fbpx

दिनेश कार्तिकच्या चार शब्दांच्या ट्विटने इंटरनेटवर धुमाकूळ

दिनेश कार्तिक सध्या भारतीय संघात फिनिशर च्या भूमिकेत दिसतो आहे. संघात रिषभ पंत सारखा विकेट किपर असतांना, संजू सॅमसन आणि इशांत किशन सारखे तरुण क्रिकेटर स्पर्धेत असताना त्याला विकेट किपर म्हणून संधी मिळणे अवघड होते. अशा परिस्थितीत भारताने पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली.ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यापैकी नक्की कुणाला संधी मिळणार या बद्दल चर्चा होत असतांनाच भारतीय संघाची निवड झाली आणि दोन्ही यष्टीरक्षकांना अंतिम 15 मध्ये स्थान मिळाले.

फिनिशरची भूमिका

37 वर्षीय कार्तिकने आपल्या कारकिर्दीत अनेक उतार चढाव पाहिले आहेत. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो एक भाग होता परंतु 2010 ते 2017 पर्यंतच्या सात वर्षांचा कालावधीत त्याला एकाही T20 सामन्यात संधी मिळाली नाही. तामिळनाडूच्या या क्रिकेटपटूची सध्या संघात फिनिशर म्हणून ठरलेली भूमिका आहे. शेवटच्या काही षटकांमध्ये येऊन तुफान फटकेबाजी करण्याची करामत त्याने वारंवार केली आहे आणि त्याचे फळ म्हणून आता त्याला भारताच्या T20 विश्वचषक संघात अंतिम १५ मध्य स्थान मिळाले आहे.

हृदयस्पर्शी ट्विट

T20 विश्वचषक संघात निवड झाल्यानंतर, कार्तिकने एक हृदयस्पर्शी ट्विट शेअर केले, जे गेल्या काही महिन्यांतील त्याच्या प्रवासाचे योग्य वर्णन करते. आपल्या चार शब्दांच्या ट्विट मध्ये कार्तिकने “Dreams do come true” म्हणजेच स्वप्न पूर्ण होतात असे लिहिले आहे. हे ट्विट काही क्षणातच वायरल झाले असून त्यावर त्याच्या सहकार्यांच्या आणि चाहत्यांच्या असंख्य प्रतिक्रिया येत आहेत.

कार्तिकने T20 फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. निदाहस ट्रॉफी मधली त्याची खेळी ही त्याच्या कारकिर्दीतली सर्वात रोमहर्षक खेळी होती असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. परंतु दिनेश कार्तिकचे अंतिम लक्ष्य भारताला आगामी T20 विश्वचषक जिंकून देण्याचे आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याची निवड करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने दोन विकेटकीपर निवडले आहेत. पहिला पर्याय ऋषभ पंतचा आहे ज्याने ऑस्ट्रेलियात खूप चांगली कामगिरी केली आहे. जो भारताला कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकणाऱ्या डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय देतो. दुसरा यष्टीरक्षक कार्तिक संघासाठी फिनिशरची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो आहे आणि अशा स्पेशलिस्टला वगळण्याची चूक निवड समितीने केली नसती.

“मला देशासाठी खेळायचे आहे. फक्त विश्वचषकाचा भाग न होता ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघात पूर्णपणे योगदान देण्याचे माझे लक्ष आहे.” असे कार्तिक आयपीएल दरम्यान म्हणाला होता. “भारताने बहुराष्ट्रीय स्पर्धा जिंकून बराच काळ लोटला आहे. मला ती व्यक्ती व्हायचे आहे जी भारताला विश्वचषक जिंकण्यास मदत करेल. त्यासाठी, तुम्हाला बर्‍याच गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे, प्रयत्न करा आणि असा खेळाडू व्हा ज्याला लोकांना वाटते की ‘अरे हा माणूस काहीतरी खास करत आहे’. दररोज मी त्या हेतूने सराव करतो. माझ्या यशाचे श्रेय माझ्या प्रशिक्षकांना आहे ज्यांनी माझा खेळ उंचावण्यासाठी खूप प्रयास केले आहेत. जसजसे वय वाढत जाते तसतसे फिटनेस टिकवण्यासाठी तुम्हाला खूप मेहेनत घ्यावी लागते आणि त्यासाठीही मी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे,” असेही तो पुढे म्हणाला.

भारताचा T20 विश्वचषक संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर पटेल, भुवनेश्वर पटेल , अर्शदीप सिंग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *