Dasara Melava: शिवसेनेचा दसरा मेळावा बाळासाहेबांनी सुरु केला होता. या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे, परंपरा आहे. या लेखात आपण आजवरच्या दसरा मेळाव्याची परंपरा व त्यातील महत्त्वपूर्ण क्षणांची सविस्तर माहिती घेणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात राजकीय खडाजंगी सुरु आहे. एकीकडे ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, शिवसेना आमचीच आहे’ असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे हे शिवसेना त्यांचीच आहे असा दावा करत आहेत. विभागलेल्या शिवसेनेतील दोन्हीही गट दसरा मेळाव्यावरून एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत.
Dasara Melava: प्रथमच दोन दसरा मेळावे
शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे या वर्षी प्रथमच दोन दसरा मेळावे होत आहेत. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी दोन्ही गटांनी केलीय. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी येथील मैदानावर होत आहे तर ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे.
कडेकोट पोलिस बदोबस्त
शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून या दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून दोन्हीही मेळाव्यांसाठी कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. त्यासाठी अनेकजण मार्गस्थ झाले आहेत. पोलिसांकडून या दोन्ही मैदानांची पाहणी करण्यात आली आहे. वाढते ट्राफिक लक्षात घेता मुंबई पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमास्थळी जाणाच्या मार्गांवर वाहनांची मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी 5 ऑक्टोबर सकाळी 9 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.
Dasara Melava: सुरूवात
दसरा मेळाव्याचा परंपरेची मुहूर्तमेढ नेमकी कशी रोवली गेली, हा इतिहास अनेकांना माहिती नसेल. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या स्थापनेनंतर बराच अवधी जाहीर सभा झालेली नव्हती. कार्यकर्ते बाळासाहेबांना घरी येऊन भेटत होते, या कार्यकर्त्यांना एकत्रित भेटण्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे ठरले आणि त्याचा मुहूर्त ठरला दसरा मेळावा!
१९ जून १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर चार महिन्यांनी ३० ऑक्टोबर १९६६ ला पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता. विशेष म्हणजे १९६६ साली दसरा हा २३ ऑक्टोबरला होता. मात्र, काही कारणास्तव शिवसेनेला त्यादिवशी दसरा मेळावा आयोजित करता आला नाही. त्यामुळे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा हा दसऱ्याच्या दिवशी नव्हे तर सात दिवसांनी म्हणजे ३० ऑक्टोबरला पार पडला.
Dasara Melava: मार्मिक’ मधून पहिल्या मेळाव्याची जाहिरात
त्याकाळी मराठी वर्गात प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘मार्मिक’ या नियतकालिकामधून शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याची जाहिरात करण्यात आली होती. मार्मिकमधून मराठी नागरिकांना ३० ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या पहिल्या दसरा मेळाव्याला साधा पँट-शर्ट परिधान करुन आले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे काही मोजके नेते उपस्थित होते. अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी पार्कात सभा घेण्याऐवजी एखाद्या बंदिस्त सभागृहात सभा घ्यावी, असे सुचविले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यायचे ठरवले.
शिवसेना नेते सुभाष देसाई पहिल्या दसरा मेळाव्याच्या आठवणी सांगतांना म्हणाले, “त्यावेळी शिवाजी पार्क मैदानाचा परिसर आतासारखाच रहिवाशी भाग होता. मैदानाच्या भोवतालच्या या भागात दोन-तीन मजल्याच्या लहान इमारती होत्या. तसेच मैदानाच्या सभोवताली रांगेने नारळाची झाडे होती. दसरा मेळाव्याच्यानिमित्ताने एरवी शांत असणाऱ्या शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचंड मोठी गर्दी जमली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणावेळी ‘सायलेन्स झोन’ असलेल्या शिवाजी पार्कात टाळ्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज दुमदुमत होता. यावेळी श्रोत्यांच्या गर्दीत महिलांची संख्याही लक्षणीय होती”.
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी गर्दीत वर्गणीसाठी एक स्टीलचा डब्बा फिरवण्यात आला होता. त्यावेळी दसरा मेळाव्याला आलेल्या लोकांनी या डब्ब्यात आपापल्या परीने शिवसेनेसाठी वर्गणी दिली होती.
हे ही वाचा: एकनाथ शिंदे साहेबांनी जिंकले मन
Dasara Melava: स्वरुप
पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर हजारो शिवसैनिकांची गर्दी होत असे. त्या दिवशी आधी शस्त्रपूजन करून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात व्हायची. सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण व्हायचं. शिवसेना या पक्षात भविष्यातली रूपरेखा दसरा मेळाव्यात जाहीर केली जात असे त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक न चुकता ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर सहभागी होत असत. त्यावेळच्या दसरा मेळाव्याचा स्वरुप आतासारखे नव्हते. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला कोणतीही पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. त्यावेळी गिरगाव व्यायामशाळेतील तरुणांनीच या मेळाव्याला सुरक्षाव्यवस्था पुरवली होती.
शिवसेनेच्या जन्मानंतर पक्ष विस्ताराच्यादृष्टीने ज्या बैठका घेतल्या जात होत्या. दसरा मेळावाही (Dasara Melava) त्या बैठकांचाच एक भाग होता. पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यापूर्वी बाळासाहेबांनी मुंबईत अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या. यादरम्यान त्यांनी अनेक चाळी आणि व्यायामशाळांना भेटी दिल्या होत्या. चाळीतील अगदी लहान खोल्यांमध्येही बाळासाहेब ठाकरे बैठका घेत असत. अगदी १० ते २० लोक असले तरीही बाळासाहेब त्यांच्यासमोर बोलायचे. या जनसंपर्कामुळेच त्यावेळी दादरची हिंदमाता आणि परळ येथील भारतमाता व्यायामशाळेतील तरुणांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी स्वत: ला झोकून दिले होते.
बाळासाहेबांची भीती आणि प्रचंड गर्दी
अकोलकर यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या वाहिल्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरेल की नाही अशी भीती बाळासाहेब ठाकरे यांना वाटत होती. म्हणूनच निदान समोर प्रेक्षक दिसावेत अशा विचाराने पार्कच्या कडेऐवजी मधोमध व्यासपीठाचा मंच उभारण्यात आला होता. पण घडले अगदी उलट. या पहिल्या दसरा मेळाव्याल प्रचंड गर्दी झाली आणि त्यानंतर ना शिवसेनेकडून कधी व्यासपीठाची जागा बदलली गेली, ना कधी शिवसैनिकांची गर्दी ओसरलेली पाहायला मिळाली.
Dasara Melava: काही अविस्मरणीय क्षण
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची तोफ अनेकदा कडाडली होती, शिवसैनिकांच्याच नव्हे तर देशभरात सर्वांच्या कायम लक्षात राहतील असे अनेक क्षण या शिवतीर्थाने पाहिले आहेत. १९७५ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या आणीबाणीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविण्याचा क्षण असो वा १९९१ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या सामन्याला विरोध करायचा असो असे अनेक महत्त्वाच्या घोषणा बाळासाहेबांनी या शिवतीर्थावर केल्या होत्या.
- १९७८ च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर बाळासाहेबांनी, ‘तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तर मी शिवसेना सोडून जातो,’ असं मुंबईकरांना सुनावलं होतं. या एका वाक्याचा थेट परिणाम १९८५ च्या महापालिका निवडणुकीत दिसला आणि पहिल्यांदा शिवसेनेने स्वबळावर महापालिकेत भगवा फडकवला.
- १९९१ साली बाळासाहेबांनी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा दिला होता, यानंतर शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन पिच खोदून त्याजागी डांबर टाकलं. परिणामी तिथे मॅच होऊ शकली नव्हती.
- 1996 साली राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवउद्योग सुरू करण्यात आला. त्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली गेली.
- 2010 साली दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनी नातू आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देऊन त्यांना राजकारणात ‘लॉंच’ केलं होतं.
- दरम्यान, २०१० मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कचा समावेश ‘सायलेंट झोनमध्ये’ केल्यावर सामनातून बाळासाहेबांनी या निर्णयावर कडाडून टीका केली होती, ज्यांनंतर हायकोर्टाने पक्षाला वार्षिक सभा शिवाजी पार्कात घेण्याची परवानगी दिली होती.
- २०१२ साली तब्येतीच्या कारणांमुळे बाळासाहेब ठाकरे यांना मेळाव्याला उपस्थित राहता आले नाही. तरीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात भाषण केले होते. बाळासाहेब ठाकरे यांचं दसरा मेळाव्यात शिवसैनिकांसाठी असलेलं ते शेवटचं भाषण ठरलं.
५६ वर्षांची परंपरा
शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात दरवर्षी बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर न चुकता येत होते. आजपर्यंत या परंपरेत तीनदा खंड पडला होता.
२००६ साली अतिपावसामुळे दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता. याशिवाय २००९ व २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू असल्याने दसरा मेळावा झाला नव्हता. कोरोनाच्या काळात 2 वेळा दसरा मेळावा शिवाजी पार्क ऐवजी बंदिस्त सभागृहात घेण्यात आला होता. हे अपवाद वगळल्यास आजतागायत दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.