Seat Belt Compulsory in Mumbai: मुंबईत मोटार वाहन चालक आणि सहप्रवासी यांनी सीटबेल्ट लावणे १ नोव्हेंबरपासून बंधनकारक (Seat Belt Compulsory in Mumbai) करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी १४ ऑक्टोबरला आदेश दिले होते. या आदेशानुसार पुढील वा मागील आसनावर बसलेल्या सहप्रवाशांनीही सुरक्षा पट्टा लावला नसल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
११ नोव्हेंबर पासून कारवाई
सीटबेल्ट सक्ती (Seat Belt Compulsory in Mumbai) बाबत दंडात्मक कारवाई ही ११ नोव्हेंबर पासून केली जाणार आहे. तोपर्यंत वाहतूक पोलिसांकडून केवळ समज दिली जाणार आहे. या दहा दिवासांच्या कालवधीत वाहतूक विभागाकडून जनजागृती केली जाणार आहे आणि प्रत्येक कारमध्ये मागील बाजूस सीटबेल्ट लावून घेण्यासाठी वेळ दिला गेला आहे. ज्या व्यक्तींच्या मोटर वाहनात सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहन मालकांना १ नोव्हेंबरपर्यंत सीट बेल्ट लावून घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामुळ आता १ नोव्हेंबरपासून वाहतूक पोलीस सीटबेल्ट न लावता प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.
मागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांनीही सीटबेल्ट वापरण्याबाबात कोणताही नवा कायदा लागू करण्यात आलेला नाही. पूर्वीपासूनच हा नियम अस्तित्वात आहे. फक्त वाहतूक पोलीस १ नोव्हेंबरपासून त्याची कडक अंमलबजावणी करणार आहेत.
Seat Belt Compulsory in Mumbai: कायदा काय आहे?
मोटार वाहन कायदा(सुधारित) २०१९ च्या कलम १९४ बी (१) अंतर्गत सीटबेल्ट न बांधल्याबद्दल कारवाई करण्याची तरतूद आहे. या कलमानुसार, सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालवणाऱ्या किंवा सीटबेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चालकावर कारवाई करण्याची तरतूद आहे. असा चालक एक हजार रुपयांच्या दंडासह शिक्षेस पात्र आहे. परंतु, राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उभे प्रवासी वाहून नेण्यासाठी किंवा इतर विशिष्ट श्रेणीच्या वाहतूक वाहनांना यातून वगळण्यात आले आहे. म्हणजेच बसमधील प्रवाशांना सीटबेल्टची सक्ती असणार नाही.
हे ही वाचा: महाराष्ट्राचे ‘राज्यगीत’
जुन्या वाहनांना तूर्तास वगळले
सीटबेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरते वगळण्यात आले आहे. ज्या टॅक्सी किंवा खासगी वाहनांमध्ये मागील सीटवर कंपनीमार्फत सीटबेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशा वाहनांवर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करू नये, असेही या आदेशातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला आहे.
Seat Belt Compulsory in Mumbai: दंड किती?
मोटार वाहन (सुधारित) कायद्यानुसार नियम मोडणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड आकारण्याची आणि करावासाचीही तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात १ नोव्हेंबरपासून हजार रुपयांचा दंड आकारला जाणार नसल्याचे वहातुक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेनुसार सीटबेल्ट न लावणाऱ्या गाडीमधील चालक किंवा प्रत्येक प्रवाशांमागे २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या सर्व विभागांना सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहनचालक आणि सर्व प्रवाशांमागे २०० रुपये दंड आकारून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा दंड चालकाकडून वसूल केला जाणार आहे.
कायद्याची कडक अंमलबजावणी का?
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा ४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पालघर येथे अपघातात मृत्यू झाला. याशिवाय केपीएमजी ग्लोबल स्ट्रॅटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोल यांचाही या अपघातात मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे दोघांनीही अपघात झाला, त्यावेळी सीटबेल्ट लावला नव्हता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रस्ते अपघातांचा अभ्यास केला असता गेल्या काही वर्षांमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बहुसंख्य मृतांनी सीटबेल्ट लावला नव्हता, असे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडीला सीटबेल्ट नसल्यास तो बसवण्यासाठी वाहन चालकांना, मालकांना १५ दिवसांचा अवधीही देण्यात आला होता.
आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी
राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वाहने १०० ते १२० किमी या वेगाने धावतात. या वाहनांमधील सहप्रवाशांना सीटबेल्टसक्ती केलेली नाही. महामार्गांवर सीटबेल्ट नसल्यास चालकांना याबाबत माहिती देणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. विशेष म्हणजे, सर्वाधिक रस्ते अपघात हे महामार्गांवरच होतात. शहरात मेट्रो आणि अन्य विकासकामे सुरू आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत. वाहन कोंडीमुळे रस्त्यांवरील वाहनांचा वेग प्रचंड मंदावलेला आहे. अशात सहप्रवाशांना सीटबेल्टसक्ती म्हणजे ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ असा हा प्रकार आहे. चारचाकी वाहनांमधील सहप्रवाशांना सीटबेल्टसक्ती हा नियम राज्य, राष्ट्रीय आणि द्रुतगती महामार्ग येथे लागू करावा. शहरात हा नियम लागू करू नये, असे मत ज्येष्ठ वाहतूक तज्ज्ञ ए. व्ही. शेणॉय यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईबाहेरही अशी कारवाई केली जात आहे का?
मुंबईबाहेर महाराष्ट्रात असा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. मात्र, महाराष्ट्र महामार्ग वाहतूक पोलीस मागील आसनावरील सीटबेल्ट न लावणाऱ्या प्रवाशांवरही कारवाई करतात. परंतु त्याची अंमलबजावणी तेवढ्या कडक स्वरूपात होत असल्याचे दिसत नाही.
वाहनांमध्ये सुरक्षा वाढविण्यासाठी अधिसूचना
सीटबेल्टबाबत नवीन कायदा येण्याची अथवा जुन्या कायद्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतचे संकेत गेल्या महिन्यात दिले होते. मागील आसनावर बसलेल्या प्रवशांनी सीटबेल्ट न लावल्यास अलार्म करण्याची व्यवस्था करण्याबाबत प्रस्ताव आहे. तसेच आठ आसनी वाहनांमध्ये किमान सहा एअरबॅग बसवण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.
वाहन चालकांमध्ये असंतोष
दरम्यान, ज्या प्रकारे ही सक्ती लादली जात आहे त्यामुळे वाहन चालकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. प्रतिष्ठित उद्योगपतीचा मृत्यू झाल्यानंतर काही महिन्यातच मुंबईत सहप्रवाशांना सीटबेल्टसक्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण असे अपघात रस्त्यांवर नेहमी होत असतात आणि आजवर अनेक सर्वसामान्य प्रवाशांनी जीव गमावला पण त्यानंतर कधीही असे कठोर नियम लादले गेले नाहीत. यामुळे सर्वसामान्यांचा जीव महत्त्वाचा नाही का असा सवाल नागरिक करीत आहेत आणि सध्यातरी वहातुक पोलिसांकडे त्याचे उत्तर नाही. मुंबईकरांचा प्रवास या नियमामुळे सुरक्षित होईल अशी अपेक्षा बाळगूया.