PSU Bank Profit : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका नफ्यात

PSU Bank Profit : भारतातील सरकारी बँका प्रचंड नफा कमावत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSU Bank) एकूण नफ्याने गेल्या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. सरकारी बँकांच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देशात आघाडीवर असून सर्व सरकारी बँकांच्या कमाईत तिचा वाटा जवळपास निम्मा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 2017-18 मध्ये 85,400 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर पाच वर्षात म्हणजे 2022-23 मध्ये सरकारी बँकांनी 1,04,649 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

PSU Bank Profit : बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल

सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांनी एकूण नफ्यात 57 टक्के वाढ नोंदवली आहे. सरकारी बँकांचा एकूण नफा 2021-22 मध्ये 66540 कोटी रुपये होता. बँक ऑफ महाराष्ट्र भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये निव्वळ नफ्यात अव्वल स्थानावर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचा निव्वळ नफा 126 टक्क्यांनी वाढून 2602 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. युको बँकेचा नफा 100 टक्क्यांनी वाढला असून तो 1862 कोटी रुपये झाला आहे.

PSU Bank Profit : बँक ऑफ बडोदाचा नफा

बँक ऑफ बडोदाचा नफा 94 टक्के वाढला असून तो 14110 कोटी झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी 50,232 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 60 टक्के अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकूण 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. हा आकडा एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 65 टक्के अधिक होता. या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रची कामगिरी सर्वोत्तम होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिमाही निकालांनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रचा नफा 139 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 775 कोटी रुपये होता.

हे ही वाचा: टेस्ला आता भारतात वाहनांचे उत्पादन करणार

पीएनबीचा नफा घटला

पंजाब नॅशनल बँक वगळता इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी कर भरल्यानंतर वार्षिक नफ्यात मोठी वाढ नोंदवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या वार्षिक निव्वळ नफ्यात 27 टक्के घट नोंदवली गेली आहे. पीएनबीचा नफा 2507 कोटी रुपयांवर आला आहे.

PSU Bank Profit : 10,000 कोटींहून अधिक नफा

बँक ऑफ बडोदाला 14,110 कोटी रुपये आणि कॅनरा बँकेला 10,604 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. याशिवाय पंजाब अँड सिंध बँकेचा नफा 26 टक्के वाढून 1,313 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नफा 51 टक्के वाढून 1,582 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँकेचा नफा 23 टक्के वाढून 2,099 कोटी, बँक ऑफ इंडिया 18 टक्के वाढून 4,023 कोटी, इंडियन बँकेचा नफा 34 टक्के वाढून 5,282 कोटी आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा नफा 61 टक्के वाढून 8,433 कोटी रुपये झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *