करोनाने संसर्गाने गेली दोन वर्षे साजरा न झालेला दहीहंडी उत्सव यंदा मात्र महाराष्ट्र भरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण महाराष्ट्रासह जगावर करोनाचे सावट होते. त्यामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, सण किंवा उत्सव साजरे करता आले नाही. या वर्षी मात्र करोनाचे सावट दूर झाल्याने आता सण आणि उत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरे होणार आहेत. ठाण्यातही ह्या वर्षी दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा होणार आहे. ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी या वर्षी ठाण्यात रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या पथकाला ५-६ लाख नव्हे तर चक्क २१ लाखांचे बक्षीस मिळणार असल्याची घोषणा केली आहे.
ठाण्यातील दहीहंडी उत्सवाची पार्श्वभूमी
ठाण्यातील दहीहंडी उत्सव हा नेहमीच चर्चेत असतो. ठाण्यात चार मानाच्या दही हंड्या असतात. त्यापैकी शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली मानाची हंडी म्हणजे टेंभी नाक्याची हंडी, तसेच आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती युवा प्रतिष्ठान हंडी, आमदार रवींद्र फाटक यांची संकल्प प्रतिष्ठान हंडी, मनसेची जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांची दही हंडी या चार मानाच्या हंड्या मानल्या जातात. पूर्वी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष प्रतिष्ठानतर्फेही दही हंडीचे आयोजन केले जात होते. मात्र आता संघर्ष प्रतिष्ठानची हंडी सध्या स्थगित करण्यात आली आहे.
या वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आमदार प्रताप सरनाईक यांची हंडी ठाण्यातील वर्तकनगर परिसरात आयोजित केली जाणार आहे. ही हंडी दरवेळी नवीन रेकॉर्ड तयार करणारी हंडी मानली जाते. ठाण्यात जय जवान गोविंदा पथकाने याच प्रतिष्ठानच्या दहीहंडीत ९ थर लावून गिनीज बुकमध्ये नावाची नोंद करत विक्रम केला होता. दरवेळी प्रमाणे यावेळी देखील एक नवीन विक्रम करण्याचा मानस या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी नवीन विक्रम करणाऱ्या गोविंदा पथकाला २१ लाख रुपयांचे पारितोषिक आणि एक आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीला मोठ-मोठे नेते आणि सिने सृष्टीतील कलाकार हजेरी लावणार असल्याचे देखील सरनाईक यांनी सांगितले.
राजकीय रंग
आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ह्या वर्षीची दही हंडी आणि इतर उत्सव राजकीय पक्षांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक पक्ष आणि गट शक्तिप्रदर्शन करण्याची ही नामी संधी सोडणार नाहीत त्यामुळे हे उत्सव आणि सण अत्यंत जल्लोषात साजरे होतील यात शंका नाही.