Vasu Baras 2022: भारतीय संस्कृतीत दिवाळी (Diwali 2022) सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीला मान आहे. दिवाळी आपल्यासोबत समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येते. हिंदू कालदर्शिकेनुसार, आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारसपासून दिवाळी पर्वाला सुरुवात होते. धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी वसुबारस (Vasu Baras) साजरी करण्याची परंपरा आहे.
हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, गाईमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव आहे. वसुबारसला ‘गोवत्सद्वादशी’ म्हणून देखील ओळखले जाते.
वसुबारस तिथी आणि मुहूर्त
धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसू बारस (Vasu Baras) साजरी केली जाते आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे. यावर्षी गोवत्स द्वादशी 21 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. द्वादशी तिथी 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:22 पासून सुरू होईल आणि 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:02 वाजता समाप्त होईल.
इतिहास:
समुद्रमंथनातून नंदा नावाच्या धेनूचा उगम झाला, अशी मान्यता आहे. धेनूला समर्पित असलेले वसुबारसचे व्रत केले जाते. या देशात दिवाळी खूप दिवसांपासून साजरी केली जाते. इतिहास आणि पौराणिक संदर्भांवरून, दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. तथापि, हिंदू धर्मात गायींच्या पूजेने उत्सव सुरू होतो. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी गाईचे रूप धारण करते अशी मान्यता आहे. म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा यासाठी गाईची पूजा करतात. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवशी गायी आणि वासरांची पूजा करून त्यांना अन्नदान केले जाते.
हे ही वाचा: धनत्रयोदशी / धनतेरस
वसुबारस सणाचे काही नियम
वसुबारस (Vasu Baras) सणाच्या दिवशी गहू, मूग खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाहीत, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
वसुबारस सणाचे महत्त्व
भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्याला पावन करणार्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणार्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही, असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.
आपल्या देशातील मोठा वर्ग शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय करतो. ग्रामीण भागातील लोकांसाठी शेतीसह गाईचे दूध हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. म्हणून ग्रामीण भागात लोक त्यांच्या गाय आणि वासरांची पूजा करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. यासह धार्मिकदृष्ट्या देखील वसुबारसला महत्त्व आहे.
वसू बारस सण कसा साजरा केला जातो?
वसुबारस (Vasu Baras 2022) म्हणजेच गाय आणि वासरू. या दिवशी गाय-वासराची पूजा (Vasu Baras Poojan Vidhi) करून दिवाळी पर्वाला सुरुवात होते. सकाळी गाय आणि वासरांना मांगल्य स्नान घातले जाते. या दिवशी गाय आणि वासराची एकत्रित पूजा केली जाते. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे.
सुवासिनी महिला या दिवशी गाईची हळद-कुंकू आणि अक्षता वाहत पूजा करतात. तसेच यादिवशी उडदाचे वडे, भात आणि गोड पदार्थ करून ते गाईला नैवेद्य म्हणून खाऊ घातले जाते. ज्यांच्या घरी गोधन आहेत ते पुरणाचा स्वयंपाक करत गाईला निरांजनाने ओवाळून पुरणचा नैवेद्य दिला जातो. या दिवशी महिला उपवास करतात. वसू बारसच्या दिवशी भगवान कृष्णाचीही पूजा करतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी त्यांचा आशीर्वाद घेतात. दिवाळीचा पहिला दिवस असल्याने या दिवसापासून दारात रांगोळ्या काढल्या जातात. लोक नवीन कपडे घालून आपली घरे दिवे आणि रंगांनी सजवतात.
वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो हा सण
महाराष्ट्र, गुजरात राज्यासह दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये वसुबारसचा सण साजरा केला जातो. त्यानुसार या सणाला महाराष्ट्रात वसुबारस (Vasu Baras) किंवा गोवत्स द्वादशी, गुजरातमध्ये बाग बारस आणि दक्षिण भारतात या सणाला ‘नंदिनी व्रत’ म्हणून ओळखले जाते.