Maharashtra Bhushan Puraskar 2023 : आशा भोसले ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित

Maharashtra Bhushan Puraskar 2023 : गेली आठ दशकं आपल्या सुमधुर आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शुक्रवारी, २४ मार्च २०२३ ला सायंकाळी गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात ख्यातनाम गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ख्यातनाम क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. प्रारंभी गायिका आशाताई भोसले यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.

Maharashtra Bhushan Puraskar 2023 : आशा भोसले यांनी केल्या भावना व्यक्त

महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. आशाताई म्हणाल्या की, “मुलगी बऱ्याच दिवसांनी घरी, माहेरी परत आली की कसं वाटतं तसं आज मला वाटत आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार माझ्याठी भारतरत्न इतकाच महत्त्वाचा आहे. कारण हा पुरस्कार माझ्या आपल्या माणसांनी दिला आहे. वडील दीनानाथ मंगेशकर, माई मंगेशकर, दीदी लता मंगेशकर यांच्या आशीर्वादाने येथपर्यंतचा प्रवास झाला आहे. गाण्याने माझे जीवन समृद्ध केले असून या वाटचालीत संगीतकार आणि सहकारी गायकांना विसरू शकत नाही.” तसेच सर्व प्रकारचे संगीत आपण ऐकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : अकॅडेमी अवॉर्ड्स २०२३ मध्ये भारतीयांचा डंका

‘आवाज चांदण्याचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम

महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Puraskar) प्रदान सोहळ्यानिमित्त गायिका आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित ‘आवाज चांदण्याचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात आशा भोसले यांनी गायलेली विविध गीते सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या वेळी लोकप्रतिनिधी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंत, गायक, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, अभिनेता सुमित राघवन यांनी सूत्रसंचालन केले.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “महाराष्ट्राची भूमी ही रत्नांची खाण आहे. आशाताईंनी गायिलेल्या गीतांतून जीवनाची दिशा आणि जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यांनी गायिलेली गीते आजही सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत.”

आशाताईंची गाणी आजही ताजी – मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आशा भोसले यांनी आतापर्यंत विविध भाषांतून हजारो गीते गायिली. त्यांनी भक्तिसंगीतापासून ते डिस्कोपर्यंतची विविध गाणी गात गीतांचा खजिना उपलब्ध करून दिला. त्यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा गौरव वाढला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत संघर्ष अनुभवताना दुसऱ्यांचा संघर्ष गीतातून आनंदी केला आहे. त्यांनी गायिलेली गीते आजही ताजीतवानी वाटतात. पुढेही ती तशीच राहतील. ही गाणी सर्वांना प्रेरणादायी ठरतील”.

आशा भोसले या अष्टपैलू गायिका – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशाताई भोसले (Asha Bhosle) यांचा संगीतमय प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचे गायन बहुश्रुत आहे. हे त्यांनी विविध भाषांमधील गायलेल्या हजारो वैविध्यपूर्ण गीतांमधून सिद्ध केले आहे. त्यांनी आपल्या गाण्यातून वैशिष्ट्य जपले आहे. त्या अष्टपैलू गायिका आहेत. त्यांनी आपल्या गीतातून वेगळे भावविश्व निर्माण केले. त्यांनी गायिलेली गीते लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येकाला गुणगुणायला आवडतात हे त्यांच्या गायनाचे यश आहे. त्यांच्याकडून पुढेही संगीत सेवा घडो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

पहिलं गाणं गाताना थरथर कापत होते

अभिनेते सुमित राघवन यांनी आशा भोसले यांची छोटेखानी मुलाखत घेतली. आयुष्यातील पहिलं गाणं गाताना कसं वाटलं असा प्रश्न विचारला असता आशा भोसले (Asha Bhosle) म्हणाल्या की, “कोल्हापुरात 10 वर्षे वयाची असताना, 1943 साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, मी थरथर कापत होते. असं वाटलं की हा माईक घेऊन कोणीतरी जावं, मला पळून जावं असं वाटलं होतं. तरीही मी त्या वेळी गायलं. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारलं असतं. 1946 साली मी हिंदी फिल्म लाईनमध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत 10 हजार गाणी गायली. संगीतप्रेमींनी माझं गाणं ऐकलंच नसतं तर मी येथपर्यंत आलेच नसते. असंच आपलं प्रेम राहू दे.”

गाणं गाताना असं कोणी सांगू शकत नाही की ते गाणं लोकांना चालेल की नाही, पण माझी गाणी मात्र चालली, गेली 60 वर्षे लोकांनी माझ्या गायिकेला स्वीकारलं हे विशेष असं आशा भोसले म्हणाल्या.

आर डी बर्मन डिफिकल्ट म्युझिशियन

ज्या पद्धतीची गाणी गायली त्या व्यक्तीरेखेची एकरुप होऊन गायली असं सांगत आशा भोसले म्हणाल्या की, जयदेव, मदन मोहन या संगीतकारांसोबत काम करताना त्यांनी सांगितलेल्या चालीव्यतिरिक्त आम्हाला जे वाटायचं तीच चाल आम्ही गायचो आणि त्यांना सांगायचो की त्यांनी त्याच चाली सांगितल्या होत्या. आर डी बर्मन यांची गाणी गाताना अवघड वाटायचं. आर डी बर्मन हे डिफिकल्ट म्युझिशियन आहेत.

ज्या मंगेशाने मला इथपर्यंत आणलं तोच मंगेश पुढे नेईल असं म्हणत आशा भोसले (Asha Bhosle) यांनी ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गीत गायलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *