जर्मन कार निर्माता मर्सिडीज-बेंझ ने शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ रोजी भारतात आपली इलेक्ट्रिक सेडान कार EQS 580 FourMatic लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक कारचे पहिले वैशिष्टय़ म्हणजे ती पूर्णपणे भारतात बनविली गेली आहे. या कारचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तीची बॅटरी फक्त 15 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल आणि त्याद्वारे 300 किलोमीटर पर्यंतचा प्रवास होऊ शकेल.
कशी आहे ही कार?
फक्त 15 मिनिटात चार्जिंग करून 300 किलोमीटरपर्यंत प्रवास करणारी ही देशातील सर्वात प्रगत आणि अत्याधुनिक लक्झरी कार ठरणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत या कारचे अनावरण करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी या लक्झरी सेडान कारमध्ये 107.8 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देईल, ज्यामुळे ही कार 750 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. अधिक रेंजसोबत या कारमध्ये एक अतिशय पॉवरफुल मोटर देखील देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये कंपनीने फॉर मॅटिकसह जी मोटर दिली आहे ती ५१६ बीएचपी आणि ८५६ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल.
किती असेल किमंत?
या कारची किंमत किती असेल याबद्दलची माहिती कंपनीकडून अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही, परंतु याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.80 कोटी रुपये असू शकते. ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक कार असल्याने कंपनीला तिची किंमत कमी ठेवण्यास मदत होईल. आतापर्यंत, कंपनी परदेशातून कार्स आयात करत होती, त्यामुळे त्यावर भरपूर कर आकारला जायचा आणि त्याचा परिणाम कारच्या किमतीवर होई.
इलेक्ट्रिकल वाहन निर्मितीसाठी सर्वसमावेशक धोरण
ई वाहनातील दुचाकी वाहनाची मागणी वाढत आहे. आता चारचाकी वाहनांचीही मागणी वाढेल. त्यामुळे भारत सरकार यासाठी एक धोरण तयार करत आहे. पुणे येथील चाकणमध्ये झालेल्या या अनावरण सोहळ्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बदल होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत मोहिमेला बळकटी देण्यासाठी इंधन बचतीचा मार्ग यामुळे सुलभ होणार आहे. इलेक्ट्रिकल दुचाकीनंतर इलेक्ट्रिकल चारचाकी वाहनांची मागणी लक्षात घेता केंद्र सरकार या उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण राबवत आहे. यातूनच सामान्य नागरिकांना इलेक्ट्रिकल कारमुळे फायदाच होणार आहे.”
60% सोलर वापरावर गाड्या व्हाव्यात
इलेक्ट्रिकल वाहन इंधन बचतीसाठी मोठा पर्याय भारतासमोर आहे. यामुळे मोठं प्रदूषण आपण रोखू शकू अशी आशा गडकरी यांनी व्यक्त केली. देशात 60% सोलर वापरावर गाड्या व्हाव्यात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे.