Neral-Matheran Mini Train : आजपासून (22 ऑक्टोबर २०२२) नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा पुन्हा सुरु झाली आहे. तब्बल तीन वर्षानंतर नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा धावू लागली आहे. आज सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून सुटली आणि ही सेवा सुरू झाली. नेरळ-माथेरान मिनी ट्रेन (Neral-Matheran Mini Train) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले त्यानुसार या ट्रेनच्या नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अश्या चार फेऱ्या दिवसभरात चालणार आहेत.
ऑगस्ट 2019 पासून होती मिनी ट्रेन (Neral-Matheran Mini Train) बंद
ऑगस्ट 2019 पासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन (Neral-Matheran Mini Train) बंद होती. प्रचंड पावसामुळं घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेले होते. जमीन उरली नव्हती, त्यामुळं संपूर्ण मार्ग पुन्हा नव्यानं बांधावा लागला. या मार्गावर रुळ, रुळालगतचे क्रॅश बॅरियरसह अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची चाचणी करण्यात आली आणि २२ ऑक्टबर पासून ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अतिवृष्टीमुळं रेल्वे रुळांचं नुकसान
माथेरान ते नेरळ ही मिनी ट्रेन सेवा (Neral-Matheran Mini Train) नोव्हेंबर २०२२ पर्यंत रुळावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ऑक्टोबरमध्येच ही सेवा सुरु करण्यात आली आहे. 2019 मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता. तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरु होती. गेल्या अनेक दिवसापासून रुळ बदलण्याचं काम सुरु होतं. अखेर हे सर्व काम आता पूर्ण झालं आहे.
बाबत बोलताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की 2019 च्या पावसाळ्यात, रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले होते आणि 20 हून अधिक ठिकाणी रुळावर अडथळे निर्माण झाले होते. काही ठिकाणी, ट्रॅक खिळखिळे झाले होते आणि त्याखालील बांध वाहून गेल्याने ते लोंबकळू लागले होते.
“नेरळ-माथेरान ट्रॅकचे नूतनीकरण आणि इतर सुरक्षा कामांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, अधिक आरामदायी आणि चांगला होण्यास मदत होईल,” असे सीआरचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.
सुतार म्हणाले की, “पावसाळ्यात रुळांचे नुकसान टाळण्यासाठी, सेंट्रल रेल्वे नेरळ माथेरान मार्गावर काही विभागांमध्ये नाले बांधले आहेत, काही ठिकाणी गॅबियन भिंती उभारल्या आहेत आणि काही ठिकाणी भूस्खलन रोखण्यासाठी खडक टाकले आहेत. स्लीपर आणि रूळ बदलल्याने रेल्वे प्रवासाचा अनुभव सुधारेल कारण प्रवाशांना अडथळे जाणवणार नाहीत. अपघातविरोधी अडथळ्यांमुळे प्रवास अधिक सुरक्षित होईल, असे ते म्हणाले. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानचा एक छोटासा पट्टा डिसेंबर 2019 मध्ये पुनर्संचयित करण्यात आला आणि तेव्हापासून ते कार्यरत आहे.
हे ही वाचा: लोकमान्य टिळक टर्मिनस येथेही सुरु होणार पॉड हॉटेल
पर्यंटकांचा हिरमोड
नेरळ माथेरान मिनी ट्रेन (Neral-Matheran Mini Train) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करते. घाटातला हा निसर्गरम्य प्रवास एक सुखद अनुभव देणारा असतो. बरोबर लहान मुले किंवा एखादा पिकनिकचा ग्रुप असेल तर हा प्रवास आणखी रंजक होतो. बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता. तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. नोव्हेंबर 2020 पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरु केली गेली. नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण मिनी ट्रेन सेवा मात्र बंदच ठेवण्यात आली होती.
मिनी ट्रेनचे वेळापत्रक
- नेरळहून सकाळी 8 वाजून 50 मिनीटांनी मिनी ट्रेन सुटून माथेरानला सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.
- नेरळहून दुपारी 2.20 वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि माथेरानला सायंकाळी ५ वाजता पोहोचेल.
- माथेरानमधून दुपारी पावणे तीन वाजता मिनी ट्रेन सुटेल आणि नेरळला सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल.
- माथेरानहून सायंकाळी 4.20 वाजता मिनी ट्रेन सुटून नेरळला सायंकाळी 7 वाजता गाडी पोहोचणार आहे.
नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा इतिहास
नेरळ माथेरान मिनी ट्रेन (Neral-Matheran Mini Train) किंवा माथेरान हिल रेल्वे ही भारतीय रेल्वेची १०० वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेली एक विशेष सेवा आहे. नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे महाराष्ट्रामधील माथेरान ह्या लोकप्रिय थंड हवेच्या पर्यटन स्थळाला मध्ये रेल्वेवरील नेरळसोबत जोडते. मुंबई उपनगरी रेल्वेच्या नेरळ स्थानकापासून नेरळ−माथेरान रेल्वेची सुरुवात होते. सह्याद्री पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किमी अंतर सुमारे २ तास २० मिनिटांमध्ये पार करते.
इ.स. १९०१ साली ब्रिटिश राजवटीदरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सर आदमजी पीरभॉय ह्यांनी स्वतःचे १६ लाख भारतीय रूपये खर्च करून ही रेल्वे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय ह्याने १९०७ साली नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे बांधकाम पूर्ण केले.
स्वातंत्र्यानंतर इतर सर्व खाजगी रेल्वेमार्गांप्रमाणे नेरळ-माथेरान रेल्वेदेखील भारत सरकारच्या अखत्यारीखाली आली. १९८३ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली.