मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक नाव म्हणजे शंतनू मोघे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्या भूमिकेने शंतनूने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. सध्या तो ‘सफरचंद’ या नाटकात महत्वाची भूमिका साकारतो आहे. नुकतंच बोरिवलीच्या एका नाट्यगृहात ‘सफरचंद’ नाटकाचा प्रयोग पार पडला. हा प्रयोग पाहून प्रेक्षकांनी शंतनूचं खूप कौतुक केले.
द शो मस्ट गो ऑन
‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत कलाकार मंडळी समोर कुठलीही भयंकर परिस्थिती समोर असताना देखील आपले काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतात. यातूनच त्या कलाकाराची कामाप्रति निष्ठा जाणून येते. असाच काहीसा अनुभव आज नाटक पाहताना प्रेक्षकांना आलेला आहे. शंतनू मोघेने पायाला दुखापत झालेली असतानाही नाटकाचा तो प्रयोग केला. यावेळी त्याने हातात वॉकर घेऊन त्याचे पात्र साकारले होते. त्याचा हा उत्साहआणि कामाची प्रामाणिकता पाहून प्रेक्षकांनीही दाद दिली. धुळ्यामध्ये महानाट्याच्या तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना शंतनू मोघे यांना दुखापत झाली होती. प्रयोग संपल्यानंतर शंतनू मोघे यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली तेव्हा त्यांच्या पायामध्ये फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न आले.
३१ मार्च रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ‘सफरचंद’ या नाटकाचा प्रयोग होणार होता. नाटकाची जाहिरातीवर झालेला खर्च , कलाकारांची मेहनत वाया जाऊ नये तसेच प्रेक्षकांनी देखील तिकिटं खरेदी केली असल्याने शंतनू मोघे यांनी त्या परिस्थितीतही हा प्रयोग करण्याचे ठरवले. नाटक सुरू होण्याअगोदर प्रेक्षकांना नाटकाच्या निर्मात्यांनी ही कल्पना दिली. तुमची तयारी असेल, तर वॉकर घेऊन शंतनू हा प्रयोग करेल असं त्यांनी सांगितलं. नाटकांवर नेहमी प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनीही ते स्वीकारलं. प्रेक्षकांनी शंतनूच्या या निर्णयाचे स्वागत करत त्याला पाठिंबा दर्शवला. दिग्दर्शकानं नाटकातील शंतनूच्या केवळ दोन मूव्हमेंट्समध्ये बदल केले आणि ‘सफरचंद’चा ठरलेला प्रयोग पार पडला. नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक, सूत्रधार गोट्या सावंत आणि बॅकस्टेजची टीम यांनी संपूर्ण प्रयोगासाठी सहकार्य केल्याचं शंतनूनं सांगितलं.
हे ही वाचा : आशा भोसले ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित
काश्मिरी तरुण तरुणीच्या प्रेमाची गोष्ट
‘सफरचंद’ हे नाटक काश्मिरी तरुण तरुणीच्या प्रेमाची गोष्ट आहे. स्नेहा देसाई लिखित ‘सफरचंद’ या नाटकाचे दिग्दर्शन राजेश जोशी यांनी केलं आहे. तर शंतनू मोघे, शर्मिला राजाराम, संजय झामखंडी, प्रमोद शेलार, आमीर तडवळकर, अक्षय वर्तक, रुपेश खरे आदींनी या नाटकातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे आणि त्यामुळे या नाटकाला चांगला प्रतिसादही मिळतो आहे. अनेक ठिकाणी या नाटकाचे प्रयोग ठरलेले आहेत. असे असताना नाटकात प्रमुख भूमिकेत असलेल्या शंतनू मोघे यांच्या पायाला दुखापत झाल्याने नाटकाचे प्रयोग थांबू नयेत म्हणून वॉकर घेऊन त्यांनी हे नाटक करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
प्रिया मराठेची पोस्ट
या प्रयोगानंतर शंतनू मोघेची पत्नी अभिनेत्री प्रिया मराठे हिनं एक पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. तिनं लिहिलंय की, रिअल हिरो..हॅट्स ऑफ वगैरे अलंकार फार छोटे वाटत आहेत.हे तूच करू जाणे. तुला आणि तुझ्यातल्या कलाकाराला सलाम! ज्यांना कल्पना नाही त्यांना सांगू इच्छिते, पाय फ्रॅक्चर झालेला असताना, वॉकर घेऊन, ठरलेला प्रयोग अतिशय उत्तम प्रकारे करून शांतनूनी खरंच अभूतपूर्व उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे..कमाल! आता तुला हडाचा कलाकार म्हणता येईल.
दरम्यान प्रियाच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांनी या पोस्टवर कमेंट करत शंतनू मोघेचे कौतुक केले आहे. तसेच ‘तू लवकर बरा हो’, असेही त्यांनी म्हटले आहे. तर अभिजीत खांडकेकरने ‘खरंच कौतुकास्पद’ अशी कमेंट केली आहे.
जिगरबाज अभिनेता
नाटकाच्या संपूर्ण टीमनं दिलेल्या सहकार्यामुळे हा प्रयोग उत्तम झाला. रंगभूमीवरील निष्ठेपायी आणि मायबाप रसिकांच्या आदरापोटी मी हा प्रयोग केला. एकदा प्रयोग सुरू झाल्यावर काहीही जाणवलं नाही. मीच नव्हे, तर यापूर्वी अनेक रंगकर्मींनी अशा प्रकारे अडचणींवर मात करीत नाटक केलं आहे. ही रंगभूमीची जादू आहे. असे शंतनू यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यातून कलाकार म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही ते किती ग्रेट आहेत ह्याची प्रचिती येते.