Thane Railway Station : नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा तयार

Thane Railway Station : ठाणे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने खास योजना राबविणार आहे. यात धीम्या लोकलसाठी ठाण्यात नवे स्वतंत्र स्थानक बांधण्यात येणार आहे

ठाणे आणि मुलूंड रेल्वे स्थानकादरम्यान प्रस्तावित असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी मनोरुग्णालयाची जागा देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. केवळ स्थानकाच्या कामासाठीच न्यायालयाने जागा हस्तांतरण स्थगिती उठविली असून यामुळे गेले अनेक वर्षे कागदावरच असलेल्या नवीन स्थानक उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा मध्य रेल्वेने पूर्ण केला असून, धीम्या लोकलसाठी येथे स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, भविष्यात ‘ठाणे लोकल’ नव्या स्थानकातून सोडण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. नव्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या डेकला पूर्व द्रुतगती महामार्गाची जोडणी देण्यात येणार आहे.

Thane Railway Station : कसे असेल नवे ठाणे स्थानक?

पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मनोरुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे स्थानक उभारण्यात येणार आहे. मनोरुग्णालयाची एकूण जागा ६ हेक्टर असून, यापैकी १.३ हेक्टर जागेत नव्या स्थानकाची उभारणी होणार आहे. नव्या ठाणे स्थानकामध्ये होम फलाटासह दुतर्फा तीन फलाट असतील. स्थानकात तीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून, यापैकी दोन पुलांची जोडणी फलाटांना आणि एका पुलाची जोडणी पूर्व-पश्चिम असेल. स्थानकात २५० बाय ३० मीटर उन्नत डेक उभारण्यात येणार असून, हा डेक महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यासोबतच सरकते जिने, लिफ्ट या आधुनिक सुविधा फलाटांवर असतील.

हे ही वाचा:

धीम्या लोकल नवीन ठाणे स्थानकातून

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड स्थानकातून दररोज ८००हून अधिक लोकल फेऱ्या होतात. ठाण्यातून ट्रान्स हार्बर, मुख्य आणि मेल-एक्स्प्रेससह एकूण १ हजार ३००हून अधिक रेल्वे फेऱ्यांची हाताळणी होते. यामुळे नव्या ठाणे स्थानकात सध्याच्या ठाणे स्थानकातील धीम्या लोकल वळवून प्रवासी गर्दी विभागण्यात येणार आहे. जलद लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सध्याच्या ठाणे स्थानकातूनच चालवण्याचे नियोजन आहे. नव्या ठाणे स्थानकासाठी अपेक्षित खर्च १८३ कोटी रुपये असून, ठाणे स्मार्ट शहरांतर्गत स्थानक आणि परिसरासाठी २८९ कोटींची तरतूद आहे. हा खर्च ठाणे महापालिकेकडून मध्य रेल्वेला देण्यात येणार आहे.

दोन वर्षांत स्थानकाचे काम पूर्ण करण्याची योजना

राज्य सरकारकडून मनोरुग्णालयाची जमीन आणि ठाणे महापालिकेकडून निधीचा पहिला टप्पा वितरीत झाल्यावर रेल्वेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन वर्षांत स्थानकाचे काम पूर्ण करून प्रवासी वाहतुकीसाठी नवे स्थानक खुले होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *