२० वर्षांहून अधिक काळ भारतीय महिला क्रिकेटची सेवा केल्यानंतर झुलन गोस्वामी म्हणजेच छकडा एक्सप्रेस रिटायर होतेय. मैदानावर शेवटचा सामना खेळून निवृत्ती घेणे हे सगळ्याच खेळाडूंच्या नशिबात नसते. त्यामुळे बंगालमधील छकडा येथून सुरू झालेल्या कारकिर्दीला झुलन गोस्वामीने २४ सप्टेंबरला लॉर्ड्सच्या मैदानावर टाळ्यांचा कडकडाट करणाऱ्या चाहत्यांसमोर आणि सहकाऱ्यांसमोर पूर्णविराम दिला हे मनाला सुखावणारे आहे.
एक वर्तुळ पूर्ण
शनिवारी, २४ सप्टेंबरला जेव्हा ती इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये अंतिम वेळेसाठी मैदानात उतरली, तेव्हा तीने एक प्रकारचे वर्तुळच पूर्ण केले. पाच वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर ती 2017 च्या विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती पण भारताला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. त्यावेळी तिचे ते स्वप्न साकार झाले नसले तरी आज मात्र ती अभिमानाने निवृत्त होऊ शकली कारण यावेळी म्हणजे २३ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने इंग्लंडमध्ये जाऊन ३-० असा दणदणीत मालिका विजय प्राप्त केला आहे.
दोन युगांमधील दुवा
सध्याच्या पिढीसाठी झुलन भारतीय महिला क्रिकेटच्या दोन युगांमधील शेवटचा दुवा आहे. मिताली राज, डायना एडुल्जी आणि शांता रंगास्वामी या इतरांबरोबरच ती दीर्घकाळापासून भारतासाठी खेळत आहे. तिच्या निरोपाच्या मालिकेपर्यंत, झुलनने एकही एकदिवसीय सामना खेळला नव्हता ज्यात मिताली तिच्या संघात नव्हती.
झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे या दोघी गेल्या अर्ध्या दशकाहून अधिक काळ भारताच्या गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आहेत. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाजीचे पूर्वी फारसे पर्याय उपलब्ध नव्हते. आज जेव्हा नवीन प्रतिभा भारतीय महिला क्रिकेट मध्ये येऊ लागली आहे पण झुलन प्रमाणे भारताला पुढील दोन दशकांपर्यंत भारताचं प्रतिनिधित्व करू शकेल असा कोणीतरी सापडायला अजून थोडा वेळ लागू शकतो.
हे ही वाचा: फेडररपर्व संपणार… टेनिसचा बादशाह होतोय रिटायर
‘बॉल गर्ल’ ते ‘झुलू दी’ असा प्रवास
आपल्या जुनिअर सहकाऱ्यांची झुलू दी होण्याआधी, झुलन गोस्वामी तिच्या डोळ्यात स्वप्न असलेली एक तरुण क्रिकेटर होती. इडन गार्डन्स येथे 1997 च्या विश्वचषक फायनलमध्ये गोस्वामी बॉल गर्ल होती आणि तिथे कॅथरीन फिट्झपॅट्रिकला पाहून ती मंत्रमुग्ध झाली होती. शनिवारी, जेव्हा ती लॉर्ड्सवर रेणुका ठाकूर आणि मेघना सिंग यांच्यासमवेत गोलंदाजी करेल, तेव्हा ती जणू भारतीय गोलंदाजीची पुढील सूत्रे त्या दोघींच्या हवाली करेल. झुलन गोस्वामी 2016 च्या टी-20 विश्वचषकात भारताकडून खेळली तेव्हा ठाकूर धर्मशाळेत स्टारस्ट्रक अकादमीची सदस्य होती आणि एकेकाळी तीही बॉल गर्ल होती. झुलनचा बॉलवर ऑटोग्राफ घेण्यासाठी मेघना एकदा कानपूरच्या एका हॉटेलच्या लॉबीत दिवसभर वाट पाहत होती. जेव्हा तिने पहिल्यांदा भारताची जर्सी घातिली घातली तेव्हा तिच्या सध्याच्या सहकारी शफाली वर्मा आणि ऋचा घोष यांचा जन्मही झाला नव्हता आणि तिची कर्णधार हरमनप्रीत कौर अजूनही खेळ खेळण्याचे स्वप्न पाहत होती.
मिताली राज नंतर आता झुलन गोस्वामीच्याही निवृत्तीमुळे भारतीय महिला क्रिकेटमधील एका युगाचा खऱ्या अर्थाने अंत होईल. फक्त खेळावर प्रेम करणारा संघ अशी साधारण ओळख असलेल्या भारतीय संघाला क्रिकेट जगात मनाच्या स्थानावर नेण्यात झुलन चा मोलाचा वाटा आहे. आज आपला महिला क्रिकेट संघ पुरुषांच्या संघांइतकाच लोकप्रिय आहे आणि जगभरातून त्याला समर्थन आहे.
अनेक दुखापतींवर आणि अडचणींवर मात
झुलन गोस्वामीची कारकीर्द तिच्या कमिटमेंट आणि तिच्या परफेक्शन मिळवण्याच्या ध्यासासाठी लक्षात राहाणारी आहे. खेळण्याच्या प्रबळ इच्छेमुळेच तिने अनेक दुखापतींवर आणि अडचणींवर मात केली होती. तिने पाठ, टाच, खांदा, घोटा आणि गुडघे यांच्या दुखापतींवर विजय मिळवला. भारतागावातून येऊन महिलांच्या खेळात तिने स्वत:साठी ज्या प्रकारे स्थान निर्माण केले ते भारतातील लहान शहरे आणि खेड्यांमध्ये असलेल्या टॅलेंटला प्रेरणा देणारे आहे.
एक महान खेळाडू असूनही झुलन गोस्वामी क्रिकेट आणि क्रिकेट व्यतिरिक्त आयुष्यातही अत्यंत साधी आहे. तिचा ओल्ड स्कुल खेळावर अधिक विश्वास असला तरीही नवीन मॉडर्न क्रिकेट मध्ये तीने स्वतःला सामावून घेतले आहे. तिचा विश्वास होता की बॉलिंग फिटनेस जिम फिटनेसपेक्षा जास्त आहे. वयानुसार, तिने क्रॉस-फॉर्मेट क्रिकेटच्या मागण्या पूर्ण करत राहण्याची गरज तिने स्वीकारली.
एक गोलंदाज या नात्याने, तिने स्वतःला टॉप ऑफ हिट बॉलिंग करण्यासाठी कसे तयार केलेले दिसते. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वळणावळणाच्या इनस्विंगरच्या रूपात तिच्याकडे एक शक्तिशाली शस्त्र होते आणि त्यात तिने एक चेंडूची शिवण धरून मारा करण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवले. ही नंतरची आत्मसात केलेली प्रतिभा तिने 2017 च्या विश्वचषक उपांत्य फेरीत मेग लॅनिंगला बोल्ड केलेल्या चेंडूमध्ये उत्तम दाखवली.
टीम प्लेयर झुलू
झुलन गोस्वामीचा धारदार बाउन्सर कसा होता याबद्दल अनेक खेळाडू तुम्हाला सांगतील. तिचे सहकारी तिच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना चुकले तर तिच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत. पण एकदा मैदानाबाहेर गेल्यानंतर मात्र ती त्याच खेळाडूंसोबत नाचते आणि गाते आणि जर भारत जिंकला तर ती त्यांना आईस्क्रीम आणि मिठाईही खाऊ घालते. संघातील सर्वात तरुण सदस्यांमध्ये ती सहज मिसळून जाते.
आंतरराष्ट्रीय कारकिर्द
20 वर्षे 261 दिवसांपूर्वी, बंगालच्या छकडा येथील एका 19 वर्षीय मुलीने धडाकेबाज वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेटच्या जगात पाऊल ठेवले होते. तिथून झुलन गोस्वामीला दिग्गज वेगवान गोलंदाज होण्यासाठी फार वेळ लागला नाही. झुलनने २००२ मध्ये भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन (WCAI) अंतर्गत चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध खेळून तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 353 विकेट्ससह 12 कसोटी, 68 T20I आणि 204 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिची 253 बळींची संख्या महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम आहे. दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल 191 विकेटसह दुस-या स्थानावर आहे.
द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये प्रवास करणे, सामान्य शौचालयांसह वसतिगृहात राहणे ते बिझनेस क्लासचा प्रवास आणि आकर्षक पंचतारांकित हॉटेल्स मध्ये राहणे असे संघर्षाचे दोन्हीही टप्पे पाहणारी पाहिलेली झुलन भारतीय क्रिकेटच्या दोन युगांना जोडणारा एक भक्कम पूल आहे.