जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) गेल्या ३९ वर्षांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. फेब्रुवारी 1983 मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांच्या “टूर-टूर” नाटकाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दामले यांनी गेल्या तीन दशकात ३० पेक्षा अधिक नाटके, 24 मालिका आणि 37 मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Prashant Damle: अष्टपैलू अभिनेते
“एका लग्नाची गोष्ट”, “मोरुची मावशी”, “चार दिवस प्रेमाचे” आणि “ब्रह्मचारी” अशा अनेक नाटकांमध्ये विनोदी अभिनेता म्हणून प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी ठसा उमटवला आहे. मराठी रंगभूमीवर ते अधिक काळ रुळले असले तरी नाटकांव्यतिरिक्त त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आम्ही सारे खवैय्ये आणि किचन कल्लाकार सारख्या रिऍलिटी शोज मध्येही त्यांचा सहभाग होता. मराठीमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांची ओळख आहे. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना प्रशांत दामले यांना अनके पुरस्कार मिळाले आहेत.
हे ही वाचा: दाढी हो तो बच्चन जैसी…
अनेक विक्रम
रंगभूमीवर प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी अनेक विक्रम नोंदवले आहेत. २०१३ मध्ये त्यांनी १०,७०० प्रयोगांचा टप्पा पार करून सर्वाधिक प्रयोग करण्याचा विक्रम केला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये आपले नाव कोरले होते आणि आता पुन्हा एकदा प्रशांत दामले नवीन विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याची माहिती स्वतः प्रशांत यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत प्रेक्षकांना दिली आहे. तसंच प्रेक्षकांना एक आवाहन देखील केलं आहे.
प्रशांत दामले यांचे सोशल मीडिया लाईव्ह
प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘मनोरंजन विश्वामध्ये १९८३ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत मी ३०-३२ वेगवेगळ्या प्रकारच्या नाटकांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. नाटकाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरता आले. राज्यातील बहुतांश गावांत नाटकांच्या प्रयोगाच्या निमितानं जाऊन आलो आहे. केवळ राज्यातच नाही तर देशातील इतर राज्यांतही नाटकांच्या प्रयोगाच्या निमित्तानं फिरलो आहे. तसंच नाटकाच्याच निमित्तानं १२ देशांमध्ये जाऊन आलो आहे. नाटकानं मला भरभरून दिलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. नाटकाच्या निमित्तानं अनेक कलाकार,सहकलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे,’ असं प्रशांत यांनी आवर्जून नमूद केले आहे. या लाईव्ह सेशनमध्ये प्रशांत यांनी पुढं सांगितलं की, ‘आता माझ्या करीअरमधील महत्त्वाचा टप्पा आला आहे. रविवार,६ नोव्हेंबर २०२२ रोजी ष्णमुखानंद नाट्यगृहामध्ये माझा नाटकाचा प्रयोग होणार आहे. विशेष म्हणजे हा १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग आहे!’
प्रशांत दामले यांच्या सोशल मीडिया लाईव्ह नंतर त्यांच्यवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समाजातल्या प्रत्येक स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.
प्रशांत दामले यांनी केलं आवाहन
याच लाईव्ह सेशनमध्ये प्रशांत दामले यांनी रसिक प्रेक्षकांना एक आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, या नाट्यप्रयोगासाठी राज्यातील ज्या ज्या गावांमध्ये त्यांनी नाट्यप्रयोग केले आहेत. तिथल्या एका तरी प्रेक्षकानं मुंबईत होणाऱ्या या नाट्यप्रयोगाला आवर्जून उपस्थित राहवं आणि या विक्रमी प्रयोगाचं साक्षीदार व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे.