हमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने बांगलादेशातील सिल्हेट येथे इतिहास घडवला. श्रीलंकेचा ८ विकेटनी पराभव करून सातव्यांदा महिला आशिया कपचे विजेतेपद मिळवले.
भारताचे वर्चस्व
बांगलादेशातील सिल्हेट येथे संपन्न झालेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर वर्चस्व गाजविले. कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेचा आठ गडी राखत दारूण पराभव केला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. २५ चेंडूत ५० धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले.
सातव्यांदा जिंकला आशिया चषक
आशिया कप जिंकण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. आतापर्यंत ८ वेळी ही स्पर्धा झाली आहे. २००४ साली भारताने प्रथम विजेतेपद मिळवले होते. तेव्हापासून २०१६ पर्यंत सलग सहा विजेतेपद टीम इंडियाने मिळवली होती. २०१८ मध्ये अंतिम सामन्यात भारताचा बांगलादेशने पराभव केला होता. आता पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला.
श्रीलंकेची पडझड
अंतिम सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसर्या षटकातच पडझड सुरू झाली, जेव्हा चामरी अथापथु तिच्या 6 धावांसाठी डझनभर चेंडू खाऊन धावबाद झाली. तिची सलामीची जोडीदार अनुष्का संजीवनीही चौथ्या षटकात धावबाद झाली. भारताच्या रेणुका ठाकूर आणि फिरकीपटूंनी तिखट मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. ठाकूरच्या सुरुवातीच्या झटक्यांमुळे चौथ्या षटकात श्रीलंकेची अवस्था ९/४ अशी झाली आणि त्यानंतर स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी उर्वरित लाईनअपमधून प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर दीप्तीने 4-0-7-0 असा अप्रतिम गोलंदाजी करत त्यांना 20 षटकांत फक्त 65/9 पर्यंत ठेवले.
स्मृती मानधनाचे आक्रमक अर्धशतक
प्रत्युत्तरात उपकर्णधार स्मृती मानधना हिने आक्रमक अर्धशतक झळकावत खेळ नऊ षटकांत आटोपला. विजयासाठी फक्त ६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या भारतीय संघाला ३२ धावांवर पहिला धक्का बसला. शेफाली वर्मा ५ धावांवर बाद झाली तर जेमिमा रॉड्रिग्ज फक्त २ धावा करून माघारी परतली. यामुळे भारताची अवस्था २ बाद ३५ अशी झाली होती. मंधानाने सेटल होण्यासाठी वेळ घेतला आणि पहिल्या सहा चेंडूत ती फक्त 1 धाव काढून खेळात होती. पण तिने लगेच गीअर्स बदलले आणि २५ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. स्मृतीने यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. हरमनप्रीत कौरने नाबाद ११ धावा केल्या. एका क्षणी ती तिचे अर्धशतक शकणार नाही असे वाटले होते पण एक सुंदर चौकार लगावत तिने धावांची बरोबरी साधली आणि पुढे विजयासाठी फक्त एका धावेची गरज असताना षटकार खेचून विजय मिळवलाच पण आपले अर्धशतकही पूर्ण केले.
कौतुकाचा वर्षाव
भारतीय महिला संघाने केलेल्या या चमकदार कामगिरीचे अनेक स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यामध्ये सर्व आजी-माजी खेळाडूंचा समावेश आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर, माजी कर्णधार मिताली राज, गौतम गंभीर, बीसीसीआय सचिव जय शाह, सुनील जोशी अशा अनेक खेळाडूंनी तसेच वरिष्ठ सहकाऱ्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.