fbpx

Mangal Grah Mandir : महाराष्ट्रातील एकमेव मंगळग्रह मंदिर

Mangal Grah Mandir | मंगळग्रह मंदिर : जन्मपत्रिकेतील मंगळ दोषामुळे विवाहात दिरंगाई होत असल्याची समाजात मान्यता आहे. यावर दोष निवारणार्थ काही उपायही शास्त्रकारांनी सुचविले आहेत. या श्रद्धेपोटी मंगळग्रह मंदिराचा शोध भाविकांकडून घेतला जातो. नवग्रहांची भारतात अनेक मंदिरे आहेत मात्र, फक्त मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर जाणकारांच्या मते देशात मोजकीच आहेत. यातील एक मंदिर अमळनेर येथे आहे. चोपडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळग्रह मंदिर (Mangal Grah Mandir) असून अमळनेर बसस्थानकापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर आहे.

Mangal Grah Mandir: महाराष्ट्रातील एकमेव मंगळग्रह मंदिर

मंगळ ग्रहाचे महाराष्ट्रातील एकमेव मंगळग्रह मंदिर अमळनेर येथे आहे. धार्मिक महतीसोबतच या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या निसर्गसंपन्नतेमुळे हा परिसर आता पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध होत आहे. धार्मिक स्थळी गेल्याचे समाधान आणि पर्यटनाची इच्छापूर्ती असे दोन्ही उद्देश या मंदिरात येण्याच्या निमीत्ताने साधले जातात त्यामुळे या मंदिरात नेहमीच विशेषतः मंगळवारी भाविकांची वर्दळ असते.

बस अन् रेल्वे सुविधाही उपलब्ध

बोरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले अमळनेर हर प्रत्येक वर्षी सखाराम महाराजांच्या यात्रेमुळे चर्चेत असते. जळगावपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरात येण्यासाठी विविध मार्ग अन् साधने उपलब्ध आहेत. जळगावमधून सकाळी नऊच्या सुमारास भुसावळ-सुरत पॅसेंजर व नवजीवन एक्सप्रेस या दोन गाड्या आहेत. तसेच जळगाव बस स्थानकावरूनही अनेक बसेस येथे जाण्यासाठी आहेत. धुळे शहरापासून ३६ किलोमीटर असल्याने या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांनाही बससोबत खाजगी वाहनांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

हे ही वाचा : अंबरनाथचे शिवमंदिर – स्थापत्यकलेचा अविष्कार आणि अभियांत्रिकी चमत्कार

मंदिरात भाविकांसाठी अनेक सोयी

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, दर मंगळवारी येथे हजारो भाविक मंगळ दोषाचे निवारण करण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात. या मंदिरात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर संस्थेने अनेक मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पार्किंग, पादत्राणे, शुद्ध पाणी, मंगळ टिका आदी मोफत सुविधांसोबतच आरोग्य तपासणीही केली जाते. भाविकांना उकाडा जाणवत असल्याने येथे फॉगिंग यंत्रणाही बसविण्यात आली आहे. येथील विशेष बाब म्हणजे मंगळवारी गर्दी असूनही व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था नाही. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे अनेक ठिकाणी मोबाईल चार्जिंगसाठी चार्जिंग पॉईंट देखील बनवण्यात आले आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंगसाठी ठेवू शकता. या जागेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच येथील सेवेकरी चहुबाजूंनी जागरुकता ठेवून भाविकांना सहकार्य करण्यास सदैव तत्पर असतात. मात्र, तुम्ही तुमच्या मोबाइलवर स्वत: लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

संतांची पावन भूमी

साने गुरूजींची कर्मभूमी तर संत सखाराम महाराजांची अध्यात्मनगरी असलेली ही भूमी अनेक मोठ्या रत्नांच्या सहवासाने पावन झाली आहे. स्वातंत्र्य संग्रामातील आंदोलकांची व आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांची दीर्घकालीन परंपरा अमळनेरने जपली आहे. येथील प्रताप मिलमुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले. परिसरातील औद्योगिक विकासात भर पडली. देशात कम्प्युटरपासून ते अन्य विविध उद्योगांच्या माध्यमातून नावारुपाला आलेल्या अझिम प्रेमजी यांच्या उद्योग समुहाची सुरुवातही अमळनेर येथील विप्रो कंपनीपासूनच झाली आहे.

यश, लाभासाठी अभिषेक

मंदिरात प्रवेश केल्यानंतर मनाला मि ळणारे समाधानही त्वरित जाणवते. मंदिराच्या आवारात काही वेळ थांबल्यानंतर मिळणारी आनंदाची अनुभूतीही अनुभवण्याशिवाय समजत नाही. निसर्गातल्या सर्वोच्च शक्तीविषयी मानवी मनाला असणारा आदर आणि निसर्गातल्या सौंदर्याची असणारी अभिजात ओढ यांची सांगड घालण्यासाठी या धार्मिक स्थळाचा पर्याय कुटुंबासाठीही उत्तम आहे. मंगळग्रह भूमिपुत्र असल्याने खरेदी विक्री करणारे अनेक व्यावसायिक मंदिरात अभिषेक करण्यासाठी येत असतात. अभिषेकानंतरच खरेदी विक्रीचे व्यवहार करतात.

मंदिराची पार्श्वभूमी

श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे. मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. मात्र, मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली, या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अमळनेर शहरासह परिसरातील काही जाणकारांच्या मते श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन १९३३ मध्ये झाला. परंतु १९४० नंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित व नंतर भग्न झाले. १९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे झालेला कायापालट भाविक, भक्तांना आकर्षित करण्यात दिवसागणिक यशस्वी ठरत आहे. मागील काही वर्षांत येथील विविध विकासकामांचा व सोयी-सुविधांचा वेग कमालीचा गतिमान झालेला आहे. मंदिराचा परिसर सुमारे १५ एकर आहे. दर मंगळवारी सुमारे ८० हजार ते एक लाखापर्यंत तथा पर्यटक मंदिरात येतात.

पर्यावरण संवर्धनचा संदेश

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ यासारखे पर्यावरणपूरक उपक्रम येथे राबविण्यात आले. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करीत वनराईचे स्वरुप प्राप्त झाले. साठवण बंधाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात पाणी अडविण्यात आले आहे. त्याच पाण्याचा उपयोग करून परिसरात हिरवळ निर्माण करण्यात आली आहे.

तुळसाई बगीचा

मंदिराच्या बाजूलाच बनविण्यात आलेली तुळसाई बाग तिच्या भव्य स्वरुपामुळे लहान-मोठ्यांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. विविध रंगाची फुले, केळीच्या झाडांची केलेली सजावट, संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेल्या विविध झाडांच्या कुंड्या यामुळे हा बगिचा खऱ्या अर्थाने सजलेला दिसतो. मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी आहेत.

पिकनीक स्पॉट

पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारे, कारंजे, नेत्रदीपक रोषणाई, नयनरम्य हिरवळीसह भाविकांसाठी असलेल्या सर्व प्रकारच्या सेवासुविधा यामुळे मंदिराला पिकनीक स्पॉट तसेच पर्यटन स्थळ म्हणूनही व्यापक प्रसिध्दी मिळाली आहे. त्यामुळे अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना सहलीसाठी येतात. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारासमोर शेड उभारण्यात आलेले आहे. बाजूलाच नवकार कुटीया व त्याखाली शंकराची मूर्ती व जटांमधून बरसणाऱ्या धारा व धबधब्याची आरास उभारण्यात आला आहे.

उत्तम निवास व्यवस्था

मंदिराच्या आवारातच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था देखील आहे. यात महागड्या हॉटेल्स सारख्याच सर्व सुविधायुक्त दोन ए.सी. रुमही आहेत. त्याच प्रमाणे दोन मोठ्या हॉल्सच्या माध्यमातून अत्यल्प दरात निवासाची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली आहे.

दर मंगळवारी महाप्रसाद

दर मंगळवारी मंदिराला शिर्डी, शेगाव प्रमाणेच यात्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. मंदिर प्रशासनातर्फे फक्त पंधरा रुपयात महाप्रसाद दिला जातो. यात कांदा व लसूण नसलेली मसाल्याची रस्सेदार मसूर डाळ, भात, पुरी व गुळाचा शिरा दिला जातो. या महाप्रसादाने आलेले भाविक नक्कीच तृप्त होतात.

मंगळदेव मंदिरात होणाऱ्या विविध पूजा-अभिषेक

मंदिरात सामूहिक अभिषेक, स्वतंत्र अभिषेक, दर मंगळवारी होणारा पंचामृत अभिषेक, मंगळवार सोडून इतर दिवशी होणारा नित्यप्रभात मंगलाभिषेक, हवनात्मक अभिषेक, भोमयाग आदी सशुल्क पूजा-अभिषेक होतात. मंगळवारी होणारा पंचामृत अभिषेक वगळता सर्व पूजा-अभिषेक रोज होतात. दर शुक्रवारी मंदिरात श्रीयंत्रावर कुंकूमार्चन पूजा होते. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी व दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा होते. दर पौर्णिमेला श्री गायत्री महायज्ञ होतो. रोज सूर्योदय व सूर्यास्तास अग्रिहोत्र पूजा होते. दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेस श्री तुलसी विवाह महासोहळा होतो. दरवर्षी भाद्रपद शुद्ध १० रोजी श्री मंगळग्रह जन्मोत्सव साजरा होतो. श्री हनुमान जन्मोत्सव व नवरात्रोत्सवही होतो. त्या निमित्ताने नवचंडी व शतचंडी महायाग होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *