आशिया चषक २०२२ मध्यल्या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या मालिकेत विजयी होणे आवश्यक होते. यातही पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली होती. त्यानंतर मात्र लागोपाठ दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मालिका विजय प्राप्त केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची चमकदार कामगिरी त्यांना या वर्षातील सर्वात महत्त्वाचा विजय मिळवून गेली. एकीकडे ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच आता टीम इंडियाने पाकिस्तानलाही मोठा दणका दिला आहे. टी २० खेळप्रकारात टीम इंडिया आता जगात भारी संघ ठरला आहे.
टीम इंडियाचा विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध या विजयासह भारताने एका वर्षात T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या T20I मधील विजय हा भारताचा २०२२ मधील T20I मधील २१ वा विजय होता. एका वर्षात T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम आतापर्यंत पाकिस्तानच्या नावे होता. पाकिस्तानने २०२१ सालात तब्बल २० टी-२० सामने जिंकले होते. आता २१ वा विजय मिळवत भारत या वर्षीचा सर्वाधिक टी २० सामने जिंकणार संघ बनला आहे. भारताने विजय प्राप्त केलेल्या २१ सामन्यांपैकी १० सामने हे मायदेशी खेळले गेले होते.
हे ही वाचा: जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबर
भारताने आजवर जिंकलेले टी-२० सामने
आजवर वेस्ट इंडिजच्या विरुद्ध सात सामने, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध प्रत्येकी दोन, श्रीलंकेच्या विरुद्ध तीन, आयर्लंड मध्ये दोन व आशिया चषकातील तीन सामने भारताने जिंकले आहेत.
भारताने आजवर गमावलेले टी-२० सामने
भारताने २०२२ मध्ये आतापर्यंत २९ पैकी २१ टी-20 सामने जिंकले आहेत. २०२२ मध्ये भारताने आशिया चषक स्पर्धेत दोन सामने गमावले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात खेळताना दोन सामने तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्ध प्रत्येकी १ सामना आजवर भारताने गमावला आहे.
दरम्यान हे वर्ष भारतीय संघासाठी खरोखरच खास ठरले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने आणखी एक विक्रम केला होता.
सलग १२ विजयांसह भारत सर्वाधिक T20 विजय मिळवणारा संघ ठरला होता.