मनुजा सोनुने यांनी केले.
‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे यांच्या हस्ते डोंबिवली येथेही प्रकाशन
या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी डोंबिवली येथेही पार पडणार आहे. त्या निमित्त एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवलीकरांसमोर होणार आहे. तरी या सोहळ्याला सर्व रसिक वाचकांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती शारदा प्रकाशन चे सर्वेसर्वा श्री. संतोष राणे यांनी केली आहे.