New Parliament Inauguration : जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशातील लोकशाहीचे मंदिर अर्थात भारताच्या नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भव्य वास्तूचे उद्घाटन (New Parliament Inauguration) करून राष्ट्राला नवे संसद भवन समर्पित केले. उद्घाटनाआधी नव्या संसदेत वैदिक विधी करण्यात आले तसेच सर्व धर्मिय प्रार्थनाही झाली. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी तामीळनाडू येथून आणलेला विशेष राजदंड (सेंगोल) लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित करण्यात आला.
New Parliament Inauguration : दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, नव्या संसदेचे उद्घाटन असल्यामुळे दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात होता. व्हीआयपी वाहनांच्या वाहतुकीचा विचार करून काही वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला होता. काही ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले होते.
हे ही वाचा : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चा टीझर प्रदर्शित !
New Parliament Inauguration : काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
परकीय राजवटीने भारताचा अभिमान हिरावला होता. ती वसाहतवादी मानसिकता भारताने आता मागे सोडली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोदी म्हणाले, “प्रत्येक देशाच्या विकासयात्रेत काही क्षण असे येतात, जे कायमचे अमर होतात. काही दिवस इतिहासात अजरामर ठरतात. 28 मे 2023 हासुद्धा असाच शुभ दिवस आहे.”
मोदी म्हणाले, “सध्या भारताच्या स्वातंत्याचा अमृत महोत्सव आहे. या मुहूर्तावर नव्या संसदेची भेट देशाला मिळाली आहे. हे केवळ एक भवन नाही. तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे. जगाला भारताच्या दृढ संकल्पाचं संदेश देतं. आपल्या लोकशाहीचं हे मंदीर आहे. नवीन संसद भवन हे संकल्पातून सिद्धीला जोडणारा दुवा बनेल. स्वातंत्र्यसैनिकांचं स्वप्न साकार करण्याचं माध्यम बनेल, आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाचा साक्षीदार बनेल. हे नूतन आणि पुरातन यांच्या सहअस्तित्वाचा आदर आहे.”
वास्तुपूजन, राजदंड स्थापना आणि सर्वधर्मीय प्रार्थना
नवी दिल्ली येथे बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली. सकाळी सव्वा सातच्या सुमारास नरेंद्र मोदी नव्या संसद भवनात दाखल झाले. सकाळी पूजापाठ आणि हवन कार्यक्रमांनी कार्यक्रम सुरू झाले. यानंतर भारताच्या राजदंडाची म्हणजेच सेंगोलची स्थापना नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला त्यांचासोबत उपस्थित होते. यादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या मागे साधूसंतांची मांदियाळी पाहायला मिळाली. मागे सुरू असलेल्या मंत्रोच्चारांनी वातावरण मंगलमय झालं होतं. राजदंडाच्या स्थापननेंतर नरेंद्र मोदींनी या संसदेच्या बांधकामाचं काम करणाऱ्या विविध संस्था आणि लोकांचा सत्कार केला.
अशी आहे नवी संसद
नवीन संसद भवन हे वास्तुकलेचा एक भव्य नमुना असून, त्याचा आतील भाग देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो. ही इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याद्वारे संसद सदस्यांना अखंड ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येईल. नवीन संसद भवनात लोकसभेच्या आतील भागाची रचना राष्ट्रीय पक्षी मोरापासून, तर राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळापासून प्रेरित आहेत. समिती कक्षात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संसद सदस्यांव्यतिरिक्त संशोधकांनाही नवीन संसद भवनाच्या ग्रंथालयाचा वापर करता येणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, त्याला प्लॅटिनम दर्जा देण्यात आला आहे.