fbpx

Meta Layoffs 2022: ‘मेटा’कडून जगभरातील तब्बल ११ हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा

Meta Layoffs 2022: फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपची पालक कंपनी ‘मेटा’ने जगभरातील त्यांच्या सध्याच्या एकूण मनुष्यबळापैकी १३ टक्के म्हणजेच तब्बल ११ हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा ९ नोव्हेंबर २०२२ रोजी केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी यासंबंधी घोषणा केली आहे.

Meta Layoffs 2022: काय आहेत कारणे?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खर्च कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ही कपात करण्यात आल्याचे सांगितले आहे. झुकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्र पाठवले आहे ज्यात घटलेला महसूल, कमकुवत जाहिरात बाजार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या समस्या ही यामागील कारणे असल्याचं सांगितलं आहे. झुकरबर्ग यांनी या निर्णयाची जबाबदारी घेतली आहे.

“ज्या स्थितीत सध्या आम्ही पोहोचलो आहोत त्याची आणि या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी मी घेत आहे,” असं झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर मेटा कर्मचाऱ्यांसाठी पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. “हे सर्वांसाठी फारच कठीण असल्याची मला जाणीव आहे. ज्यांना याचा फटका बसला आहे त्यांची मी माफी मागतो,” असं झुकरबर्ग यांनी सांगितलं आहे.

‘‘करोनाची साथ संपल्यानंतरही उत्पन्न वाढ कायम राहील, हे गृहीत धरून आपण आक्रमकपणे नोकरभरती केली. मात्र दुर्दैवाने माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत,’’ असे झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

झुकरबर्गने कर्मचारी कपातीची यादी (Meta Layoffs 2022) तयार करण्यासाठी मंगळवारी अधिकाऱ्यांशी बोलणी केली. जे कर्मचारी या निर्णयामुळे प्रभावित झाले आहेत त्यांना आजपासून म्हणजेच १० नोव्हेंबर पासून सांगितले जाईल. कंपनीने नवीन कर्मचारी घेणे आधीच थांबवले आहे आणि कर्मचारी कपातीशिवाय इतर साऱ्या खर्चात कपात करण्याची योजना आखण्यात आली आहे.

झुकरबर्गने सप्टेंबरच्या उत्तरार्धात कर्मचाऱ्यांना चेतावणी दिली होती की मेटाचा खर्च कमी करण्याचा आणि मनुष्यबाळाची पुनर्रचना करण्याचा त्यांचा हेतू आहे.

हे ही वाचा: ट्विटर युजर्सना भरावे लागणार Blue Tick साठी पैसे

गुंतवणूकदारांची चिंता

‘मेटा’ने सलग दोन तिमाहींमध्ये महसुलात मोठी घट नोंदवली आहे. कंपनीने ‘मेटाव्हर्स’ या नव्या संकल्पनेत तब्बल १० अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली आहे. याचाही परिणाम कंपनीच्या महसूल आणि उत्पन्नावर झाला आहे. याखेरीज अ‍ॅपलच्या खासगीकरण साधनांमुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप यांना वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. याचाही फटका मोठ्या प्रमाणात मेटा कंपनीला बसतो आहे. तरुणांमध्ये ‘टिकटॉक’ अधिक लोकप्रिय होत असून त्याची फेसबुकला तीव्र स्पर्धा आहे.

2004 मध्ये Facebook च्या स्थापनेनंतरच्या पहिल्यंदाचं इतक्या मोठ्या प्रमाणात मेटाने कर्मचारी कपात केली आहे. डिजिटल जाहिरातींच्या महसुलातील तीव्र घट, मंदीच्या उंबरठ्यावर असलेली अस्थिर अर्थव्यवस्था आणि मेटाव्हर्स प्रोजेक्ट मध्ये झुकरबर्गने केलेली प्रचंड गुंतवणूक यामुळे गुंतवणूकदारांमधे कमालीची चिंता आहे आणि त्याचा सरळ परिणाम कंपनीच्या मूल्यांकनावर होत आहे. मेटाच्या समभागांचे मूल्य दोन-तृतीयांशपेक्षा जास्त घटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *