यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. या स्पर्धेतील अनपेक्षित निकालांमुळं ही स्पर्धा नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील.
या स्पर्धेतील एकूण सहा सामन्यात अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. यातील तीन सामने पात्रता फेरीतील आहेत. तर, उर्वरित तीन सामने सुपर 12 फेरीतील आहेत.
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यांपूर्वी पात्रता फेरीतील सामने पार पडले. पात्रता फेरीतही काही अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले.
टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात नामिबियाच्या संघाने आशिया चषक विजेत्या श्रीलंका संघावर ५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील सामन्यातला सर्वात मोठा उलटफेर म्हणजे स्कॉटलँडच्या संघानं निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव करून त्यांन पात्रता फेरीतच सामना गुंडळायला लावलं.
टी-20 विश्वचषकाच्या 20व्या सामन्यात इंग्लंड आणि आयर्लंडचा संघ एकमेकांशी भिडले होते. या सुपर 12 फेरीतील सामन्यात आयर्लंडनं डकवर्थ लुईच्या नियमांतर्गत इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला होता.
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात पर्थ येथे झालेल्या सामन्यात झिम्ब्बाब्वेने दिलेल्या 131 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. हा सामना पाकिस्तानचा संघ एकतर्फी जिंकेल असं वाटत असताना झिब्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानला हरवून संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात अनपेक्षित निकाल म्हणजे चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्स संघानं 13 धावांनी केलेला पराभव. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तसेच पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडले.
एकूणच यावेळची T २० विश्वचषक स्पर्धा या उलट फेरांमुळे रंगतदार झाली. धक्कादायक निकालांची ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींच्या कायम स्मरणात राहील.