fbpx

Sri Venkateswara Swamy Vari Temple : तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती महाराष्ट्रात उभी राहणार

Sri Venkateswara Swamy Vari Temple : तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती महाराष्ट्रात उभी राहणार आहे. मुंबईतून कारने जेमतेम तासाभरात पोहोचता येईल अशा ठिकाणी अर्थात उलवे येथे हे मंदिर उभारले जाईल. या मंदिरासाठी सिडकोने 10 एकरचा भूखंड दिला आहे. याच भूखंडावर बुधवार 7 जून 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरासाठी भूमिपूजन केले.

एप्रिल 2022 मध्ये दिला भूखंड

महाराष्ट्रातील भक्तगणांना देखील श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी तिरुपती तिरुमला देवस्थानाला मंदिर उभारण्याकरिता एप्रिल 2022 मध्ये तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीसाठी भूखंड देण्यात आला होता. आता लवकरच या ठिकाणी श्री वेंकटेश्वरा स्वामी मंदिर उभारले जाईल. या मंदिरामुळे तिरुपती बालाजीच्या दर्शनाचा लाभ मुंबईतही घेता येईल.

विमानतळ आणि ट्रान्स हर्बर लिंकचा फायदा

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती असलेले मंदिर ज्या ठिकाणी उभारले जाईल त्या ठिकाणाच्या जवळच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड आहे. यामुळे या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असेल असा अंदाज आहे.

हे ही वाचा : वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी

मंदिराचे भूमिपूजन करण्याव्यतिरिक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी पण केली. विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम तसेच इतर कामे त्यांनी पहिली. तसेच या विमानतळाच्या जागेची हवाई पाहणी करून धावपट्टीचे काम कितपत झाले आहे हेदेखील जाणून घेतले.

विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील

नवी मुंबई विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असून त्याच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई विमानतळ तसेच शिवडी-न्हावा शेवा सी लिंक, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील मिसिंग लिंक आणि मुंबईतील मेट्रो मार्ग या कामांना प्राधान्य देण्यात येत असून हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरवर्षी 9 कोटी नागरिक प्रवास करतील असा प्राथमिक अंदाज आहे. या विमानतळामुळे अंधेरीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होईल. मार्च-एप्रिल 2024 पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *