Shehzada First look Teaser: कार्तिक आर्यन हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात प्रचंड मेहनत करून कार्तिकने आजच्या तरुणाईच्या मनात स्वतः चे स्थान निर्माण केले आहे. मागच्या काही काळात बॉलिवूडचा जवळपास प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर स्ट्रगल करताना दिसत आहे पण कार्तिकचे चित्रपट त्याला अपवाद ठरले आहेत.
Shehzada First look Teaser: चाहत्यांना सरप्राइज
आज २२ नोव्हेंबरला कार्तिक त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने त्याचे चहाते त्याला सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा देत आहेत. त्याच्या अनेक सहकलाकारांनीही कार्तिकला शुभेच्छा दिल्या आहेत. आज त्याच्या वाढदिवशी कार्तिकने त्याच्या चाहत्यांना एक छान सरप्राइज दिलं आहे. कार्तिकने त्याचा आगामी चित्रपट ‘शेहजादा’चा फर्स्ट लूक टीजर (Shehzada First look Teaser) शेअर केला आहे.
हे ही वाचा: ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात दिसणार अनेक मराठी कलाकार
सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक
कार्तिकच्या ‘शेहजादा’ या चित्रपटाची चर्चा गेली दोन वर्षे सुरू आहे. हा चित्रपट तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या २०२० च्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’ या सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. कार्तिकचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आजच्या दिवशी याचा टीझर लॉंच करून कार्तिकने त्याच्या चाहत्यांना खुश केलं आहे. या टीझरमध्ये कार्तिक जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. मध्यंतरी ‘पुष्पा’च्या यशानंतर अल्लू अर्जुनाचा मूळ तेलगू चित्रपट हिंदीत डब करून थिएटर मध्ये रिलीज करण्याचा विचार होता मात्र त्याचा परिणाम हिंदी रिमेक चित्रपटावर होऊ शकतो हे लक्षात घेऊन याचा हिंदी डबचा विचार तसे होऊ दिले गेले नाही. यावरुन बराच वादही झाला होता.
कार्तिकच्या या चित्रपटाला अल्लू अर्जुनच्या चित्रपटाप्रमाणे यश मिळेल की नाही याविषयी सोशल मिडियावर चर्चा सुरू होती. या टीझरच्या निमित्ताने त्या चर्चा आज पुन्हा एकदा रंगतांना दिसू लागल्या आहेत.
टिझरला चांगला प्रतिसाद
आज प्रदर्शित केलेल्या फर्स्ट लूक टिझरला (Shehzada First look Teaser) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या टिझर मध्ये कार्तिक तुफान ऍक्शन करताना दिसत आहे. या टीझरमध्ये कार्तिकच्या तोंडी एक डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतो, “जब बात फॅमिलीपे आती है, तो डिस्कशन नहीं, अॅक्शन करते है.” हा संवाद प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. शिवाय कार्तिकचा हटके लूक आणि दमदार अॅक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
‘शेहजादा’ चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन यांनी केले आहे ज्यांनी या आधी ‘देसी बॉईज’ आणि ‘ढिशूम’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ‘शहजादा’ या चित्रपटात कार्तिकबरोबर क्रीती सनॉन, परेश रावल, मनीषा कोइरालासारखे कलाकारही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मागील काही दिवसात ‘दृश्यम २’ वगळता हिंदी रिमेक चित्रपटांना फारसा चांगला प्रतिसाद लाभला नाही. ‘शेहजादा’ हा चित्रपट त्याला अपवाद ठरतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.