Vedaat Marathe Veer Daudale Saat -‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ची घोषणा

Vedaat Marathe Veer Daudale Saat: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या शिवचरित्रावर आधारित असलेल्या चित्रपटांची लाट आली आहे. हिरकणी, फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, तानाजी असे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षात आले आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. या वर्षी ‘शेर शिवराज’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. दिगपाल लांजेकर त्यांच्या ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटावर काम करीत आहेत आणि आता दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनीही एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे जो शिवचरित्रावर आधारित आहे. मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedaat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा मुंबईत नुकताच पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रताप सरनाईक यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

Vedaat Marathe Veer Daudale Saat: अक्षय कुमारचे मराठीत पदार्पण

महेश मांजेरकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार मराठीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. महाराजांच्या सात वीरांचीही यावेळी ओळख करून देण्यात आली. या चित्रपटात अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशीही मल्हारी लोखंडे यांच्या भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. याबरोबरच बिग बॉस फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल कदम यांचीही चित्रपटात वर्णी लागली आहे. या चित्रपटात जय दुधाणे तुळजा जामकर यांची भूमिका साकारणार आहे, विशाल निकम चंद्राजी कोठार यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर उत्कर्ष शिंदे सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत असणार आहेत. विराट मडके आणि सत्या मांजरेकर अनुक्रमे जिवाजी पाटील आणि दत्ताजी पागे यांच्या भूमिका साकारणार आहेत.

इतर महत्वाच्या भूमिकांमध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वे, दीपाली सय्यद, गौरी इंगळे असणार आहेत. हा चित्रपट मराठी शिवाय हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. २०२३ च्या दिवाळी मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा: रितेश देशमुखचा ‘वेड’

काय म्हणाला अक्षय कुमार?

अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वीकारण्यामागील कारण या सोहळ्यात सांगितलं. राज ठाकरेंमुळे ही भूमिका स्वीकारल्याचं अक्षय कुमारने सांगितलं. तो म्हणाला, “मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन”.

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीवरून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख “वेडात वीर मराठे दौडले चाळीसचे निर्माते, दिग्दर्शक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”, असा केला. त्यावरून उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. पुढे बोलताना त्यांनी महेश मांजरेकर यांचे कौतुकही केले. “कोणी वेड्याने धावणारा असेल तर ते महेश मांजरेकर आहेत. प्रत्येकवेळी ते नवं आणि भव्य स्वप्न घेऊन येतात. ‘वेडात वीर मराठे दौडले सात’ (Vedaat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटाबाबत मला महेश मांजरेकरांनी पाच वर्षांपूर्वी माहिती दिली होती. आज मराठीतला सर्वात मोठा चित्रपट तुमच्यापुढे येत आहे. आज मराठी चित्रपटसृष्टी पुढे जाते आहे. त्याचं मोठं क्षेत्र, महेश मांजरेकरांना जाते”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

आज मराठी चित्रपटसृष्टीत ज्या मोजक्या लोकांना मराठी चित्रपट समजतो, त्यापैकी महेश मांजरेकर एक आहेत. त्यामुळे हा चित्रपट भव्य असेल, यात कोणतीही शंका नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *