fbpx

Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक यांचे पणतू दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदी यांना ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, पुणेरी पगडी, उपरणं, मानचिन्ह आणि १ लाख रुपयांचा धनादेश, असं पुरस्काराचं स्वरुप होतं. यावेळी मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. रोहित टिळक, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे मंचावर उपस्थित होते.

मोदींनी घेतलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले असले तरी त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे अभिषेकही केला. तसेच पुरस्कार प्रदान केल्यानंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आणि दगडूशेठ यांचा उल्लेख केला.

नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात एखादं भाषण करतात, तेव्हा त्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात. आजही त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आज लोकशाहीर आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने त्यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.

हे ही वाचा : ‘झटपट करोडपती कसे व्हावे’ या पुस्तकाचे शरद पोंक्षे यांच्या हस्ते प्रकाशन

Lokmanya Tilak Award : काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. मराठीतूनच भाषणाला प्रारंभ करताना मोदी म्हणाले, “छत्रपती शिवराय, फुले, टिळक, चाफेकर अशा महानेत्यांची महाराष्ट्र ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या पुण्य भूमीत, या पुण्यनगरीत येण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य समजतो”.

बक्षिसाची रक्कम रक्कम ‘नमामे गंगे’ योजनेला दिली

मला मिळालेल्या पुरस्काराशी टिळकांचं नाव जोडलंय. लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहे. त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी कैक पटीने वाढलीये, असं नमूद करतानाच ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. महाराष्ट्राच्या पुण्य भूमीत येण्याची संधी मिळाली, हे भाग्य समजतो, अशी मराठीतूनच भाषणाची सुरुवात करताना त्यांनी पुणेकरांची वाहवा मिळवली. तुमच्या सेवेत मी कुठलीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही देखील मोदींनी देशवासियांना दिली. त्याचवेळी पुरस्काराची १ लाखाची रक्कम ‘नमामे गंगे’ योजनेसाठी देत असल्याचंही मोदींनी सांगितलं.

स्वातंत्र्य लढ्यातले टिळकांचे योगदान

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान आणि काही घटना शब्दांत मांडता येणार नाही. भारताची श्रद्धा, संस्कृती, श्रद्धा या सर्व मागासलेपणाचे प्रतिक आहेत, असा समज ब्रिटिशांनी केला होता. पण टिळकांनी इंग्रजांचं मत चुकीचं ठरवलं. टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय होतं. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी जेवढं उत्साहाचं होतं तेवढं भावनिक देखील आहे. कारण टिळकांचं आणि गुजरातचं विशेष नातं आहे, असंही मोदींनी आवर्जून सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *