Tesla Electric To Come In India : टेस्ला आता भारतात वाहनांचे उत्पादन करणार

Tesla Electric To Come In India : एलन मस्कची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात दाखल होऊ शकते. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी 17 मे रोजी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कंपनीने भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी उत्पादन युनिट स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, अद्याप याबाबत सरकार टेस्ला किंवा एलन मस्क यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी गेल्या वर्षीही टेस्लाने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर कंपनी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकली नाही.

Tesla Electric To Come In India : आयात शुल्क कपात नाहीच

पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत अशा वेळी टेस्लाची भारत सरकारसोबत भेट झाली आहे. टेस्लाने सरकारकडे संपूर्ण असेंबल्ड वाहनांवरील आयात शुल्क 100 टक्क्यावरून 40 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी केली होती. कंपनीने आपली वाहने लक्झरी नसून इलेक्ट्रिक (Tesla Electric) वाहने मानली जावीत असे म्हटले होते. परंतु सरकारने असे म्हटले होते की इतर देशांमधून आयात केलेल्या कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा कोणताही हेतू नाही.

हे ही वाचा: Twitter Verified Accounts : निळ्या, राखाडी आणि सोनेरी चेकमार्कचा खरोखर अर्थ काय आहे?

आयात शुल्क कपातीची मागणी बाजूला ठेवण्याची टेस्लाचे तयारी

आयात शुल्क कपात करण्याची टेस्ला आयएनसीची मागणी केंद्र सरकारने पूर्ण न केल्यामुळे टेक्सासमधील इलेक्ट्रिक (Tesla Electric) वाहन उत्पादन कंपनी टेस्लाने २०२२ साली भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतात प्रकल्प उभारण्याच्या हालचाली टेस्लाने सुरु केल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबद्दलची खात्रीलायक माहिती अद्याप अधिकृतरित्या बाहेर आलेली नाही. मात्र टेस्लाने आयात शुल्कात कपात करण्याची मागणी बाजूला ठेवून भारतात वाहन उत्पादन करण्यास तयारी दर्शविल्याचे वृत्त आहे. टेस्ला कंपनीचे एक पथक आणि अमेरिकेतील पुरवठा साखळीतील कार्यकारी अधिकारी भारत भेटीवर येणार असून केंद्रीय मंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्पासाठी कंपनीकडून सरकारकडे सुसंगत योजना सादर झाल्यास, सरकारही उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी काही सुविधा देण्याचा विचार करू शकते आणि या प्रक्रियेत काही करांमध्ये सूट दिली जाऊ शकते. उत्पादन कोणत्या राज्यात होत आहे, त्यावरही या सुविधा आधारित असतील.

चीनमधून भारतात उत्पादन स्थलांतरित

अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावामुळे कंपन्या चीनमधून भारतात उत्पादन युनिट हलवत आहेत. कोरोना महामारीनंतर अॅपलसह इतर अमेरिकन टेक दिग्गज चीनच्या बाहेर त्यांच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी काम करत आहेत. टेस्ला आणि भारत सरकार यांच्यातसुरु असलेली चर्चा यशस्वी झाली तर टेस्लाही या यादीत समाविष्ट होईल. भारत सरकार आणि टेस्ला यांच्यातील चर्चा अद्याप यशस्वी झाली नसली तरी अनेक नेत्यांनी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *