fbpx

Kalyan-Murbad Railway : ७ दशकांपासून रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला लवकरच सुरुवात

Kalyan-Murbad Railway : राज्यात सत्तापालट होताच, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पातल्या अडचणी दूर होताना दिसत आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुरबाड रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. या मार्गासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के वाटा उचलण्याची हमी महाविकास आघाडीकडून दिली गेली नसल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली करून दुसऱ्या दिवशीच रेल्वे मंत्रालयाला महाराष्ट्र सरकारकडून ५० टक्के खर्चाची हमी घेतली जाणार असल्याचे पत्र पाठविले.

Kalyan-Murbad Railway : सप्टेंबरअखेरपर्यंत सुरू होणार काम

मुरबाड रेल्वे प्रकल्पाची निश्चित केलेली ८५७ कोटींची किंमत व त्याची व्यवहार्यता तपासून तो मंजुरीसाठी नीती आयोग व अर्थ मंत्रालयाकडे पाठविला जाईल. त्याला नीती आयोगाचे मूल्यांकन मिळाल्यानंतर २१ दिवसांत रेल्वेच्या विस्तारित बोर्डाच्या बैठकीत मान्यता दिली जाणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे बोर्डात अंतिम मंजुरी दिली जाऊन, त्याच्या प्रती नीती आयोग, अर्थ मंत्रालय आणि सांख्यिकी विभागासह सर्व सदस्यांना वितरित केल्या जातील. विशेष म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला रेल्वेमंत्री मंजुरी देऊ शकतात. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना दिली आहे.

वंदे महाराष्ट्र (Vande Maharashtra) ला मिळालेल्या माहिती नुसार, रेल्वे आणि महसूल विभागासह केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन अवघ्या १५ दिवसांत कल्याण- मुरबाड रेल्वे मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीची मोजणी केली केली आहे. पुढील आठवड्यात या कामाची निविदा निघेल, अशी ग्वाही केंद्रीय पंचायतीराज मंत्री कपिल पाटील यांनी ९ जून २०२३ रोजी मुरबाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ठरणार जमिनीचा दर

या रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा दर हा बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला जाईल. शेतकऱ्यांनी याबाबत निश्चिंत रहावे, असेही त्यांनी सांगितले. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची तब्बल सात दशकांपासून प्रतीक्षा केली जात होती. कल्याण ग्रामीण आणि मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी हा रेल्वेमार्ग ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. भूसंपादनात सहभागी सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बजाविलेली कामगिरी कौतुकास्पद आहे, असे सांगून कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत जमीन मोजणीसाठी तत्काळ सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. विक्रमी वेळेत या रेल्वे मार्गाचे भूसंपादन झाले.

हे ही वाचा : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प लवकरच होणार पूर्ण

रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

रेल्वे अधिनियम १९८९ च्या कायद्यानुसार रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कायद्यातील कलम २० ए नुसार प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व बाधित शेतकऱ्यांना नोटीस देऊन जमिनीची मोजणी करण्यात आली. तसेच उपविभागीय कार्यालयाकडून जमिनींना देय असलेल्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेतली आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.

कल्याण-मुरबाड रेल्वेच्या निश्चित केलेल्या मार्गाबाबत जाणून घेण्याबरोबरच या मार्गाच्या भौगोलिक स्थितीबद्दल अधिक माहिती असलेल्या शेतकरी वा ग्रामस्थांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधावा. तसेच त्यांच्याकडून शंकेचे निरसन करून घ्यावे. तसेच आवश्यक सूचना कराव्यात. शेतकऱ्यांनी चुकीची माहिती आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

पुराचा धोका नाही

रेल्वेमार्गामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याच्या शंका निराधार आहेत. प्रत्यक्ष रेल्वेमार्गाचे काम करताना सर्व बाबींची काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर मुंबई-वडोदरा महामार्गाच्या अलाइनमेंटशी सुसंगत रेल्वेची अलाइनमेंट घेतली जात आहे. मुरबाड शहरात रेल्वेचे शेवटचे टोक असल्यामुळे रेल्वे यार्डासाठी जागेच्या आवश्यकतेनुसार अलाइनमेंट करण्यात आलेली आहे.

रेल्वे सेवा माळशेजपर्यंत विस्तारणार

मुरबाड रेल्वे पुढे अहमदनगरपर्यंत सुरू करण्याची मागणी करणार असल्याचे कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. किमान माळशेजपर्यंत तरी रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.

अनेक वर्षांपासून रखडलेल्‍या महत्त्‍वपूर्ण कल्याण-मुरबाड (Kalyan-Murbad) रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होईल, अशी चिन्हे आहेत. या प्रकल्पाचे टेंडर मंजूर करण्याची प्रक्रिया वेगाने करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिले आहेत. या रेल्वे मार्गाला सुमारे ८५७ कोटींचा खर्च येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *