India’s Squad for WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा

India’s Squad for WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला वगळण्यात आले होते. 7 ते 11 जून दरम्यान होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे.

रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. त्याच्यासोबत टीममध्ये शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रहाणे आणि केएल राहुल आहेत. केएस भरतची विशेषज्ञ यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फिरकी विभागाची जबाबदारी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल.

हे ही वाचा: अर्जुन तेंडुलकरचे स्वप्न साकार, मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण

८२ कसोटी सामने

अजिंक्य रहाणे भारताकडून शेवटची कसोटी ११ जानेवारी २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्या सामन्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने भारतासाठी 82 कसोटी सामन्यांमध्ये 38.52 च्या सरासरीने 4932 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 12 शतके आणि 25 अर्धशतके झळकली आहेत. भारताचे अनेक सामन्यांमध्ये कर्णधार राहिलेल्या रहाणेचे 15 महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.

आयपीएलमधील कामगिरीचा फायदा

रहाणेने शेवटच्या कसोटी डावात केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. याच कारणामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. रहाणेने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी त्याने पाच डावात 52.25 च्या सरासरीने 209 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 199.04 आहे. याचा फायदा रहाणेला मिळाला आणि त्याची संघात निवड झाली. श्रेयस अय्यरची अनुपस्थिती आणि सूर्यकुमार यादवच्या कसोटीतील खराब कामगिरी या कारणांमुळेही अजिंक्यची निवड करण्यात आली आहे .

India’s Squad for WTC Final 2023 : भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

गेल्या वेळी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत त्याला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता. टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 हंगामात टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. गुणतालिकेत ते ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *