fbpx

Gaurav More: मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये! – गौरव मोरे

Zatpat Karodpati Kase Vhave Vol2

Gaurav More | गौरव मोरे: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सुप्रसिध्द विनोदी अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत डोंबिवली च्या सर्वेश हॉल मध्ये एक शानदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लेखक अमोल निरगुडे यांच्या ‘झटपट करोडपती कसे व्हावे?’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गौरव मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना गौरव मोरे यांनी लेखक अमोल निरगुडे यांच्या लेखन शैलीचे कौतुक केले तसेच त्यांना त्यांच्या लेखन प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. आपले मनोगत व्यक्त करताना गौरव मोरे यांनी त्यांचे बालपण, शिक्षकांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि मराठी चित्रपट व्यवसायाची सद्य स्थिती यावरही मोकळेपणाने भाष्य केले.

मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये!

“मराठी चित्रपटांच्या दुरवस्थेला मराठी प्रेक्षक काही प्रमाणात जबाबदार आहेत. इतर प्रादेशिक भाषेत येणारे चित्रपट मात्र सुपरहिट होतात. तेथील स्थानिक कलावंत एका रात्रीत सुपरस्टार होतात. याचे कारण त्या त्या भाषेतील लोक आपल्या भाषेतील चित्रपट आवर्जून पाहतात. मात्र मराठी चित्रपट आपलेच मराठी प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे कलावंत म्हणून वाईट वाटते. प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवू नये.” असे आवाहन हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोरे यांनी केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अमोल मोहन निरगुडे यांच्या “झटपट करोडपती कसे व्हावे” या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करताना प्रमुख पाहुणे म्हणून तो बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लाखो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या प्रसिद्ध शिक्षिका
शैलजा जोशी, रेखा गोखले ,दिपाली काळे, सुहासिनी कुलकर्णी , तसेच लेखक अमोल निरगुडे ,अश्विनी निरगुडे, प्रकाशक डॉ.संतोष राणे , अमित भावे, प्रकाश चांदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अभिनय क्षमता जबरदस्त असूनही अनेक वर्ष स्ट्रगल

“मराठी अभिनेते जेव्हा हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेत जेव्हा दुय्यम भूमिका करतात तेव्हा आपलेच प्रेक्षक त्यांच्यावर टीका करतात, हे अयोग्य असल्याचे सांगून गौरव मोरे पुढे म्हणाले,” मराठी चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीत ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. मराठी कलावंतांमध्ये अभिनय क्षमता जबरदस्त असूनही अनेक वर्ष स्ट्रगल करण्यातच  जातात. मराठी प्रेक्षक भाषेचा अभिमान बाळगून जाणीवपूर्वक चित्रपट पाहतील तेव्हाच मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस येतील”, अशा शब्दांत गौरव मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी आज जो काही आहे तो माझ्या शिक्षकांमुळे

गौरव मोरे पुढे म्हणाले,” मी आज जो काही आहे तो माझ्या शिक्षकांमुळे आहे. फिल्टर् पाड्यातील शाळेत शिकत असताना माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला सतत प्रोत्साहन दिले. माझ्यातील नकारात्मक गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत मजल मारू शकलो. एकांकिका करण्यासाठी मी अनेक कॉलेजेस बदलली. एखाद्या गोष्टीचा सततचा ध्यास आपल्याला यशापर्यंत पोहोचवतो. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करण्याची तयारी ठेवायला हवी. सध्या माझे काही चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गांवर आहेत. मला रसिकांनी असाच आशीर्वाद द्यावा ज्यामुळे मी अधिकाधिक उत्कृष्ट अभिनय करू शकेन.”

हे ही वाचा: ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाचे शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रकाशन

“झटपट करोडपती कसे व्हावे” च्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन

यावेळी गौरव मोरे यांच्या हस्ते “झटपट करोडपती कसे व्हावे” या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. डॉ.नाना भोंग यांच्या “साँच” या  आत्मकथनाला “वि. स.खांडेकर” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सतीश खोत यांनी अभिनेता गौरव मोरे याचे रेखाटलेले अर्कचित्र लेखक अमोल निरगुडे यांच्या हस्ते भेट देण्यात आले.या वेळी लेखक अमोल निरगुडे ,अमित भावे , दिपाली काळे, प्रकाश चांदे, डॉ. संतोष राणे यांचीही भाषणे झाली. या प्रकाशन सोहोळ्यासाठी प्रा.शुक्राचार्य गायकवाड, अनिल कालेकर ,अमित भावे, भीमराव रायभोळे, अवनी निरगुडे, अदिती अभ्यंकर, कवी नारायण गाडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.