Mumbai Cases Today: करोनाचा नवीन विषाणू ‘एक्सबीबी’ हा महाराष्ट्र राज्यातही आढळला आहे. महाराष्ट्रात या विषाणूचे ३६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २१ रुग्ण हे पुण्यातील असून ठाण्यात १० रुग्ण आढळले आहेत. तसेच नागपूरमध्ये दोन, तर अकोला, अमरावती, रायगड येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. सिंगापूर आणि अन्य देशांमध्ये आढळलेल्या ‘एक्सबीबी’ या नव्या करोना विषाणू प्रकाराचा महाराष्ट्रातही झपाटय़ाने प्रसार होत आहे. मुंबईत अद्याप या विषाणूचे रुग्ण आढळले नसले (XBB Varient- Mumbai Cases Today) तरी प्रसार पाहता मुंबईलाही आता ‘एक्सबीबी’ धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
४१ ते ६० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण
कोरोना ‘एक्सबीबी’ ची बाधा झालेल्या रुग्णांपैकी १४ रुग्ण हे ४१ ते ६० वयोगटातील आहेत. त्याखालोखाल २१ ते ४० वयोगटातील १३ रुग्ण आहेत, तर ६० वर्षांवरील ७ रुग्ण आणि ११ ते २० वयोगटातील २ रुग्ण आढळले. एकूण रुग्णांमध्ये २२ पुरुष, तर १४ स्त्रिया आहेत. या ३६ जणांपैकी १९ रुग्णांना काही लक्षणे होती, तर उर्वरित रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले होते. सध्याच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील आहेत.
हे ही वाचा: कॅन्सर झालाय? सरकारला कळवा
विषाणूचा प्रादुर्भाव सौम्य स्वरूपाचा
‘एक्सबीबी’ या प्रकाराचा अभ्यास करता या नव्या उपप्रकारामुळे संसर्गाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले तरी, या नवीन प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव हा सौम्य स्वरूपाचा आहे, असे मत राज्य कृती दलाच्या सदस्यांनी (टास्क फोर्स) व्यक्त केले आहे. रुग्णांना घरगुती विलगीकरणात उपचार देणे शक्य असले तरीही रुग्णालये, दवाखाने अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी मुखपट्टी वापरावी, असे आवाहन राज्य कृती दलाने केले आहे.
Mumbai Cases Today: मुंबईत १३२ नवे बाधित
मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरू असून २९ ऑक्टोबर २०२२ रोजी, शनिवारी दिवसभरात १३२ नव्या रुग्णांची नोंद झाली. या पैकी १४ करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. दिवसभरात १४६ रुग्णांनी करोनावर मात केली.
Mumbai Cases Today: मुंबईतील एकूण बाधित
मुंबईतील एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५३ हजार ८६० झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत १९ हजार ७३८ वर जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत एकूण ११ लाख ३३ हजार ५६१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८.२ टक्के आहे. सध्या ५६१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा दर नऊ हजार ८०३ दिवसांवर पोहोचला आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या ३२८
महाराष्ट्रात शनिवारी ६० नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे ३१, नवी मुंबई २४, कल्याण डोंबिवली दोन, मीरा भाईंदर एक, उल्हासनगर एक आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात एक रुग्ण आढळला. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३२८ आहे.
मास्क वापरण्याची विनंती
एकूण परिस्थिती पहाता करोनाचा नवीन विषाणू ‘एक्सबीबी’ महाराष्ट्रात वेगाने संक्रमित होताना दिसत आहे. सध्याची आकडेवारी कमी वाटत असली तरी, भविष्यात रुग्णवाढ होऊ शकते आणि या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क चा वापर करावा अशी विनंती करण्यात आली आहे.