fbpx

टी२० विश्वचषक स्पर्धा : ICC कडून बक्षिसांची आकडेवारी जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने पुरुष टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup) साठीच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. ही स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येक संघाने कंबर कसली आहे. यावर्षीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ संघ भाग घेणार आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार आहे.

बक्षीस रक्कम

आयसीसीने केलेल्या घोषणेनुसार, यंदा टी२० विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला १.६ मिलियन यूएस डॉलर म्हणजेच जवळपास १३ कोटी ४ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीमध्ये हरणाऱ्या संघाला ८ लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास ६ कोटी रुपये दिले जातील. या बातमीनंतर प्रत्येकालाच आनंद झाला आहे. तथापि, ही रक्कम आयपीएल जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या रकमेपेक्षा सुमारे ३५ टक्के कमी आहे. आयपीएल विजेत्याला जवळपास २० कोटी रुपयांचे रोख बक्षीस मिळते.

इतकंच नाही तर सेमी फायनलला पोहोचणाऱ्या संघांनाही ४ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ३ कोटी २५ लाख रुपये मिळणार आहे. या स्पर्धेसाठीची एकूण धनराशी ५.६ मिलियन डॉलर म्हणजेच ४६ कोटी रुपये असेल.

सुपर-१२ मधून बाहेर पडलेल्या आठ संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर म्हणजेच ५७ लाख रुपये मिळतील. गेल्या वर्षीप्रमाणेच सुपर-१२ मधील प्रत्येक सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघाला ४० हजार डॉलर्स म्हणजेच ३२ लाख ५३ हजार रुपये मिळतील.

हे ही वाचा : टीम इंडियाचा विश्वविक्रम

कसे आहेत ग्रूप्स

अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या आठ संघांनी सुपर-१२ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

उर्वरित आठ संघांचे चार-चारच्या दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. ‘गट अ’मध्ये नामिबिया, श्रीलंका, नेदरलँड्स, यूएई तर वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे ब गटात आहेत. या संघांना पहिल्या फेरीत खेळायचे आहे. २०२१ मध्ये युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ विजेता ठरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *