दहीहंडीसाठी ठाण्यातील वाहतूकीमध्ये बदल

ठाणे, दिनांक १८ ऑगस्ट २०२२

सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक अशी भक्कम पार्श्वभूमी असलेल्या ठाणे (Thane) शहरात दर वर्षी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात दहीहंडी (Dahi Handi) हा सण साजरा केला जातो. यंदाही टेंभी नाका येथे होणाऱ्या दहिहंडी उत्सवासाठी सर्व मंडळे सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळाष्टमीच्या दिवशी शहरातील वाहतूकीमध्ये बदल केल्याची अधिसूचना वाहतूक नियंत्रण शाखेने काढली आहे. सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी नागरिकांना केले आहे.

हे ही वाचा: दहीहंडीला आता साहसी खेळाचा दर्जा

शहरातील वाहतूकीमध्ये बदल

मुख्य पोस्ट कार्यालयाकडून (जीपीओ) कोर्टनाका मार्गे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जीपीओ कडून सिव्हिल हॉस्पिटलला जाणाऱ्या रस्त्यावर १९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून क्रीक नाकामार्गे दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह पर्यंत जायचे आहे आणि तिथून उजवीकडे वळण घेऊन ए-वन फर्निचरला वरून ही वाहने जातील. त्याचबरोबर कळवा आणि साकेत मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना उर्जिता हॉटेल जवळच्या रस्त्यावर प्रवेश बंद राहील. त्याऐवजी क्रीक नाका मार्गे डावीकडे वळण घेऊन दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलकडून उजवीकडे वळण घेऊन ए-वन फर्निचर मार्गे ही वाहने जातील. ठाणे रेल्वे स्थानकापासून टॉवर नाका, टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी सॅटिस ब्रिज मार्गे येणाऱ्या परिवहनच्या बसेस गोखले रोड मार्गे जातील. तर रिक्षा आणि चार चाकी वाहनांना सॅटिस ब्रिज खालून स्टेशन रोड मूस चौक मार्गे डावीकडे वळण घेऊन जाण्याचे आवाहन वहातुक पोलिसांनी वाहन चालकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *