Taraporewala Aquarium Closed: सागरी मार्गाच्या कामामुळे तारापोरवाला मत्स्यालयाच्या इमारतीला धक्का पोहोचल्याची बाब समोर आली आहे. त्या पार्शवभूमीवर ही धोकादायक इमारत त्वरित रिकामी करण्याचे आदेश मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
Taraporewala Aquarium Closed: मत्स्यालयाच्या इमारतीला धक्का
तारापोरवाला मत्स्यालयाच्या समोरच सागरी मार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतीला धक्का पोहोचल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने संरचनात्मक परीक्षणाच्या आधारे दिला आहे. त्यामुळे ही इमारत लवकर रिकामी करण्याचे आदेश (Taraporewala Aquarium Closed) मुनगंटीवार यांनी दिले आहेत. तसेच शहरात लवकरच नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा: सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारच्या हालचाली
जागतिक दर्जाचे मत्स्यालय विकसित करण्याचा प्रस्ताव
नवीन मत्स्यालय जागतिक दर्जाचे आणि सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक गणले जावे, याचे नियोजन करण्याची सूचनाही मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिली.
मत्स्यालय पर्यटकांसाठी बंद
मुंबईची ओळख असलेले तारापोरवाला मत्स्यालय काही दिवसांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. सध्या तारापोरवाला मत्स्यालयात १६ सागरी पाण्याच्या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. तर गोडय़ा पाण्यातील आणि ३२ ट्रॉपिकल टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे, अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री. मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने १९५१ साली मरीन ड्राईव्हला हे मत्स्यालय बांधण्यात आले होते.
हे दुमजली मत्स्यालय १०८ फुट लांब व ९४ फुट रुंद असून या इमारतीच्या उभारणीसाठी तीन वर्ष लागली होती. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी ८ लाख रुपये खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता.
सध्या तारापोरवाला मत्स्यालय पर्यटकांसाठी बंद असले तरी नवीन मस्त्यालयाची योजना सध्या फक्त प्रस्तावात आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आणि मत्स्यप्रेमींना मासे पाहण्यासाठी मात्र अजून बराच काळ वाट पाहावी लागेल असे दिसते.