महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांचे नाव चंडीगड विमानतळाला देण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. या वेळी ते म्हणाले, की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील महत्त्वाचा दिवस लवकरच येत आहे. २८ सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी होणार आहे. त्या दिवशी ‘अमृत महोत्सव’चा महत्त्वाचा दिवस येत आहे. या जयंतीदिनापूर्वी या महान क्रांतिकारकाला अभिवादन म्हणून, चंडीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे,
नातेवाईकांच्या प्रतिक्रिया
शहीद भगतसिंग यांच्या नातेवाईकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या बद्दल बोलताना त्यांच्या नातेवाईकांनी हा एक योग्य निर्णय असल्याचे म्हंटले आहे. हा निर्णय लांबणीवर पडला असून हा क्षुद्र राजकारणाचा पराभव असल्याचे ते म्हणाले.
शहीद भगतसिंग यांचे पुतणे प्रो. जगमोहन सिंग म्हणाले, “आम्ही शहीदांचा सन्मान करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. त्याचवेळी, आम्हाला आठवण करून द्यायची आहे की, २००७ मध्ये पंजाबने विमानतळाच्या विस्तारासाठी जमीन दिली तेव्हा ही मागणी पहिल्यांदा उचलली गेली होती. हे फार पूर्वीच करायला हवे होते.”
जगमोहन म्हणाले, हा जनतेचा विजय आहे. हरियाणा सरकारला राजकीय मजबुरीमुळे विमानतळाला मंगल सेन यांचे नाव देण्याची इच्छा होती. ते अनेक भाजप नेत्यांचे राजकीय गुरू होते.
ते म्हणाले की, 2016 मध्ये विमान वाहतूक मंत्र्यांनी धोरणात्मक बाब म्हणून कोणत्याही विमानतळाला व्यक्तींचे नाव दिले जाणार नाही असे सांगितले होते. भगतसिंग हे भांडवलशाहीच्या विरोधात होते. सरकारनेही त्यांच्या विचारसरणीचे पालन केले पाहिजे,” असे जगमोहन म्हणाले.
निर्णय घ्यायला झाला उशीर
शहीद भगतसिंग यांचे दुसरे पुतणे मेजर जनरल शेओनन सिंग (निवृत्त) यांनी सांगितले की, हा निर्णय घ्यायला खूप उशीर झाला होता. पण या निर्णयाने देशाच्या नागरिकांइतकाच मी या आनंदी आहे.”
हे ही वाचा: आत्मविश्वास… श्वासाइतकाच गरजेचा!