IPL 2023 KKR vs GT: रिंकू सिंगने खेचून आणला अशक्यप्राय विजय

IPL 2023 KKR vs GT : कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून पराभव केला. अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने पाच षटकार लगावले आणि संघाला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. गुजरातने केकेआरपुढे २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान केकेआरने तीन विकेट्स राखत पूर्ण केले. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २९ धावांची गरज होती. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २०५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात केकेआरने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. संघाकडून रिंकू सिंगने २१ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या.

IPL 2023 KKR vs GT: गुजरात टायटन्सची फलंदाजी

गुजरात टायटन्सच्या संघाची सुरवात काहीशी चाचफडत झाली. वृद्धिमान साहा चौथ्याच षटकात बाद झाला पण त्यानंतर मात्र शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यामध्ये चांगली भागीदारी झाली. या दोघांनी यावेळी संघाचे शतक फलकावर लावले पण त्यानंतर लगेच गिल बाद झाला. त्याने ३१ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. साई सुदर्शन मात्र भन्नाट फॉर्मात होता आणि त्याने ३८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची दमदार खेळी साकारली. पण साई बाद झाल्यावर शंकरचे झंझावात मैदानात आले. विजय शंकरने यावेळी केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण तर केले आणि संघालाही २०० धावांचा टप्पा गाठून देण्याता सिंहाचा वाटा उचलला. विजय शंकरने २४ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावांची खेळी साकारली. अखेरच्या दोन षटकांत तर त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे गुजरातच्या संघाला २० षटकांत २०४ धावा करता आल्या.

व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांच्या भागीदारीने रचला पाया

२०५ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि 20 धावांवर रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. यानंतर, २८धावांवर, नारायण जगदीशनच्या रूपाने संघाला आणखी एक धक्का बसला, जो केवळ ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

येथून व्यंकटेश अय्यरने कर्णधार नितीश राणासह संघाची धावसंख्या पहिल्या ६ षटकात २ गडी गमावून ४३ पर्यंत नेली. यानंतर दोन्ही खेळाडूंनी मिळून या सामन्यात कोलकाता संघाला पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि तिसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत १०० धावांची शानदार भागीदारी केली. २९ चेंडूत ४५ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या कर्णधार नितीश राणाच्या रूपाने कोलकाताच्या संघाला १२८ धावांवर तिसरा धक्का बसला.

राशिद खानची हॅट्ट्रिक

व्यंकटेश अय्यरने रिंकू सिंगच्या साथीने धावांचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही ४० चेंडूत ८३धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर गुजरात संघासाठी या सामन्यात कर्णधारपद भूषवणाऱ्या राशिद खानची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्याने १७व्या षटकातील पहिल्या ३ चेंडूत सलग ३ बळी घेत सामना गुजरातकडे वळवण्याचे काम केले.

हे ही वाचा : चेन्नईच्या पंढरीत भेटला विठ्ठल

रिंकू सिंगने चोपल्या ७ चेंडूत ४० धावा

या सामन्यात गुजरातचा संघ सहज सामना जिंकेल असे सर्वांना वाटत असताना, त्यावेळी रिंकू सिंगने १९व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार खेचून कोलकात्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने १ धाव घेत रिंकूला स्ट्राइक दिली. रिंकूने दुसऱ्या चेंडूवर लाँग ऑफ आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार खेचून सामना रोमांचक केला. नाईट रायडर्सच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.

त्यानंतर रिंकूने चौथ्या चेंडूला लाँग ऑफच्या दिशेने आणि पाचव्या चेंडूला लाँग ऑनला षटकार मारत सामना पूर्णपणे कोलकात्याच्या दिशेने वळवला. शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी ४ धावांची गरज होती आणि त्या चेंडूवरही षटकार खेचत रिंकूने संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याच्या या थरारक कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *