Vande Bharat On Konkan Railway : रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी आज पहाटे मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ट्रायल रन घेण्यात आली. मुंबई ते शिर्डी ही १६ डब्यांची गाडी मंगळवारी शिर्डीला सोडली जात नाही. त्यामुळे १६ मे २०२३ रोजी ती कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आली. सीएसएमटी येथून पहाटे पाच वाजून ५३ मिनिटांनी ही गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. पुढील काही दिवसांत मुंबईतून चिपळूण, रत्नागिरी तसेच गोव्याकडे वातानुकूलित आणि वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसमधून (Vande Bharat On Konkan Railway) प्रवास करता येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबई ते रत्नागिरी हे अंतर अवघ्या चार तास २७ मिनिटांत, तर पनवेल ते रत्नागिरी हे अंतर जवळपास तीन तासांत पूर्ण केले.
Vande Bharat On Konkan Railway : सहा तास ५७ मिनिटांत पार केले अंतर
दुपारी एक वाजून १३ मिनिटांनी वंदे भारत एक्स्प्रेस मडगाव येथून मुंबईसाठी रवाना झाली. या चाचणीसाठी कोकण रेल्वेची मेन लाईन खुली ठेवण्यात आली होती. मुंबई-मडगाव चाचणीसाठी धावलेल्या हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसने (Vande Bharat On Konkan Railway) हे अंतर अवघ्या सहा तास ५७ मिनिटांत पार केले. या गाडीची अजून चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होईल.
मुंबई-गोवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या उद्देशाने मध्य आणि कोकण रेल्वेवरून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे. या चाचणीत सीएसएमटी ते मडगाव अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ७ तासांत पार केले. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. त्यामुळे रेल्वेने मुंबई-गोवा प्रवास करण्यासाठी कमीत कमी एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : बुलेट ट्रेन स्थानके आता स्मार्ट होणार
सध्या राज्यात चार वंदे भारत एक्स्प्रेस
चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मधील भारतीय बनावटीची सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेस आहे. देशातील सर्वात पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली ते वाराणसीदरम्यान धावली. तर सध्या राज्यात चार वंदे भारत धावत असून पाचवी वंदे भारत सीएसएमटी ते मडगाव चालवण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे.
मुंबई-गोवा प्रवास अत्यंत वेगवान होण्याची चिन्हे
मंगळवारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.५३ वाजता निघाली आणि प्रभावी वेळेत अंतर कापून दुपारी १२.५० वाजता गोव्यात पोहोचली. चाचणी करतेवेळी वंदे भारतचा उल्लेखनीय वेग पाहता भविष्यात मुंबई-गोवा प्रवास अत्यंत वेगवान होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मुंबई सेंट्रल आणि गांधीनगर यांना जोडणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या यशानंतर, मध्य रेल्वे मार्गावर मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर दोन अतिरिक्त गाडय़ा सुरू करण्यात आल्या. या गाडय़ांनी त्यांचा वेग, आराम आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी याआधीच सर्वत्र प्रशंसा मिळवली आहे.
पर्यटनाला चालना
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकर आणि पर्यटकांचा प्रवासाचा अनुभव आणखी बदलण्याची अपेक्षा आहे. मार्गाच्या चाचण्यांनी एक्स्प्रेसची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधांची कठोर चाचणी घेतली जात आहे. मुंबई आणि गोवा या दोन्ही ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याची आणि आर्थिक वाढ होणार आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.
या तपासणीचा आढावा घेऊन निष्कर्ष काढले जातील. तसेच चाचण्यांचा अंतिम अहवाल येत्या काही दिवसांत सादर केला जाईल.