fbpx

फेडररपर्व संपणार… टेनिसचा बादशाह रिटायर होतोय

टेनिस विश्वात गेली कित्येक वर्षे एक हाती सत्ता स्थापन केलेल्या विश्वविक्रमी रॉजर फेडररने वयाच्या ४१व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सहाव्या वर्षी टेनिसची रॅकेट हाती धरल्यापासून तब्बल २४ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत १,५०० हून अधिक सामने खेळल्यानंतर आता हा टेनिसचा बादशाह रिटायर होतोय. रॉजर फेडरर याने निवृत्ती जाहीर केली आणि सोशल मीडियावर सगळेच भावुक झाले. सामान्य माणसापासून मोठमोठ्या सेलिब्रिटीनी फेडररविषयी त्यांचं प्रेम व्यक्त केलं. पुढील आठवड्यात होणारी लेव्हर चषक स्पर्धा ही फेडररच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असेल.

टेनिस विश्वातील सार्वकालीन सर्वोत्तम खेळाडू

फेडररने आपल्या दर्जेदार खेळाने टेनिसविश्वावर ठसा उमटवला. टेनिस विश्वात चार वर्षांत ११ ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा फेडरर एकमेव टेनिसपटू आहे. विम्बल्डनशी त्याचे जसे अतूट नाते, तसेच अमेरिकन स्पर्धेतही त्याचे वर्चस्व दिसून आले आहे. अमेरिकन स्पर्धा सलग पाच वर्षे जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक २० ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा फेडरर पहिला टेनिसपटू होता. टेनिस कारकीर्दीत माती (क्ले), हिरवळ (ग्रास) आणि टणक (हार्ड) अशा तीनही प्रकारच्या कोर्टवरील ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी फ्रेंच स्पर्धेत त्याला एकमेव जेतेपद मिळवता आले आहे.

फेडररने त्याच्या एकंदर कारकिर्दीत हार्ड कोर्टवर ७१, ग्रास कोर्टवर १९ आणि क्ले कोर्टवर ११ विजेतेपदे मिळवली. त्यामुळेच त्याचा टेनिसजगतातील सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये समावेश होतो.

फेडररचे वर्चस्व

फेडररच्या वर्चस्वाला २००३मधील विम्बल्डन विजेतेपदापासूनसुरुवात झाली. २००३ ते २०१० या सात वर्षांत फेडररने दरवर्षी ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवले. पुढे २०१२ मध्ये फेडररने विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर चार वर्षे फेडररला दुखापतीने चांगलेच सतावले. त्यावर मात करत फेडरर उभा राहिला आणि पुन्हा एकदा २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डनचे विजेतेपद त्याने मिळवले. २०१८ मध्ये तो ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा विजेता ठरला. म्हणजेच १५ वर्षांत त्याने २० ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे पटकावली.

वाढत्या वयाचा फेडररच्या कामगिरीवर परिणाम

खेळाडूंसाठी वय हा केवळ एक आकडा असतो. जोपर्यंत तो शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्त असतो, तोपर्यंत तो खेळत राहतो. पण, फेडररसाठी वय हे केवळ आकडा ठरले नाही. वाढत्या वयाचा त्याच्या खेळावर निश्चित परिणाम झाला. फेडरर ४१ वर्षांचा आहे. पण, विम्बल्डन २०२१ पासून फेडरर कोर्टवर उतरलेला नाही. गुडघ्यावर एकामागून एक शस्त्रक्रिया कराव्या लागल्यापासून त्याचे पुनरागमन कायम लांबतच गेले.

स्वित्झर्लंड सरकारने छापले फेडररच्या छबीचे नाणे

टेनिसविश्वात फेडररने अनेक पातळ्यांवर नावलौकिक मिळवला. खेळ आणि आपल्या वर्तनाने त्याने जगासमोर एक वेगळाच आदर्श उभा केला. अनेक नवोदित खेळाडूंसाठी तो प्रेरणास्थान ठरला. असंख्य विजेतेपदे, पुरस्कार आणि सन्मानही फेडररने मिळवले. पण, त्याच्या कारकिर्दीत असाही एक आगळा सन्मान आहे की, जो त्याला त्याच्या देशाने म्हणजे स्वित्झर्लंडने दिला. स्वित्झर्लंड सरकारने नाण्यावर त्याची छबी साकारली आहे. २० स्विस फ्रँकचे हे नाणे २०२० मध्ये स्वित्झर्लंडमध्ये चलनात आले.

फेडरर आणि विम्बल्डनचे अनोखे नाते

फेडररच्या कारकीर्दीचा प्रवास विम्बल्डनपासून सुरू झाला. त्याचे आणि विम्बल्डन चे एक अनोखे नाते पाहिला मिळाले. कदाचित आपल्या कुटुंबानंतर फेडररसाठी सर्वात प्रिय होतं ते म्हणजे विम्बल्डन. त्याने २००३ मध्ये सर्वप्रथम विम्बल्डन विजेतेपद मिळवले आणि त्यानंतर सर्वाधिक आठ वेळा त्याने येथे विजेतेपद मिळवले.

फेडररच्या तंदुरुस्ती मागचे रहस्य

आपला फिटनेस टिकावा म्हणून फेडरर ने सर्वतोपरी प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्याने कारकीर्द घडवताना कधीही आपल्या झोपेशी तडजोड केली नाही. तो दिवसातून चक्क १० तास झोप घेतो. दिवसभर खेळल्यानंतर शरीर थकते आणि त्याचा रक्तपेशीवर ताण पडत असतो. ते टाळण्यासाठी झोप आवश्यक असते, असे फेडररचे मत आणि त्याने त्याच्याशी कधी तडजोड केली नाही. याचप्रमाणे तो सामर्थ्य टिकावे, या हेतूने दोन-तीन तासांच्या फरकाने सतत काहीतरी खात असतो. दोरीच्या उड्या, धावणे, वेटलिफ्टिंग ही त्याची सवय आणि प्रत्येक मोठ्या स्पर्धेपूर्वी तो १० तास सराव करतो. फेडररच्या निवृत्तीसाठी वय कारणीभूत असले, तरी तो वयाच्या चाळीशीपर्यंत निश्चितपणे सर्वात तंदुरुस्त खेळाडू होता.

टेनिस कोर्टबाहेरही शिस्तबद्ध…

फेडरर टेनिसमध्ये कितीही व्यग्र असला, तरी तो कमालीचा कुटुंबवत्सल आहे. टेनिसच्या धकाधकीतूनही तो कुटुंबाला कसा वेळ देता येईल, याकडे लक्ष देतो. त्यामुळेच तो कोर्टबाहेरच्या गॉसिपमध्ये कधीच तो सापडला नाही. विशेष म्हणजे प्रत्येक सामन्यापूर्वी आणि नंतर फेडररने कोणता पोषाख करायचा, हे त्याची पत्नी मिरका ठरवते आणि फेडररही तिच्या म्हणण्याला मान देतो.

सामाजिक बांधिलकी

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेडरर कमालीचा सहृदयी आहे. सामाजिक बांधिलकीचे भान राखताना तो एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर आपल्या कमाईतला काही भाग गरीब देशांमधील मुलांसाठी दान करतो.

असा हा टेनिस चा बादशाह आता आपली शेवटची स्पर्धा खेळणार आहे. फेडरर, तू दिलेल्या आनंदाची परतफेड आम्ही कधीच करू शकणार नाही. तुझ्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *