ZEST 2022: आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिनांक २ ते ४ डिसेंबर २०२२ या दिवसात ‘झेस्ट २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ZEST 2022: विविध विषयांवर प्रदर्शन
या कार्यक्रमाच्या बरोबरच मुलुंड आणि आसपासच्या परिसरातील विविध शैक्षणिक,सांस्कृतिक संस्थांच्या सहभागातून एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रदर्शनात परदेशी शिक्षणाच्या संधी, विदेशी भाषा प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज, ब्रेन मॅपिंग, माईंड पॉवर, नुट्रीशनल कॉउंसेल्लिंग, आर्ट वर्कशॉप, ब्रह्मविद्या,योगविद्या, डिझायनिंग क्षेत्रातील संधी या सारखी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत उपयुक्त ठरणारी विविध दालने आहेत.
ZEST 2022: मुलुंड मध्ये प्रथमच मोबाईल प्लॅनेटेरियम
विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांची ओळख व्हावी या हेतूने मुलुंड मध्ये प्रथमच मोबाईल प्लॅनेटेरियम उभारण्यात येणार असून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही तारांगणाचा आनंद लुटता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना विकसित करण्याच्या हेतूने विविध कलांचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांतर्फे ३ दिवस गायन,वादन,नाट्य आणि नृत्याचे सादरीकरण होणार आहे.
ZEST 2022: झेस्ट २०२२ ची रूपरेषा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना तीन दिवस विविध मान्यवरांचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. झेस्टच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.ए. पी. जयरामन ( न्यूक्लीयर शास्त्रज्ञ ) हे विद्यार्थ्यांना ” वैज्ञानिक दृष्टिकोन कसा बाळगावा ” यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक ३ डिसेंबर रोजी प्रमुख अतिथी श्रीमती धार्मिष्ठा भाटिया शाह या गुंतवणूक सल्लागार असून त्या ” गुंतवणूक – लवकर का सुरु करावी ” यासंबंधी माहिती देणार आहेत तसेच सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध लेखक श्री अमृत देशमुख हे त्यांच्या “मिशन मेक इंडिया रीड” या उपक्रमाविषयी माहिती सांगणार आहेत.
रविवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय चाणक्य अभ्यास मंडळाचे उपसंचालक आणि मॅनॅजमेन्ट गुरु डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे विद्यार्थ्यांना का वाचावे ,कसे वाचावे आणि काय वाचावे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत .
ऍडव्होकेट अंकिता अनिल होरणे यांचा सन्मान
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ५ डिसेंबर रोजी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच सकारात्मक पालकत्व म्हणजे नक्की काय याचा वस्तुपाठ मिळावा या हेतूने ऍडव्होकेट अंकिता अनिल होरणे या युवतीचा सन्मान करण्यात येणार आहे.
जन्मतः सेरेब्रल पाल्सी असूनही आपल्या पालकांच्या निकोप आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि स्वतःवरील जाज्वल्य आत्मविश्वासामुळे पुण्यातून आज वकिलीची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन आपल्या वडिलांबरोबर वकिलीचा व्यवसाय करणाऱ्या ऍडव्होकेट अंकिता अनिल होरणे या युवतीचा सन्मान करण्यात येणार आहे.
सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असलेला पालक, विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी आवर्जून पाहावा, अनुभवावा असा हा एक आगळा वेगळा विविधरंगी कार्यक्रम दिनांक २ डिसेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ५ ते १० या वेळेत साजरा होत आहे.
ZEST 2022 कार्यक्रम स्थळ
डॉ. यशवंतराव दोडे वर्ल्ड स्कूल विद्यालय मार्ग ,राजे संभाजी क्रीडांगणाच्या समोर ,मुलुंड पूर्व मुंबई ८१.