१८ सप्टेंबर २०२२ ही तारीख काश्मीरच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहली जाणार आहे. रविवार १८ सप्टेंबर रोजी, म्हणजे तब्ब्ल ३२ वर्षांनी दक्षिण काश्मीर मधील शोपियान आणि पुलवामा या जिल्ह्यांमध्ये मल्टिप्लेक्स सिनेमा हॉल्सचे उद्घाटन करण्यात आले आहे. नव्वदीच्या दशकामध्ये मल्टीप्लेक्स ही नवी संकल्पना देशात रुजत होती पण त्याच सुमारास काश्मीर फुटीरतावादी दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे होरपळत होते. १९९९ मध्ये काश्मीरमध्ये मल्टीप्लेक्स बांधण्याचा विचार तेथील चित्रपटगृहांच्या मालकांनी केला होता.पण सुरु असलेल्या चित्रपटगृहांवरच मर्यादा आल्याने तो विचार कोणालाही सत्यात उतरवता आला नाही.
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते उद्घाटन
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका मल्टिप्लेक्स सिनेमाचे उद्घाटन केले, तर श्रीनगरचे पहिले मल्टिप्लेक्स मंगळवारी आमिर खानच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ सह उघडेल. पुलवामा येथे उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले, “सिनेमा हे एक सशक्त सर्जनशील माध्यम आहे जे लोकांची संस्कृती, मूल्ये आणि आकांक्षा प्रतिबिंबित करते. हे ज्ञानाच्या जगासाठी, नवीन शोधांचे दरवाजे उघडते आणि लोकांना एकमेकांच्या संस्कृतीबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम करते.” या दिवसाला “ऐतिहासिक दिवस” असे संबोधून ते म्हणाले की, “चित्रपटगृहे काश्मीर मध्ये स्थानिकांसाठी नवीन रोजगार आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यास मदत करतील. आणि सरकारची प्रत्येक जिल्ह्यात किमान एक उघडण्याची योजना आहे. J&K चा सिनेमाशी दीर्घकाळ संबंध आहे, आणि केंद्रशासित प्रदेशाचे नवीन चित्रपट धोरण आणि सुविधांमुळे हा प्रदेश पुन्हा एकदा शूटिंगचे आवडते ठिकाण बनले आहे. काश्मीरचा प्रदीर्घ आणि समृद्ध सिनेमॅटिक इतिहास 32 वर्षांपूर्वी अंधकारमय झाला जेव्हा दहशतवादी आणि कट्टरपंथीयांच्या आदेशांनी सिनेमागृहे बंद केली आणि चित्रपटांवर बंदी घातली.”
हे ही वाचा: जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबर
ट्वीटच्या माध्यमातून उद्घाटनाची घोषणा
काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी काश्मीर खोऱ्यात सुरु झालेल्या पहिल्या मल्टीप्लेक्सच्या उद्घाटनाची घोषणा केली. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंद्वारे या मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहामध्ये ‘आरआरआर’ (RRR) आणि ‘भाग मिल्खा भाग’ (Bhaag Milkha Bhaag) या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
द्रुसू पुलवामा आणि एमसी शोपियान या दहशतवादाने होरपळलेल्या दोन्ही जिल्ह्यात चित्रपटगृहांच्या उद्घाटनासाठी विद्यार्थी, तरुण आणि सर्व स्तरातील लोक मोठ्या संख्येने जमले होते. “इतर राज्यांप्रमाणे, काश्मीरच्या जनतेलाही मनोरंजनाचा आनंद देण्याचा विचार आहे”, असे शहरातील पहिले असलेल्या श्रीनगरमध्ये मल्टिप्लेक्स बांधणाऱ्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य विजय धर यांनी सांगितले. त्यांचे पुत्र विकास धर यांनी या मल्टिप्लेक्स बद्दल अधिक माहिती दिली. “हे INOX द्वारे डिझाइन केलेले तीन-स्क्रीन्सचे मल्टिप्लेक्स आहे. यात किमान 520 प्रेक्षक बसू शकतात आणि त्यात अत्याधुनिक डॉल्बी साउंड सिस्टीम, स्थानिक खाद्य विकणारे फूड कोर्ट आणि इतर मनोरंजनाचे पर्याय असतील.”
तीन दशकांची प्रतीक्षा संपली
1 जानेवारी 1990 रोजी श्रीनगर, अनंतनाग, बारामुल्ला, सोपोर, हंदवाडा आणि कुपवाडा येथे बंदी घातलेल्या JKLF आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या “आदेशानुसार” 19 चित्रपटगृहे बंद करण्यात आली तेव्हापासून अनेकदा सिनेमाग्रहांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. ही तीन दशकांची अखेर प्रतीक्षा १८ संप्टेंबरला संपली.